थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (24)

अविकसीत देशाचा विकास कार्यक्रम राबवताना समाजाला मानवतेचे भान असणे व जिवनमुल्ये आत्मसात करुन आदर्श नागरिक असणे व सामूहिक हिताकरिता सहकार भावना असणे आवश्यक असते. आमच्या पूर्वजांना वरील संस्कार जतन करताना पुढच्या पीढीला सवय लावून सातत्य सुरु ठेवणारी प्रबोधनाची परंपरा लोककलेच्या किर्तन-प्रवचन व धार्मीक सण व संस्कतीच्या माध्यमातून लाभत असे. माझ्या पीढीनेही तोच वारसा जपला. हे सत्य तुझ्या चेतन विश्वांत देशातील सद्यस्थितीतील समाजजिवनाची अवस्था स्पष्ट करणा-या तुझ्या पत्रा वरुन स्पष्ट होते.

म्हणूनच सुचवावे वाटते कि, राज्य देश विकास निर्मीतीकरीता सुसंस्कृत समाज निर्मीतीचे काम प्रथम हाती घ्यावे लागेल. समाजाची मानसिकता मानवतावादी, संयमी, विवेक, सौजन्यशील होत नाही तोपर्यंत खरा विकास मानवनिर्मीतीच्या नावार होवू शकत नाही.

याकरिता, समाजातील, प्रत्येक, मनुष्य उत्तम व आदरणीय संज्ञेला पात्र होणारा, एक दिलाचा सुसंस्कृत समाज बनवण्याकरिता प्राचीन काळापासून परंपरेने जोपासलेल्या संस्कृतीतून प्रबोधन प्रक्रिया हाती घ्यावी लागेल. आपल्या देशांत भिन्न व्यवस्थेच्या भिन्न परंपरा असल्या तरी सुखी व सुसंस्कृत जीवन घडवण्याची व उपभोगण्याची पद्धत भिन्न नाही.

संसंस्कृत समाजमन एक जिनसी बनवण्याकरिता समाजातील प्रत्येक घटकाने आपली संस्कृती, धर्मकर्तव्य, प्रथा, रितीरिवाजातून जतन करताना व्यवहार्य परिवर्तनासह पुढच्या पीढीला त्याचा वारसा द्यावा लागतो. प्रत्येक नव्या पीढीकडून याच बाबींचे अवलंबन होत राहिल्याने समाजातील प्रत्येक घटक व प्रत्येक नागरिक उत्तम नागरिक व उत्तम घटक बनवण्यास मदत होत असे. विज्ञान व परिर्वतनशील वाटचालीत ठळक व गतीमान परिणामामुळे संस्कृतीतील मूळ अपेक्षीत परिणामाचे जागी अल्पकालीन, ठळक वाटणारे प्रसंगी पारंपारिक हेतूशी फारकत घेणारे परिणाम नव्या पीढीला मोहीत करु लागतात. समाजातील वेगवेगळ्या घटकामधून मनुष्यात अशी प्रवृत्ती वाढत गेल्यास स्वार्थामुळे द्वेश-मत्सर वाढीला लागून स्पर्धा, जबरदस्ती, लूटमार व प्रसंगी खून खराबी पर्यंत मजल जावून क्षणीक सुख मिळण्यांत मर्दपणा वाटू लागतो. अशा संघटीत प्रवृत्तीतून पुढे समाज व देश विघातक शक्ती कार्यरत होतात. याच कारणांनी सुस्कृंत समाजाचे परिवर्तन स्वार्थी, नासमंजस व उपद्रवी वृत्तीत होवून देशविघातक कृतीला प्रोत्साहन मिळत जाते. अशा परिवर्तन झालेल्या समाजातच प्रामाणिकपणा, नातीसंबंध, देशप्रेम, विकासप्रेम या सर्वाँशी फारकत घेतलेला समाज निर्माण होतो. तुझ्या पत्रांत तू आजच्या सामाजीक परिस्थितीचा दिलेला तपशील हा अशाच परिणामातून झालेला आहे.

इकडच्या विश्वांत प्रवेश देताना प्रथमता सर्वसाधारण नागरिकत्व दिले जाते. परिपक्व नागरिकत्वासाठी येथील प्रथम केंद्रात अनेक चाचण्या द्याव्या लागतात. विशेष म्हणजे अशा सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्याशिवाय परिपक्व नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाने येथील समाजव्यवस्थेत सामील होतान परिपक्व नागरिक ही उपाधी मिळवलेली असते.

येथील परिपक्व नागरी हा स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक असतो. कोणतीही गोष्ट कृतज्ञतापूर्वक स्विकारतो व गाजावाजा न करता दान करतो. त्याला इतरांबद्दल सहानुभूती वाटते व इतरांच्या भावना समजून घेतो. त्याला इतरांच्या दोषापेक्षा गुण अधिक लक्षात येतात. तो अडिअडचणीतही आनंदी राहून धैर्य दाखवतो. तो यशाने हुरळून न जाता साधेपणाने स्विकारतो. तो दिलेला शब्द पाळतो. तो स्वतःवरील टीका व स्वतःमधील कमतरता खुलेपणाने मोकळेपणाने मान्य करतो. इतरांनी केलेल्या प्रशंसेने गर्वीष्ट होत नाही. तो स्वतःच्या चुका मान्य करतो आणि नित्मसरीपणे इतरांच्या कर्तव्याला दाद देतो. गरजवंताला योग्य सल्ला देतो व संकटसमयी त्याच्या पाठीशी उभा रहातो. तो इतरांच्या अडिअडचणींचा विचार करून जमेल तेवढी मदत करतो. तो न्यापद्धतीने पण इतरांना न दुखाविता भाषेचा योग्य वापर करून नाती दृढ करतो. तो इतरांचा कायम विश्वासू रहातो. कोणत्याही प्रसंगाता आपला तोल ढळू देत नाही. तो सबबी सांगत नाही. दुस-यासाठी सदैव त्यागाला तयार असतो तो विजयांत नफा व पराजयांत अविचल, धीरगंभीर असतो.