यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : १२

धर्माच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण पुरोगामी होते. चव्हाण धार्मिक होते. त्यांच्या घरीदारी धार्मिक वर्तन होत होते. अर्थातच यशवंतराव चव्हाण अज्ञेयवादी नव्हते. चव्हाण यांची धर्मसंकल्पना टोकांची आग्रही नव्हती. आंतरिक समाधान हा त्यांच्या धर्मसंकल्पनेचा एक भावार्थ होता, तर दुसरा भावार्थ हा मानवमात्राचा विकास हा होता. या संदर्भात यशवंतराव चव्हाण म्हणतात, की युगानु युगे चंद्रभागा विठ्ठलाच्या पायापासून वाहत होती. तिला उजनी येथे आम्ही अडविली आहे. यानंतर विठ्ठलाने चंद्रभागेला भेटण्यासाठी वारकरी शेतक-यांच्या झोपडीत जावे. यावरून यशवंतराव चव्हाण यांची धर्मसंकल्पना काळ, स्थळ याप्रमाणे बदलते. त्यांच्या धर्म संकल्पनेत पावित्र्य, शुद्धता, श्रेष्ठ धर्म तत्वे नाहीत. शिवाय त्यांची धर्मसंकल्पना ही नियामक मंडळाचे स्वरूप धारण करत नाही. यामुळे ख-या धर्मांचा विकास चव्हाण यांच्या धर्म संकल्पनेत आहे. याउलट चव्हाण संघपरिवाराची नियामक स्वरूप धारण करणारी धर्मसंकल्पना नाकारतात (कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे अधिकार धर्माकडे घेणे). त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा मूलतत्त्ववाद व जमातवादाला विरोध होता. या मुद्द्यावर यशवंतराव चव्हाण हे वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा वेगळे होते हे स्पष्टपणे दिसते.

व्यक्तीच्या विकासाचे मुख्य साधन शिक्षण आहे. शिक्षण घेऊन व्यक्ती, समाज व राष्ट्र यांची प्रगती होईल, असे चव्हाण यांचे मत होते. चव्हाण शिक्षणाकडे इंग्रजाप्रमाणे बळ म्हणून पाहत नव्हते किंवा वैदिकाप्रमाणे वर्चस्वाचे साधन म्हणूनही पाहात नव्हते. चव्हाण यांनी शिक्षणाचा विचार म. फुले यांच्या विचारातून घेतला होता. विद्येचा संबंध त्यांनी मनुष्य असण्याशी जोडला होता. ज्ञानवंत होणे हा मुद्दा मनुष्याला पशुपासून वेगळा करतो व पशुचे रूपांतर मनुष्यामध्ये होते. त्यामुळे चव्हाणांनी शिक्षणासाठी मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते. दारिद्र्यामुळे ज्यांना शिक्षण घेता येत नाही अशा सर्व जातिधर्मातील गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे या प्रस्तावाला वित्तमंत्री जीवराज मेहता यांनी विरोध केला. तेव्हा इतकी आवश्यक व पुरोगामी योजनाही आम्ही हाती घेणार नसू तर हे मुख्यमंत्रीपद काय कामाचे असे म्हणून यशवंतराव चव्हाण बैठकीतून उठून गेले. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणासाठी मुख्यमंत्रिपद पणाला लावले होते. यानंतर बीसी व ईबीसीचे नाममात्र फॉर्म भरून घेतले जात व मोफत शिक्षण दिले गेले. शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था यांच्या विकासासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कष्ट केले. या संस्थाचे कार्यक्षेत्रच मुलत: मुख्य शहरांच्या बाहेर होते. त्यामुळे चव्हाण यांनी ग्रामीण भागात शिक्षण नेले. तेथे मानवता हा दृष्टिकोण तयार होईल असा आशावाद निर्माण केला. शिक्षणाचे व्यापारीकरण त्यांच्या विचारात नव्हते. शिक्षणाचे व्यापारीकरण हा मुद्दा वसंतदादा पाटील यांनी आणला. त्यांचा संबध यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी येत नाही. स्वातंत्र्योत्तर भारत सरकारचे शिक्षण विषयक सार्वजनिक धोरण अभिजनासाठी विशेष शिक्षण व सामान्यासाठी दुय्यम शिक्षण अशा स्वरूपाचे होते. यशवंतराव चव्हाण याही मुद्यापासून वेगळे होते असे दिसते.