महात्मा फुले यांचं चरित्र वाचून यशवंतरावांचे विचार बनले, “महात्मा फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे, असे मलाही वाटले. त्यांनी उभे केलेल काही प्रश्न तर निरूत्तर करणारे होते. शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक; दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजनसमाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय देशाचे कार्य होणार नाही, हा त्यांच्या विचारांचा सारांश माझ्या मनामध्ये ठसला.”
यशवंतरावांना काबाडकष्ट करणा-या “स्तरातील व परिसरातील मुलामाणसांबद्दल एक प्रकारचे कौतुक व जिव्हाळा असे. मग ती कोणत्याही जातीची का असेनात.” ही सर्वसंग्राहकता व जातिभेदातील दृष्टी त्यांनी सर्वत्र व सतत जोपसली. या सामाजिक व्यापकतेतच त्यांचे यश सामावले होते. “चव्हाण विद्यार्थी या नात्याने कधीही नापास न होणारे होते. परंतु उत्तम मार्क्सही मिळवणारे नव्हते. मध्यम होते. साहित्य, कला व क्रीडा यांचा त्यांना छंद होता.” राजकारणाच्या धकाधकीतही त्यांनी रसिकता व साहित्याचे प्रेम जपले. पुढे सत्ता हातात आल्यावर ‘साहित्य व संस्कृती मंडळ’ त्यांनीच स्थापन केलं.
चव्हाणांनी छोट्या-छोट्या जातीय किंवा धार्मिक प्रश्नांसाठी संकुचितपणे जीवन व्यतीत करण्यापेक्षा व्यापक दृष्टीनं कार्य करण्याचा निश्चय केला. सामाजिक-धार्मिक सुधारणांपेक्षा स्वराज्याच्या राष्ट्रीय प्रश्नांना त्यांनी महत्त्व देण्याचे ठरविले. टिळकभक्ती चव्हाणांच्या आत्मचरित्रात ओतप्रोत आढळत असली, तरी ग्रामीण शेतकरी बहुजनसमाजाची नाडी जाणणारे महात्मा गांधी व पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव चव्हाणांच्यावर तुलनेने जास्त पडला.
कै. रा. ना. चव्हाण यांच्या साक्षेपी दृष्टीतून त्यांना यशवंतरावांच्या ‘कृष्णाकाठ’ मध्ये क्वचित काही उणीवही दिसते. ज्या शिंद्यांच्या पुढाकारानं जेधे बहुजनसमाजाला ब्राह्मणेतर चळवळीतून राष्ट्रीय चळवळीत घेऊन गेले होते, त्या गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे यांचा म्हणावा तसा गौरवपूर्ण उल्लेख जेध्यांच्या मानाने यशवंतराव करत नव्हते, असं रा. ना. चव्हाणांना दिसलं व खटकलं. जेधे व शिंदे यांना त्यांनी एकाच मापानं मोजायला नको होतं असं रा. ना. चव्हाण आपलं मत मांडतात. वास्तविक केशवराव जेधे, कर्मवीर शिंदे यांना अगदी तरूणपणीदेखील गुरूस्थानी मानत असत. तेव्हा यात यशवंतरावांची खरं म्हणजे चूकच होत होती. डॉ. य. दि. फडकेकृत जेधे चरित्रामध्येही शिंद्यांचं स्थान मोठंच मानलं होतं. महात्मा गांधींच्याजवळ जाणारे शिंदे हे बहुजनसमाजातील पहिले ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकर्ते होते, यात काही संशय नाही. त्यांचं हे श्रेय कोणीही नाकारू शकणार नाही. “लोकमान्य टिळक यांच्यामुळे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ हा संदेश वरच्या पांढरपेशा विचारवंतांपुरताच मर्यादित राहिला होता; तो खेड्यापाड्यातील सामान्य शेतक-यापर्यत जाऊन पोहोचला, असं चव्हाण निवेदितात.” या यशवंतरावांच्या मखलाशीलाही कै. रा. ना. चव्हाणांनी फटकारलं आहे.