पुरस्कार
यशवंतराव चव्हाणांच्या सामाजिक विचारांचे तात्त्विक आधार
‘He was self made truth seeker’
(रा. ना. चव्हाण, पान नं. ७७)
यशवंतराव चव्हाण (१२ मार्च १९१३-२५ नोव्हेंबर १९८४) व रा. ना. चव्हाण २९ ऑक्टोबर १९१३-१० एप्रिल १९९३) यांचा कालखंड समकालीन होता. समान कालखंडातील हो दोन्ही चव्हाण सातारा जिल्ह्यातील होते. मात्र एक असामान्य व्यक्ती व एक सर्वसामान्य व्यक्ती, एक ज्ञात व्यक्ती व एक अज्ञात व्यक्ती असे स्वरूप असले तरी, क्षेत्र स्थानातील (कराड व वाई) दोन्ही चव्हाणांच्या प्रेरणा बहुजनवादी स्वरूपाच्या होत्या. सामाजिक विचार हा दोन्ही चव्हाणांच्या विचारांचा गाभा होता. सत्ता, अधिकार, प्रतिष्ठा व संपत्ती नसलेल्या वर्गासाठी दोन्ही चव्हाणांनी आरंभापासून ते शेवटपर्यंत काम केले. दोन्ही चव्हाणांच्या विचारांचा गाभा हा म. फुले यांच्या विचारांवर आधारित विकास पावला होता. शेतकरी समाज, शिक्षण, मागास जाती व सत्तेचे सामाजिक-सांस्कृतिक अभिसरण या मुद्द्यांवर दोन्ही चव्हाण एकसारखेच होते. मात्र यशवंतराव चव्हाण यांचा मार्ग प्रत्यक्ष राजकारणाचा व सत्ताकारणाचा होता. तर रा. ना. चव्हाण यांचा मार्ग वैचारिक लेखनांचा होता. सामाजिक-आर्थिक लोकशाहीवर दोघांची निष्ठा होती. त्यामुळे रा. ना. चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर लेखन करणे हा वैचारिक पोत समान असण्याचा भाग ठरतो. समकालीन काळातील या दोन व्यक्ती सामाजिक व राजकीय अशा दोन्ही घटकांचा एकत्रितपणे विचार करणा-या होत्या. त्यामुळे न्या. रानडे यांनी राजकीय सुधारणाबरोबर सामाजिक सुधारणा कराव्यात या मुद्यांचा जो आग्रह धरला होता, तो मुद्दा दोन्ही चव्हाण यांना एकत्र जोडणारा वैचारिक धागा ठरतो. न्या. रानडे यांचा मुद्दा वि. रा. शिंदे यांनी पुढे रेटला होता. तोच मुद्दा दोन्ही चव्हाणांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात पुढे नेण्याचे काम केले. किंबहुना राजकारण व समाजकारण यांना एकत्र जोडणे हाच दोघांच्याही राजकारणाचा अंतिम हेतू होता. राजकारण व समाजकारण यांना जोडण्याची वौचारिक शक्ती, युक्ती व डावपेच दोन्ही चव्हाणांच्या ठाई होते. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या पुस्तकांच्या माध्यमाद्वारे एकत्रितपणे समाजासमोर येत आहेत. रा. ना. चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे विचार समाजापुढे आणले. त्या पद्धतीनेच रमेश चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण व रा. ना. चव्हाण यांच्यातील राजकीय व सामाजिक विचार एकत्रितपणे पुढे आणले. हे या पुस्तकांच्या संपादकांचे योगदान आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या सामाजिक विचारांचा परामर्श घेणारे लेख रा. ना. चव्हाण यांनी लिहिले आहेत. ही गोष्ट महाराष्ट्रातील चार-दोन अभ्यासक वगळता अन्य लोकांना माहित नाही. १६ फेब्रुवारी- १ मार्च १९८५ चा लोकराज्य चा अंक यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक होता. या अंकाच्या वेळी रा. ना. चव्हाण हयात होते. तेव्हा लोकराज्याने रा. ना. चव्हाण यांचा यशवंतराव चव्हाण यांच्यावरील लेख या अंकात समाविष्ट केला नाही. याचा अर्थ यशवंतराव चव्हाण यांच्यावर कोण अभ्यासपूर्ण लिहित आहे, याची जाणीव लोकराज्याला नव्हती. जर त्याबद्दलची माहिती असेल तर यशवंतराव चव्हाण यांच्यावर अभ्यासपूर्ण लिहिलेला लेख नको होता. ही घटना खुद्द सातारा जिल्ह्यात घडू शकते. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताच्या बाहेरील अभ्यासकांनी दखल घेण्याची आशा करणे चुकीचेच ठरते. केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या अनुयायाची मते नोंदविली गेली. यशवंतराव चव्हाम यांच्यावरील अभ्यासपूर्ण साहित्यांचे संकलन व संपादन झाले नाही. असा मुद्दा आरंभी मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण ही केवळ राजकारणी व्यक्ती होती किंवा त्यांनी लिहिलेले साहित्य हे मराठी साहित्यांचा भाग होता. एवढाच विचार संपूर्ण महाराष्ट्र करत असावा. या चव्हाण यांच्या ठळक प्रतिमेच्या बाहेर जाऊन केवळ रा. ना. चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक विचार व चळवळी आणि म. फुले – शाहू – शिंदे – सयाजीराव गायकवाड यांच्या विचारांशी असलेले साम्य शोधण्याचे काम केले. यावरून असे म्हणता येते की यशवंतराव चव्हाण यांची दृष्टी रा. ना. चव्हाणांनी लिहिलेल्या लेखामधून व्यक्त झाली आहे.