भूमिका-१ (159)

२८. जनता सरकारचे परराष्ट्रिय धोरण

परराष्ट्र व्यवहार खात्याच्या मागणीवरील चर्चेत भाग घेताना
२ एप्रिल १९७९ रोजी केलेल्या भाषणाच्या आधारे.

आजच्या गतिशील जगामध्ये अनेक महत्त्वाचे बदल अत्यंत जलद गतीने होत असतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रिय परिस्थितीसंबंधी वारंवार चर्चा होत राहिली पाहिजे, असे मला वाटते. याबाबतीत केवळ सरकारनेच पुढाकार घ्यावा, असे नाही; इतरांनाही अशी चर्चा प्रवर्तित करता येते.

आंतरराष्ट्रिय परिस्थितीचा ऊहापोह करण्यापूर्वी परराष्ट्रमंत्री म्हणून श्री. अटलबिहारी वाजपेयी करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करणे आवश्यक वाटते. त्यांच्या या नव्या भूमिकेचे मी गेली दोन वर्षे निरीक्षण करीत आहे. जनसंघाचे नेते म्हणून त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या वैचारिक भूमिका मी अवलोकन केलेल्या आहेत. ते लक्षात घेता, परराष्ट्रमंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून श्री. वाजपेयी खुल्या वृत्तीने आणि लवचीक मनाने विचार करू लागले आहेत, असे म्हटले पाहिजे. पं. नेहरूंच्या परराष्ट्रिय धोरणाचा वारसा चालविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे. पं. नेहरूंचे धोरण ते पुढे चालवत आहेत, हे जसे त्यांना भूषणावह आहे; तसाच तो नेहरूंच्या धोरणाचाही विजय आहे.

१९७९ मधील भारताच्या परराष्ट्रिय धोरणाचा विचार करीत असताना परराष्ट्र-मंत्र्यांनी केवळ या वर्षापुरतीच आपली दृष्टी मर्यादित न ठेवता येत्या दशकातील परराष्ट्रिय धोरणाचाही साकल्याने विचार केला पाहिजे, असे मला सुचवावेसे वाटते. येत्या दहा वर्षांमघ्ये जागतिक आंदोलनांचे स्वरूप काय राहणार आहे, जग कसे होणार आहे, आपले भौगोलिक स्थान, आकार व महत्त्व लक्षात घेता भारताचे धोरण कोणते राहील आणि आगामी परिस्थितीसंबंधीचे भारत सरकारचे मूल्यमापन कसे राहणार आहे या सर्व गोष्टी परराष्ट्रमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर हव्यात. कारण परराष्ट्रिय धोरणाचा विचार करताना दीर्घकालीन संभाव्यता ध्यानात घेणे हितकारक ठरते.  भारतासारख्या देशाच्या परराष्ट्रिय धोरणाची परीक्षा अनेक निकषांच्या आधारे करता येणे शक्य आहे. शेजारी देशांबरोबरचे संबंध आणि या विभागातील देशांबरोबरचे संबंध हे दोन निकष प्रमुख आहेत. यांपैकी पहिला म्हणजे शेजारी देशांबरोबरच्या संबंधाचा विचार करायचा म्हटले, तर या बाबतीत सरकार काहीसे आत्मसंतुष्ट आहे, असे दिसते.

सर्व शेजारी देशांबरोबरचे आपले संबंध अतिशय चांगले आहेत आणि जनता सरकार अधिकारावर आल्यानंतरच हे घडून आलेले आहे, असे भासविण्याचा सरकारतर्फे प्रयत्न केला जात आहे. पण या दोन्ही गोष्टी ख-या नव्हेत. जर भारताचे आज शेजारी देशांबरोबर चांगले संबंध असते, तर जनता सरकार अधिकारावर येण्यापूर्वीही अशीच परिस्थिती होती, हे नाकारून चालणार नाही. तसेच शेजारी देशांबरोबरचे संबंध अगदी व्यवस्थित आहेत, ही निखालस चूक आहे. कारण पाकिस्तान, नेपाळ आणि बांगला देश म्हणजेच केवळ सर्व शेजारी देश नव्हेत. शेजारी देशांमध्ये चीनही येतो.