भूमिका-१ (156)

२७. वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष

'तरुण भारत' नागपूर, १९७७ च्या दिवाळी अंकातील लेख.

मार्क्सने मांडलेले वर्गसंघर्षाचे तत्त्व, हा इतिहासशास्त्रातील एक क्रांतिकारक सिद्धांत आहे. तो अमुक एका देशाला लागू आहे आणि अमुक एका देशाला लागू नाही, असे होऊ शकत नाही. हिंदुस्थानलाही तो लागू आहे. जोपर्यंत समाजात शोषित-पीडित लोक आहेत आणि त्यांना शोषून काढणारे लोक आहेत, तोपर्यंत मार्क्सचा सिद्धांत भारतातही आहेच. शोषकांचे अत्याचार वाढतील, तसतसा हा वर्गसंघर्ष वाढत जाईल, यात मला मुळीच शंका वाटत नाही. माझे तर उलट असेच मत आहे, की हिंदुस्थानात वर्गसंघर्ष नव्हता, असे कधी झाले नाही. त्या संघर्षाची व्याप्ती अधून मधून कमी-अधिक झाली असेल, इतकेच काय ते. पण संघर्षाची ही भावना अगदी पूर्वीही होती आणि आजही आहे. आणि मला वाटते, ती यापुढेही राहणारच आहे. कारण आपण इतर वर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत, असे मानणारा वर्ग भारतात आजच्याप्रमाणेच पूर्वीही होता आणि त्याचे वर्चस्व न मानता ते झुगारून द्यावे, असे वाटणारा वर्गही पूर्वी होता व आजही आहे. तेव्हा हिंदुस्थानमध्ये वर्गसंघर्ष ही काही नवीन घटना नव्हे.

वर्गसमन्वयाची भावना व भाषा आपल्या संस्कृतीत आहे, असे मानून घेणे हीही एक प्रकारची सोयीस्कर गैरसमजूत आहे. उलट, भारतीय संस्कृतीच्या निर्मात्यांनी या दीन-दलितांनाही काही मन आहे, भावना आहेत, याचा फारसा विचार केलेला नाही, असेच खेदाने म्हणावे लागते. समन्वयाची भाषा काढताना ती घडवून आणतानाही नेहमी दलित वर्गांना शोषणाखाली कायमचे जखडले जाईल, असाच प्रयत्न झालेला आहे. हा आपल्या समाजव्यवस्थेचा दोष आहे. शोषित आहे, तो शोषित राहू नये, असा प्रयत्न कधी झाला नाही. शोषिताने प्रतिकार करावा, इतके सामर्थ्य त्याला समाजव्यवस्थेने कधी प्राप्त होऊ दिले नाही.

भारतीय संस्कृतीच्या अगदी भरभराटीच्या काळातही चातुर्वर्ण्य-प्रणाली निर्माण करून समाजात कायमचा जातिभेद निर्माण करण्यात आला. जो शूद्र आहे, तो शूद्रच राहिला पाहिजे, असे युगानुयुगे सांगितले गेले. तेव्हा ज्या व्यवस्थेने माणसामाणसांत भेद केला, काही लोकांना हीन मानले, त्या व्यवस्थेत समन्वय हा शब्दही वर्णाश्रमव्यवस्थेला कायम रूप देण्यासाठीच होता, असेच म्हणावे लागते. हिंदुस्थानच्या इतिहासाचा असा समन्वयवादी अर्थ लावणे, हे वास्तवाकडे पाठ फिरवणे होणार आहे. शोषण करणारा समाज, वर्ग किंवा जाती आहेत, तोवर शोषित राहणारच. आणि शोषित असले, की असंतोष आणि संघर्ष येणारच. हजारो वर्षांपासून हेच होत आलेले आहे आणि शोषणरहित समाजाचा उदय सर्व जगभर होईपर्यंत असेच घडत राहणार आहे.