भूमिका-१ (155)

कारण माझी टीका असते, ती विचारसरणीवर. सामाजिक-सांस्कृतिक अलिप्तपणाच्या त्यांच्या निष्ठांवर. परंतु याची जाणीव टीकाकार ठेवीत नाहीत, असे दिसते. तेही मी समजू शकतो. पण काँग्रेसमधून शिंगे मोडून जनता पक्षाच्या आश्रयाला कालपरवा गेलेलेही तशीच पोपटपंची करतात, हा सर्वांत मोठा विनोद आहे.

खरे तर, जनता पक्षातलेच प्रमुख कर्ते लोक संघ-जनसंघाबाबत टीकात्मक बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या टीकाकार मंडळींनी, वस्तुत: या टीकेचा अंतर्मुख होऊन विचार करावा, हे बरे. शहाण्या-सुरत्यांनी अगोदर जनता पक्षातल्या टीकाकारांचे समाधान करावे आणि मगच शिल्लक उरल्यास टीकेचे हत्यार परजून माझ्या रोखाने धाव घ्यावी. संघ-जनसंघाला खडे बोल ऐकवणारा एक गट जनता पक्षांतर्गत आहेच ना ? माझ्यावर जातीयतेचा आरोप करणारांनी या गटावरील आरोपाचाही उच्चार एकदा केलेला बरा.

वैचारिक श्रद्धांतून काम करणारा मी माणूस. अनेकविध विचारांच्या मंडळींशी संबंध. विविध प्रकारच्या वाचनाची, व्यासंगांची सवय. असा मी, इच्छा झाली, तरी जातीयवादी बनणार कसा? सहज ओघात आले, म्हणून हा प्रपंच.

१९७८ चा प्रारंभ हा राजकीय इतिहास निर्माण करणारा महत्त्वाचा काळ आहे. चार-सहा राज्यांत निवडणुका होणार असून या निवडणुकांमध्ये जनता पक्षाच्या राज्यकारभाराच्या व धोरणांच्या अनुभवानंतर जनमताची कसोटी लागणार आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या ध्येय-धोरणाचा, कार्यक्रमाचा पाठपुरावा करीत करीत गेल्या वर्षभरातल्या इतिहासाला कलाटणी द्यायची आहे. आपल्या मूळ प्रेरणा व काँग्रेसला इतिहासाने दिलेले काम व मनातली तीव्र जाणीव यांच्या आधारावर पक्षाने अधिकाधिक एकसंध बनून जनतेपर्यंत पाहोचावयाचे आहे आणि आव्हान पूर्ण करावयाचे आहे.

काँग्रेस पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर टीका या होत राहणारच. परंतु या टीकांचे परिमार्जन करण्यासाठी, लोकांना वस्तुस्थिती पटविण्यासाठी पाच-दहा माणसांच्या संख्येपासून हजारोंच्या संख्येपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून नवे युवामंडळ बनविण्याचे काम केले पाहिजे. खेड्यांपासून शहरांपर्यंत करावयाचे हे काम आहे. महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे महात्मा गांधी म्हणत असत. म. गांधींनी महाराष्ट्राला जो काँग्रेसचा मंत्र दिला, त्याच्या परीक्षेची, कसोटीची ही वेळ आहे.