भूमिका-१ (158)

जयप्रकाशांनी हरिजनांवर होणा-या अत्याचारांच्या संदर्भात वर्गसंघर्षाची कल्पना मांडली आहे. परंतु माझ्या मते अशा वर्गसंघर्षातून हरिजनांचा लाभ होणार आहे, की नाही, या तात्त्विक चर्चेचा हा प्रश्न नाही. हरिजनांची आजची परिस्थिती काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानमध्ये आज अत्याचार ज्या पद्धतीने होताहेत, त्याची माहिती काढायचा जर प्रयत्न केला, तर असे दिसून येईल, की या सर्वांचे मूळ कारण सामाजिक अहंकाराचे आणि मोठेपणाचे जुने विचारच आहेत.  त्याचबरोबर आजचे जे आर्थिक कार्यक्रम आहेत, त्या आर्थिक कार्यक्रमांना विरोध म्हणून हरिजनांवर हे अत्याचार होत आहेत.

या अत्याचारांची पाहणी करण्यासाठी माझ्या पक्षाने खासदारांच्या ज्या तुकड्या बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत पाठविल्या होत्या, त्यांनी आणलेल्या माहितीवरून दिसते, की ज्यांना जमिनी नव्हत्या, त्यांना जमिनी दिल्या, म्हणून त्यांच्यावर राग काढण्यात आला. कालपर्यंत बिनजमिनीचे असलेले हे लोक आता जमिनीचे मालक व्हायला लागले, जमीनदार व्हायला लागले, हे अनेकांना पाहवले नाही.

त्याचप्रमाणे ज्यांना राहायला जागा नव्हत्या, त्यांना त्या मिळाल्या, तर अत्याचार करणाऱ्यांनी त्या परत हिसकावून घेतल्या. वेठबिगारी पद्धतीत पिढीजात गुलामी करायला माणसे मिळत होती. त्यांना वर्षाकाठी काही धान्य दिले, थोडे कपडे दिले आणि पिढयान् पिढया आमचेच काम केले पाहिजे, म्हणून बांधून घेतले. तर अशी जी वेठबिगार चालू होती, तिला विरोध करायला लोक उभे राहिल्याबरोबर त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. त्यातून हा संघर्ष निर्माण झालेला आहे.म्हणजे हा संघर्ष मुळामध्ये आहेच. त्यांचे शोषण चालूच होते. त्यांचे सामाजिक आर्थिक शोषण वर्षानुवर्ष चालले आहे आणि आज त्यांनी बरोबरीच्या नात्याने वागायचा प्रयत्न करतो म्हटल्याबरोबर त्यांच्यावरती, जणू काही आपले जन्मसिद्ध अधिकार जातील, या भावनेने शोषक त्यांच्यावर नुसती कुरघोडीच नव्हे, तर हिंसक हल्ले करतो आहे. हे चित्र काय दर्शविते? हेच की, हा वर्गसंघर्षच आहे. दुसरे काहीही नाही. आणि हा जो शोषक आहे, तो हिंसेचा वापर करून शोषिताला दाबायचा प्रयत्न करतो आहे. अशा परिस्थितीत तो शोषित वर्ग जर प्रतिकाराला उभा राहिला, तर त्याच्याविरुद्ध तक्रार कशी करता येईल?

अशा परिस्थितीत या वर्गाने त्याच्यावर जो अन्याय होतो आहे, त्याच्याविरुद्ध संघटित झाले पाहिजे आणि त्याचा संघटित प्रतिकार केला पाहिजे. अर्थातच संघर्ष केला पाहिजे. कारण हा त्यांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. या संघर्षासाठी समाजातील सुजाण व्यक्तींनी त्याला आपणहून सर्व प्रकारची मदतही केली पाहिजे. कारण अशा संघर्षातून त्याला जो लाभ मिळेल, तो चिरस्थायी राहणार आहे. कुणाच्या तरी उपकाराने किंवा उदारतेमुळे त्याला काही दिले, तर त्याने त्याचे भागायचे नाही. त्याचे समाधानही होणार नाही. कुणी त्याला दया दाखविली, तर त्याने काय होणार? अशा कृत्रिम मदतीने किंवा दयेने सामाजिक अन्याय, अत्याचार कधीच दूर होत नसतात. वरून येणा-या कुणाच्या तरी दयेवर अवलंबून राहून सामाजिक एकता कधीच निर्माण होत नसते.

मी काही समाजात वितुष्ट निर्माण करावे, अशा मनाचा नाही.वितुष्टे टाळली पाहिजेत, वितुष्टे निर्माण होणार नाहीत, असे प्रयत्न केले पाहिजेत, अशाच मताचा मी आहे. त्यासाठी समाजातल्या सर्व लोकांनी, शासकांनी, नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. याच भावनेने आमच्या पक्षातील खासदारांनी आणलेल्या माहितीच्या आधारे आपले पंतप्रधान मोरारजी यांना मी पत्र लिहिले आहे, की शासनाने आपली सर्व यंत्रणा या लोकांवरील अत्याचाराच्या प्रतिकारासाठी आणि असे अत्याचार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी सज्ज उभी करायला पाहिजे. हे शासनाचे काम आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील जे कोणी नेते असतील, त्या सर्वांचे हे काम आहे. हा काही एका पक्षाचा वा राजकारणाचा प्रश्न नाही. समाजातील न्यायाचा प्रश्न आहे.