यशोधन-५

राजकारण

तख्त कोणा एका व्यक्तीचे नाही, कोणा एका धर्माचे नाही, कोणा एका वर्गाचे नाही. ते या देशातल्या चाळीस-पंचेचाळीस कोटी लोकांचे आहे आणि त्याचे रक्षण करणे, हे तुमचे-आमचे कर्तव्य आहे. तुमचे-आमचे हे तख्त, जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत राहतील तोपर्यंत कायम राहिले पाहिजे, कारण ते आमच्या स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे प्रतीक आहे. अशा त-हेची देशभक्तीची भावना आपल्या मनात फुलली पाहिजे.

लोकशाही यंत्रणा तयार करणा-या तज्ज्ञ मंडळींनी राजकीय सत्तेवर कायद्याची आणि इतर बंधने घालून ती सत्ता समतोल करून ठेवली आहे; परंतु आर्थिक सत्ता ही राजकीय सत्तेपेक्षाही अधिक शक्तिमान आहे. सत्ता हे शेवटी सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. मग ती सत्ता राजकीय असो; आणि म्हणून सत्तेचे स्थान हे लोकांच्या कल्याणासाठी. उभारलेली एक वेदी आहे, एक यंत्रणा आहे. ते एक मोठे जोखमीचे काम आहे, ही जाणीव सतत आपल्या मनात असली पाहिजे. यासांठी एकच मार्ग आहे आणि तो हा की, आपले हे काम लोकशाहीच्या पध्दतीने चालले आहे की नाही, याचे कठोर आत्मनिरीक्षण नित्य झाले पाहिजे.

अत्यंत कष्टाने आपण या देशात जी लोकशाही आणलेली आहे, जे स्वातंत्र्य आणलेले आहे, ती लोकशाही आणि ते स्वातंत्र्य कायम ठेवून या लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या मदतीने या देशामध्ये आपणाला समानता निर्माण करावयाची आहे, गोरगरिबांची गरिबी हटवावयाची आहे आणि लहान व मोठा हा भेद मोडून काढावयाचा आहे. हे महत्त्वाचे काम आम्हांला करावयाचे आहे. पण हे काम आपले आपणच करावयाचे आहे. जे मोठे आहेत ते हे काम करणार नाहीत. लहानांनीच ते केले पाहिजे. पण लहानांच्या मनात जिद्द नसेल, त्यांच्या मनात जागृती नसेल, त्यांच्या मनात गरिबीसंबंधीचा तिरस्कार, संताप नसेल तर लहान, कामाला लागणार नाहीत. लहान, लहान राहिला त्याचे कारण त्याने लहान राहावयाचे ठरविले हे आहे. त्याने आता असा निर्णय घेतला पाहिजे की, मी गरीब राहणार नाही, मी उपाशी राहणार नाही, मी कोणाचा लाचार राहणार नाही. मी या देशाचा मालक आहे. मी स्वतंत्र देशाचा मालक आहे, मी लोकशाहीचा मालक आहे. मला या देशामध्ये लोकशाही टिकविली पाहिजे, स्वातंत्र्याची शक्ती मोठी केली पाहिजे. माझे स्वत:चे जे व्यक्तिमत्त्व आहे, माझे स्वत:चे जे सामर्थ्य आहे, ते मी देशाच्या कामाला लावले पाहिजे. त्यासाठी मला जो जो मार्ग मोकळा दिसेल, तो तो मार्ग मी अंगीकारला पाहिजे. ‘या जिद्दीने तो जर उभा राहिला, तर परक्या देशांतील लोकांना या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची छाती होणार नाहीच, परंतु या देशामध्ये जास्त लोकांना गरीब ठेवून जे थोडे लोक श्रीमंत राहण्याचा पराक्रम करीत असतील त्यांनाही पराभव स्वीकारीवा लागेल. हे मोठे काम आहे, ते तुम्हांआम्हांला करावयाचे आहे.

प्रगत लोकशाहीचा घटक आहे माणूस. प्रत्येक स्त्री व पुरूष. मग तो शहरात राहणारा असो, अथवा खेड्यात राहणारा असो, विद्यापीठाचा पदवीधर असो अगर नसो, त्याचे सामर्थ्य, म्हणजे त्याच्या मनाचे सामर्थ्य, त्याच्या विचाराचे सामर्थ्य, त्याच्या अनुभवाचे सामर्थ्य आणि त्याच्या शीलाचे सामर्थ्य, हे जेणेकरून वाढीस लागेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून. आपणास आपली लोकशाही दृढमूल करावयाची आहे. ही आपली आजची मौलिक गरज आहे. सामर्थ्य देण्याची शक्ती शिक्षणात असते, म्हणून तर आपण शिक्षणाच्या पाठी आहोत.

लोकशाही भारताला नवीन नाही. एकाच सत्याचे विविध मार्गाने दर्शन घेण्याची शिकवण असलेली तत्त्वज्ञान व ग्रामपंचायत संस्था, यामुळे लोकशाहीची पार्श्वभूमी या देशात स्वातंत्र्यापूर्वीच तयार होती. क्रांतीप्रमाणेच लोकशाहीसुध्दा एक देशातून दुस-या देशात आयात करण्याची वस्तू नव्हे. त्या त्या देशातील परिस्थितीप्रमाणे लोकशाही आकार घेईल. भारतात दारिद्र्य-निर्मूलन, समान वाटप, सामाजिक न्याय ही जर लोकशाहीची आधारतत्त्वे नसतील, तर ती लोकशाही इथे टिकणार नाही. म्हणूनच आर्थिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा आधार असली पाहिजे.