यशोधन-१

‘यशोधन’ सुपूर्त करताना  

साहेबांची भाषणे, ते मुख्यमंत्री असल्यापासून मी असल्यापासून मी ऐकत आलो आहे. पाच-पन्नास मैलांच्या परिसरात कोठेही भाषण असले, तरी मी हजर राहत आलो आहे. चांगले शब्द कानांवरून जात. चांगले शब्द मला नेहमीच आकर्षित करत आले आहेत. साहेब हे शब्दांचे जादूगार ! त्यांनी केलेली भाषणे लक्षात राहत व प्रयत्नपूर्वक मी ती ठेवीतही असे. ज्या ज्या वेळी मित्रमंडळी जमत, त्या त्या वेळी त्यांच्या हावभावांची व उच्चारांची नक्कल करून मी दाखवी, त्याची पावती मित्रांकडून मिळत गेली. पुढे पढे सार्वजनिक क्षेत्रातील कार्यकर्ते ‘साहेबांची नक्कल करून दाखव’ म्हणून कोठेही आग्रह करू लागले. नक्कल हुबेहुब होते असे ते म्हणत व मी सुखावत असे. त्याच त्या वाक्यांची पुनरूक्ती होऊ नये म्हणून नवीन वाक्यांच्या शोधात त्यांची भाषणे आवाजांच्या चढ-उतारांसह व लकबींसह मी तल्लीनतेने ऐकू लागलो. नंतर नक्कल हमखास. कार्यकर्ते-मित्र खूष व मलाही प्रसिध्दी. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या नंतरच्या काळात त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असे. आजतागायत त्यात खंड नाही. या माणसाने बोलावे आणि लोकांनी ते आवडीने ऐकावे. त्या प्रचंड गर्दीतील एक श्रोता ही माझी भूमिका. सभेत बसण्यासाठी कुठे जागा मिळेल व भोवताली गर्दी कुठल्या थरातील असेल हे आपल्या हातात नसते. कधी विद्यार्थ्यांच्या कंपूमध्ये, कधी शेतक-यांच्या घोळक्यात, कधी पांढरपेशांच्या शेजारी तर कधी कामगारांमध्ये मी बसलेलो आहे. मुख्य वक्त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत आणि नंतर इतर वक्ते व आभारप्रदर्शनापर्यंत गर्दीलाही कंठ फुटतो. ती बोलू लागले. आपल्या शेजारी कोण आहे, याची पर्वा न करता माणसे भाषणासंबंधी शेरे मारत असतात. अगदी मुक्तपणे. त्यांच्या पक्षातील भक्तगणांपासून ते प्रखर विरोधी पक्षकार्यकर्त्यांपर्यंत. वसंत व्याख्यानमालेला वर्षानुवर्षे जाणा-या, कान तयार असलेल्या श्रोत्यांपासून ते साहेबांना फक्त पाहण्यासाठी आलेल्यांपर्यंत सगळ्यांनाच या माणसाच्या भाषणाने आकर्षित केले आहे. हे निश्चित. केवळ ऐकण्यासाठी लोक तासनतास थांबत. एकदा नाशिकला त्यांची सभा संध्याकाळी सात वाजता जाहीर केली होती.

निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात ते इतर जिल्ह्यांतील दौरा आटोपून येणार होते, दहा-विस सभा उरकून ! मैदान श्रोत्यांनी तुडुंब भरले. साहेब आता येतील, थोड्या वेळाने येतील असे होत होत रात्रीचे बारा वाजले. पन्नास हजारांचा जनसमुदाय बसून होता, फक्त ऐकण्यासाठी. कारण, सर्व काही पक्षकार्यकर्ते किंवा पक्षाची बांधीलकी असलेले श्रोते नव्हते. नाशिकसारख्या जागृत शहरातील सर्व थरांतील, लोक होते. बारा वाजून पाच मिनिटांनी साहेब आले. सर्वत्र शांतता पसरली. मंचावर आल्यावर त्यांनी भाषणाला सुरवात केली. संध्याकाळी सातच्या सभेला रात्री बारानंतर सुरवात! नाही म्हटले तरी लोक अस्वस्थ झालेच होते. आता दिलगिरी व्यक्त करण्याची खाक्यात सुरूवात होईल अशी सर्वांची अपेक्षा. साहेबांनी सुरवात केली, “तिळगूळ घ्या आणि गोड बोला.” कडाडून टाळी पडली. दुस-या दिवशी संक्रांत होती. मध्यरात्रीनंतर तारीख बदललेली होती. एवढ्या औचित्यपूर्ण माफीनंतर पहिल्या वाक्यातच त्यांनी श्रोत्यांना आपल्या ताब्यात घेतले. नंतर तासभर ते बोलत होते. सुरूवातीच्या चार-पाच वाक्यांतच श्रोत्यांना ताब्यात घेणारा हा जबरदस्त वक्ता होता. करंजवण धरणाच्या पायाभरणीचा समारंभ मला आठवतो. पायाभरणीनंतर भाषण होते त्याच जागेवर धरणग्रस्तांपुढे, आपले सर्वस्व पाण्यात बुडवून उठणा-या ग्रामस्थांपुढे! प्रसंग बाका होता धरणग्रस्त प्रचंड संख्येने जमले होते. निषेधाच्या घोषणांपासून ते दंगलीपर्यंत काहीही घडणे शक्य होते. साहेबांनी  सुरूवात केली. “पिढ्यानपिढ्या आपण राहत असलेली गावं सोडून जात असताना, आपली कुलदैवतं, वास्तू, आपण लावलेली झाडं, त्याभोवतालच्या वातावरणात रमलेलं आपलं मन काय म्हणत असेल?  याचा विचार केला की, मन कष्टी होतं. आपल्याला नवीन जागा मिळतील, जमिनी मिळतील, घरांची भरपाई मिळेल परंतु पिढ्यानपिढ्यांच्या सहवासानंतर होणारा दुरावा मोठा बेचैन करणारा असतो...”  वातावरण  भावविवश झाले. म्हाता-या-कोता-या शेतक-यांनी उपरण्यांनी डोळे पुसले. साहेब बोलत होते. स्वत:चाच गाव सोडून आपल्यालाच दुसरीकडे जाण्याची वेळ यावी, या संवेदनेतून बोलत होत. त्यात ते धरणग्रस्तांच्या दु:खात  सहभागी होत होतेच, पण नकळत त्यांना आश्वासनही देत होते की, आम्ही नवीन घर देणार आहोत, तुझे पुनर्वसन करणे ही आमची जबाबदारी आहे व ती पुरी होईलच! कुणी राज्यकर्ता आपल्यावर आश्वासनांची खैरात करतो असे न वाटता हा माझाच कुणीतरी सांत्वन करतोय असे शेतक-यांना वाटत होते. सभेत गोंधळ करण्याच्या तयारीने आलेले लोक, या माणसाच्या राज्यात आपले वाईट होणार नाही, या आत्मविश्वासाने परत गेले.