यशोधन-२

प्रसंगानुरूप व औचित्यपूर्ण हे त्यांच्या भाषणातील वैशिष्ट्य मला नेहमीच जाणवले आहे. त्यांची पाच मिनिटांत संपणा-या भाषणांपासून ते तासभरापर्यंतची भाषणे मी ऐकली आहेत. विषय थोडक्यात आटोपणारा असेल, तर केवळ आपण जास्त बोलले पाहिजे या आग्रहाखातर विषयांतर कधीच होत नाही. राजकीय क्षेत्रात एकदा सभाधीटपणा आला व शब्दांची जुळवाजुळव जमली की, माणसांना बोलण्याचा मोह आवरत नाही. विषयांतर ओघाने आलेच! अशा अनेक पुढा-यांच्या भाषणाचा बळी होण्याचा प्रसंग येतोच. अनेक माणसे चांगले बोलतात. त्यांना आवाजाची साथ नसते. आवाजात चढउतार नसतात. योग्य हातवा-यांची मदत मिळतेच असे नाही. साहेबांचा आवाज (Appealing ) आर्जवी आहे. सातारच्या मातीतून आलेले काही आघात (Accents) सोडले तर पुणेरी उच्चारात साहेब बोलतात. हो; बोलतात हेच खरे! कारण त्यांचे भाषणापेक्षा हितगुजासारखेच वाटते. त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या व्याख्यानांचा परिणाम म्हणून त्यांच्यासारखे बोलण्याचा अनेक कार्यकर्ते प्रयत्न करू लागले. नेहमी ऐकणा-याच्या हे लक्षात येत असे. अशाच एका वक्त्याच्या भाषणानंतर “काय? कसं झाल भाषण?” या खाजगीतल्या प्रश्नाला, “गायकीत घराणी असतात तशी भाषणात असती, तर आपण चव्हाण घराण्यात बोललात.” या उत्तराने मी त्यांचा राग ओढवून घेतला होता. त्यांच्या शैलीचा स्वत:चे घराणे निर्माण करण्याइतका महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर परिणाम झाला आहे. भाषणे ऐकत असतानाच त्यांचा भाषणांची संकलने पुस्तकरूपाने उपलब्ध होऊ लागली होती. त्याची मी पारायणे केली. माझ्या लक्षात आले की, ही भाषणे नुसतीच उत्कृष्ट शबदांची जुळवाजुळव नसून त्यामागे एक निश्चित तत्त्वज्ञान आहे, कार्याच्या दिशा आहेत. अर्थकारण, राजकारण, संरक्षण, शेती, कार्यकर्ता, पक्षकार्य व इतर क्षेत्रांत त्यांचे स्वत:चे असे विचार आहेत व ते सदैव मार्गदर्शन करणारे आहेत. ही एक स्वतंत्र नीतिसूत्रे आहेत याची खात्री झाली. हे विचारधन काळावर मात करून कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शक राहील असेही जाणवले.

मनात अनेक वेळा येत असे, या शब्दसम्राटाबरोबर आपली व्यक्तिगत ओळख झाली, तर काय मजा येईल. हा शब्दांचा जादूगार खाजगी मैफलीत कसा बोलत असेल, असे औत्सुक्य व त्या मैफलीत आपल्याला प्रवेश मिळावा अशी इच्छा मी अनेक वर्षे बाळगून होतो. हळूहळू जाणे वाढू लागले. बरोबर लोक असत. ठरावीक साच्यातील बोलणे होई. भेटायला येणारे इतर लोक येत व इच्छा तशीच राहून जाई. एक दिवस दिल्लीतील कामे आटोपून परत फिरण्यापूर्वी त्यांच्या घरी गेलो. वेळ सकाळची होती. भेटणारे तुरळक होते. दोन मिनिटे भेटण्यासाठी वेळ मिळाला. मी बैठकीच्या खोलीत प्रवेश करून उभा राहिलो. बोलण्याची संधी होती, पण बोलणार काय? “बसा विनायकराव!” या त्यांच्या वाक्यामुळे बसलो. वाटले, आता जिल्ह्यात कोणाचे काय चालले याची विचारपूस होईल. मग पाच मिनिटांत आपली रवानगी. आता काय प्रश्न येतो याची मी वाट पाहात बसलो, “हं, काय? त्या अमूकअमूक माणसाची तुम्ही चांगली नक्कल करता असं मी ऐकलंय.” या प्रश्नाने मला दरदरून घाम फुटला; कारण मी नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या भषणातील चुका व त्यात माझी भर टाकून नक्कल करून मित्रांकडून टाळ्या मिळविल्या होत्या. माझे हे खाजगी प्रयोग स्थळकाळाचे बंधन झुगारून मुक्तपणे चालले होते.

मी ‘त्या’ मंत्र्यांच्या भाषणातील चुकांची नक्कल करतो, हे त्यांना श्री. शरद पवार यांनी सांगितले असावे, हे मला समजायला वेळ लागला नाही. कारण सगळ्यात जास्त प्रयोग पवारांच्याच पुढे झालेल होते. “ आता जरा जपुन बोलत चला” असा सल्ला मिळतो की काय याची वाट पाहत मी बसलो. “बघू या तुमचा प्रयोग” असे त्यांनी म्हटल्यावर मी घाम पुसला. सगळ्या उत्साह परत आणण्याचा प्रयत्न केला. उभा राहिलो. पहिल्या दोन-तीन वाक्यांतच  साहेब खळाळून हसले. टोपी बाजूला काढून लक्षपूर्वक ऐकू लागले, मुक्तपणाने हसू लागले. अगदी डोळ्यांत पाणी येईपर्यंत! वीस-पंचवीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही.