यशोधन-९

काहीवेळा अनेक मार्ग समोर दिसतात. या मार्गाने गेलो तर मुक्कामावर पोहोचू की त्या मार्गाने गेलो तर पोहोचू, असा ज्यावेळी मनात संभ्रम निर्माण होतो त्यावेळी नेमके कोणत्या मार्गाने गेले पाहिजे हे ज्याला समजेल, तो नेता. नेत्याची माझी व्याख्या ही अशी आहे.
 
आपल्याकडे निवडणुका आल्या की, आपण जागे होतो. मग कोण कोण कार्यकर्ते आहेत, कोणा कोणाच्या मनात बाशिंग बांधावयाचे आहे, याचा शोध सुरू होतो. परंतु अशी परिस्थिती असणे उपयोगाचे नाही. ग्रामीण पध्दतीने सांगावयाचे झाले, तर पहिलवान असा तयार असला पाहिजे की, सांगेल तेव्हा तो कुस्तीला उभा राहील. अगोदर करार करून आणि मग खुराक खाऊन, अमक्या अमक्या तारखेला कुस्ती लढतो असे म्हणणे ही कुस्ती नव्हे. बोलणे झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत तो दानात आला पाहिजे आणि कुस्ती झाली पाहिजे.

मला अभिप्रेत अललेला समाजवाद हा केवळ एक आर्थिक सिध्दांत नाही. तो मूल्यावरही आधारलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, हा आपल्या विचाराची व आचाराची आधारशील असली पाहिजे. पिढ्यानपिढ्या हरिजन आणि गिरिजन यांची अवहेलना होत आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहेत. सामाजिकदृष्ट्या नि आर्थिकदृष्ट्या त्यांचे शोषण चालू आहे. राष्ट्रीय जीवनाच्या मंझधारेपासून त्यांना अलग करण्यात आले आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनातील हे वैगुण्य आपण किती लवकर नाहिसे करणार आहोत, यावरचआपल्याला समाजवादाचा कोणता आशय अभिप्रेत आहे हे ठरणार आहे. जोपर्यंत हे वैगुण्य दूर होत नाही तोपर्यंत सामाजिक उद्दिष्टांची चर्चा करणे निरर्थक आहे. ते काम सोपे नाही. समाजाचे महावस्त्र नव्याने विणावयाचे आहे. त्यासाठी गरज आहे ती समर्पणशीलतेची आणि ध्येयवादी आवेशाची.
 
राजकारण एखादे पद प्राप्त झाले की, त्याला नेता म्हणायचे, ही सवय जितक्या लवकर दूर होईल, तितकी त्याची गरज आहे. राजकारणातला प्रमुख म्हणजे समाजाचाही नेता ही चुकीची व्याख्या आहे. नेतृत्व हा शब्द व्यापक अर्थाचा आहे. वेगवेगळ्या शास्त्रांत प्रगती घडत आहे. वेगळे आदर्श निर्माण होत आहेत. त्याचा काही सामूहिक परिणाम घडत आहे. हा सामूहिक परिणाम घडविणारे त्या त्या क्षेत्रांतील जे कोणी आदर्श असतील ते खरे नेते. नव्या आदर्शाचा संपूर्ण समाजजीवनावर परिणाम करण्यासाठी, त्याचा वापर करणारी जी माणसं  असतात, त्यांच्या ठिकाणीही नेतृत्त्व असतेच. नेतृत्त्वात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करण्याचेही कारण नाही.
 
माणसांच्या मनाची मशागत करणे आणि त्यांचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्त्वाच्या कसोट्या मानल्या तर टिळक, गांधी, नेहरू यांनी त्या अर्थाने खरे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्त्वाला काही एक वेगळा अर्थ आहे. टिळक, गांधी यांच्या हाती सत्ता कधीच नव्हती. त्या दृष्टीने सरकारचे नेतृत्त्व म्हणजे समाजाचे नेतृत्त्व असे मानणे अपुरे आणि अशास्त्रीय आहे. याचा अर्थ राज्याचे नेतृत्त्व करणारे समाजाचे नेतृत्त्व करू शकत नाहीत, असा नव्हे.
 
मला कोणी एखाद्या कॉंग्रेसवाल्याची परिक्षा करावयास सांगितली, तर प्रथम मी त्याची नाडी तपाशीन, म्हणजे त्याच्यामध्ये जिद्द आहे की नाही हे प्रथम पाहीन. तो हुशार असेल पण त्याच्यात जिद्द नसेल, तर त्याचे कॉंग्रेसप्रेम माझ्या उपयोगाचेही नाही. एक जुनी कहाणी सांगतात की, रामाला युध्दात विजय मिळाला आणि लंकेहून परत आल्यानंतर सीतामाईने हनुमानाला नवरत्नांचा हार दिला. त्याने तो हातात घेतला आणि त्या नवरत्नांतले प्रत्येक रत्न त्याने दाताने फोडले. सीतामाईने ते पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “ शेवटी वानर तो वानरच. तुला मी नवरत्नांचा हार दिला त्याच् तू हे काय केलेस?  कशाकरिता तू ही रत्ने फोडलीस ?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “ या नवरत्नांत कोठेतरी आत राम आहे की नाही ते मी पाहिले;  आणि त्यात जर राम नसेल तर या नवरतनांचा मला काय उपयोग आहे?”  त्याचप्रमाणे कोणत्याही कॉंग्रेसवाल्यामध्ये अन्यायाविरूध्द लढण्याची, गरिबीविरूध्द लढण्याची, विषमतेविरूध्द लढण्याची जिद्द आहे की नाही, या सर्व गोष्टींसंबंधी त्याच्या मनात तिरस्कार आहे की नाही, त्याविरूध्द झगडण्याची त्याच्या मनात ईर्षा आहे की नाही हे मी पाहीन. ही जिद्द, ही ईर्षा जर त्याच्यात नसेल, तर माझ्या मताने तो मृत काँग्रेसवाला आहे.