व्याख्यानमाला-१९७८-३

समाजक्रांतीसाठी झगडणारे जे रणझुंजार महापुरुष होऊन गेले त्यात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करावा लागेल. माझे भाग्य थोर की मला डॉ. बाबासाहेब जवळून पाहता आले. माझ्यासमोर उभे राहते ते नागपूरचे दीक्षा मैदान, बौद्धधर्म स्वीकरण्यासाठी देशाच्या कोनाकोप-यातून आलेला पाच-सहा लाखांचा जनसमुदाय, बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी आलेले भिक्कू महाथेरो चंद्रमणी आणि त्यांचे सहकारी, देशविदेशातील पाहुणे, सुंगधी फुलांच्या माळानी सजविलेला रंगमंच आणि एक ऐतिहासिक निर्णय घेऊन दलितांच्या मुक्तिसंग्रामाच्या नव्या पर्वाचा आरंभ करणारे धीरगंभीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! हा सुवर्ण दिवस मी कसा विसरु शकेन ? याच भव्य रंगमंचावर प्राचार्य म. भि. चिटणीस यांचे 'युगयात्रा' हे नाटक लाखो लोकांच्या उपस्थितीत आम्ही सादर केले होते. रामायणकालापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत अस्पृश्यांवर जे अत्याचार झाले त्याचे दर्शन घडविणारे विविध प्रवेश चिटणीसांनी लिहिले आहेत. त्यातला नभोवक्ता म्हणतो, आजपर्यंत ज्यांची माणुसकी हिरावली जाऊन पशूहूनही हीन जगणं ज्यांच्या कपाळी आलं होतं त्या सर्वांच्या अन्यायाविरुद्ध धुमसणारा मूक क्षोभ ज्या पुरुषाच्या अंत:करणात प्रकट झाला तो महापुरुष म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर !

या महापुरुषाच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या मिलिन्द महाविद्यालयात मी शिकवीत होतो. बाबासाहेबांच्या विचारानं घडत चाललेली तरुण मन वसतिगृहात पाहत होतो. त्यांची सुखदु:खं, त्यांची स्वप्नें, त्यांच्या आशा आकांक्षा समजावून घेत होतो. गावकुसाबाहेरच्या या जगाला कोणी अस्मिता दिली असेल तर ती बाबासाहेबांनीच. त्यांनीच या उपेक्षित, दलित मनाला वाचा दिली. त्यांनीच त्यांचा स्वाभिमान जिवंत केला. देश स्वतंत्र झाला आहे त्याला आज पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी दलित माणसाला वाटते आहे की हा देश माझा आहे का ? माणूसपणा नाकारणा-या या समाजात माझी जागा कोणती? वेदना ही विद्रोहाच जननी आहे. या तीस वर्षात जर काही घडलं असेल तर जे आजवर दडपले गेले होते ते 'माणूस' म्हणून मानानं जगण्यासाठी संघर्ष करायला सिद्ध झालेले आहे. त्यांनी किती दिवस पाह्यची ? त्यांना या देशात अन्न, वस्त्र आणि आसरा धड मिळत नाही ही काय अभिमानाची बाबा आहे? राजकारणी माणसे सत्तेच्या खेळात दंग आहेत. या ना त्या मार्गानं सत्ता मिळवायची आणि आत्मकल्याण करुन घ्यायचे हा आजचा मंत्र आहे. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हणतात पण अनुभव असा की सत्तेलाच शहाणपण नाही. सत्तेपुढे न वाकता सत्यासाठी आग्रह धऱला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता आणि संपत्ती प्रथमच आली त्यांना ती भोगण्यापलीकडे दुसरे काहीच माहीत नाही. सत्ता आणि संपत्ती  या आंधळ्या शक्तीतले हलाहल पचवायला 'यती' वृत्तीची माणसे लागतात. आज 'यती' ऐवजी 'ययाती' चा सुळसुळाट आहे. भोगभोगूनही ही माणसे अतृप्त आहेत. भोगण्यासाठी ती कुणाचाही बळी घेतात. आज सत्तापूजन, द्रव्यपूजन इतके वाढले आहे की या देशात त्यामुळे वैचारिक, भावनिक, अनर्थिक, नैतिक अराजकाचा वणवा पेटला आहे.

समाजाची आर्थिक दु:स्थिती,  मानसिक दुरवस्था, जीवनकलहामुळे कुटुंब-व्यवस्थेची झालेली मोडतोड, दिशाहीनता जुन्या मूल्यांचा विध्वंस, नव्या श्रद्धांचा अभाव इ. अनेक दुखणी समाजाची आहेत. स्वातंत्र्य मिळूनही सामान्य माणूस सुखी नाही. 'गरीबी हटाओ' इ. अनेक घोषणा होतात, अनेक कलमी कार्यक्रम जाहीर होतात. पण सामान्य माणूस अन्याय सहन करतो, दारिद्रय भोगतो, छळ सोसतो. या सामान्य माणसाच्या बाजूने डॉ. आंबेडकर उभे राहिले. डॉ. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर 'भारताचा शोध' घेणारे पंडितजी आमच्या मिलिन्द महाविद्यालयात आले होते तेव्हा ते म्हणाले की हिन्दु समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे प्रतीक म्हणजे डॉ. आंबेडकर ! फ्रान्समधील एमिल झोला हा महान ललितलेखक सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून I accuse  अशी गर्जना करीत राजसत्तेविरुद्ध दंड थोपटून निर्भयपणे उभा राहिला. त्याची श्रद्धा होती की व्यक्ती काय जन्मते आणि मरते पण त्याचा विचार मात्र कधीच मरत पावत नाही. कारण सत्ता शासन करते आणि विचार चिरडण्याचा प्रयत्न करते पण सत्ता आज आहे उद्या नाहीशी होते. पण न्याय-नितीसाठी झुंजणा-या व्यक्तीचा विचार मागे राहतो. तो विचार पिढ्यानपिढ्याचे घन बनतो.