यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९५

रूढ अर्थाने यशवंतराव समीक्षक नाहीत, पण सामन्यांच्या साहित्यविषयीच्या जाणीवा प्रगल्भ करणारे त्यांचे साहित्यविषयक लिखाण आहे. यशवंतरावांचे 'मराठीचे सर्वसंग्राहक स्वरूप', 'साहित्य आणि प्रबोधन', 'चरित्रे आणि आत्मचरित्रे', 'प्रकाशाचा लेखक', 'साहित्यिकांची जबाबादरी', 'साहित्य आणि संस्कृती','माझा विरंगुळा', 'लोकभाषा हीच ज्ञानभाषा', 'सोन्याचा सोहळा,'  'आजच्या साहित्याकडून अपेक्षा', 'मराठी रंगभूमीची अखंड परंपरा', 'इतिहासाचे मर्म' या लेखातून साहित्यविषयक निखळ भूमिका मांडली आहे. यातून त्यांची भूमिका आस्वादक समीक्षकाची आहे हे स्पष्ट होते. यातून त्यांनी अभिजाततेला प्राधान्य दिले आहे. वाङ्मय समीक्षेबाबतची आपली मते निर्भिडपणे व्यक्त केली. त्यांचे लेखन हे आस्वादक समीक्षेचा एक नमुना ठरते. प्रचारकी साहित्य आणि वाङ्मयांतर्गत प्रबोधन यांच्यात त्यांनी फरक केला आहे. त्यांना वाङ्मयाच्या ललितरुपाने भान होते. म्हणूनच  वास्तवाचा आग्रह धरताना त्यांनी कल्पनाशक्ती, प्रतिभा यांना गौण मानले नाही. हे त्यांचे लक्षणीय विशेष नोंदवणे आवश्यक आहे.

रसिक मराठी भाषिक, साहित्यप्रेमी, मर्मज्ञ व समतोल भाष्यकार हा वाङ्मयीन प्रगतीचा घटक आहे असे मानणा-या यशवंतरावांनी सतत वाङ्मयविकासाचाच विचार केला आहे. साहित्य आणि समाज याचा त्यांनी विचार मांडला. साहित्य आणि समाज, साहित्य आणि भाषा, साहित्य आणि अनुभव, साहित्य आणि इतर मानवी व्यवहार यांचे तारतम्याने आकलन करून त्यांनी विचार मांडले आहेत. भाषेच्या शक्तीचेही पुरेसे आकलन त्यांना असल्याचे प्रत्ययाला येते. यशवंतरावांच्या साहित्यविचारात साहित्यकृतीतील आशयाच्या संपन्नतेला महत्त्व आहे. जीवनातील सत्याचा शोध, चिरंतन जीवनमूल्याधिष्ठित विचार कलाकृतीतील आत्मिक सौंदर्य शोधले पाहिजे. साहित्याची संस्कारक्षमता लक्षात घेऊन त्यांनी आपला साहित्य विचार मांडल्यामुळे ते वाचकाच्या अभिरुची संवर्धनाच्या बाबतीत अधिक दक्ष दिसतात. यशवंतरावांनी विविध ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. या प्रस्तावनांमधून यशवंतरावांची अभिजात साहित्यिक रसिकता प्रकट होते. तसेच त्यांचे भावस्पर्शी संवेदनशील मन आणि मार्मिक समीक्षा व आस्वादक पाहावयास मिळते. तसेच या प्रस्तावनेतून त्यांची कल्पना आणि चिकित्सक बुद्धी व साहित्यविषयक रूची प्रत्ययास येते. या प्रस्तावनेतून प्रत्यक्ष अनुभवांचा आलेख येतो. जीवनाच्या तटस्थ बिंदूवरून पाहात असताना मनात निर्माण होणारी चिंतनवलये त्यांच्या प्रस्तावनेत अधिक आहेत.  तसे गंभीर स्वरुपाचा साहित्याविषयक विचार, देशहिताची भावना आणि देशाच्या एकात्मतेची व समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची, अपेक्षित परिवर्तन घडवून आणण्याची अपेक्षा केली आहे. त्यांच्या प्रस्तावनापर लेखनात स्वागताचा आणि प्रोत्साहनाचा तन्मयतेने घेतलेल्या रसास्वादाचा मोठा भाग आहे. तसेच त्या त्या साहित्यकृतीच्या आंतरिक सौंदर्याचा विचार हे यशवंतरावांच्या साहित्यविचाराचे बलस्थान आहे. त्यामुळे प्रस्तावनेतील ललित शिफारसी म्हणजे त्यांचे निर्भेळ साहित्यिक कलाकृतीचे केलेले मूल्यमापन होय. यशवंतरावांनी श्रेष्ठ साहित्याच्या निकषाचा विचार करून आशयाच्या संपन्नतेचे महत्त्वही विशद केले आहे. यशवंतरावांनी लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, भोवतालच्या वास्तवाचा, वाङ्मयीन अभिरुचीचा आणि वाङ्मयीन संस्कारांचा केलेला विचार भौतिक स्वरुपाचा आहे. यशवंतरावांची ही साहित्यविषयक चिकित्सा आणि चिंतन म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे. यशवंतरावांच्या या प्रस्तावना लेखनात समतोल, चिंतनशीलता, विद्वत्ता, व्यासंग आणि प्रतिभाशक्ती पाहावयास मिळते. साहित्यावरील उदंड प्रेम, गुणग्राहक वृत्ती, लेखकाला आनंद व प्रोत्साहन देण्याचे त्यांच्या ठायी असणारे सामर्थ्य आणि बरेवाईट रोखठोकपणे सांगणारी स्वच्छ शैली यांचे मर्मस्पर्शी दर्शन घडते. समजून घेणे व समजून देणे अशी दुहेरी समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हे लेखन लेखकांना व वाचकांना उपकारक ठरले आहे.

यशवंतरावांनी केलेली भाषणे ही निबंध शैलीतील लेखनासारखी वाटतात. त्यामुळे त्यातील वैचारिकता सुटत नाही. केलेली भाषणे आणि प्रासांगिक लेखन अथवा मांडलेले विचार त्यांच्याजवळील प्रगल्भ सांस्कृतिक संचित आहे. त्यांनी भाषणांतून अस्तित्वगामी विचार मांडला. त्यांच्या भाषणात अपेक्षित असलेली सर्वसमावेशकता दिते. नवोदितांना, नेत्यांना, समाजसेवकांना ते प्रोत्साहन देण्याची भाषा करतात. अवाङ्मयीन वृत्तीवर तोंडसुख घेतात. अभिरुची, निर्मिती, कलात्मकता यावर ते भर देतात. वाङ्मयाबद्दलची निकोप, एकनिष्ठवृत्ती त्यांच्या साहित्यविचारात आहेत. वाङ्मयाबद्दल आपुलकी व वाङ्मयाला सर्वस्व मानणारा संवेदनशील माणूसच असा विचार करू शकतो.