यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९३

अन्याय, अत्याचार, पक्षपात, हिंसाचार न होईल अशी दक्षता घ्यावी लागेल. असे झाल्यास आर्थिक, सामाजिक विषमता दूर होईल वर्गसंघर्ष  व जाती संघर्ष होणार नाही. वितुष्ट निर्माण होणार नाही. ते टाळले पाहिजे. त्यासाठी समाजातल्या सर्व लोकांनी, शासन व नेत्यांनी पुढाकार घ्यावा व जातीय संघर्ष टाळायचा असेल तर "वर्गसंघर्षाने हिंसक वळण घ्यायला नको असेल, तर वर्गविग्रहाची भावना दूर करायला हवी. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, एवढ्याचसाठी कुणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे आहे. आजही कुणी दरिद्री असेल, गरीब असेल, तर तो दोष त्यांचा नसून संपूर्ण समाजव्यवस्थेचा आहे, असे मानले पाहिजे. ते न करता वर्ग संघर्ष हिंसक राहणार, की अहिंसक राहणार ही चर्चा नुसती पोकळ व कोरडी ठरणार आहे. समाजात विविध स्तरांवरील वर्ग आहेत व त्यातला एक वा अनेक सबल वर्गदुस-या कमकुवत वर्गांचे शोषण करतात, छळ करतात, हेच वर्गसंघर्षाचे मूळ कारण आहे." यशवंतरावांच्या या वरील मजकूरावरून त्यांची जातीयता आणि वर्गसंघर्षाबाबतचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. माणूस म्हणून असलेली त्याची महान प्रतिष्ठा त्याला प्राप्त व्हावी. त्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा असा सल्ला ते देतात.

यशवंतराव सतत माणसांच्या वेढ्यात असत. त्यांच्या स्थानाचा विद्वत्तेचा, अनेकांना लाभ झाला. यशवंतरावांचा राजकारणाशी अतिशय जवळचा संबंध होता. त्यामुळे त्यांचे बरेच प्रासंगिक लेख हे राजकारणातील चालू घडामोडींवर आधारित आहेत. त्यामुळे या लेखांचा वर फक्त उल्लेखच केला आहे. त्यांचे या प्रांतातील लेखन विपुल आहे. त्याची नोंद घेण्याइतपत ते सकस व दर्जेदार आहे. ते सर्वच लेखन वैशिष्टयपूर्ण आहे. या सर्व लेखांतून यशवंतरावांचे आगळेवेगळे दर्शन घडते. एक राजकारणी म्हणून, विचारवंत म्हणून, राजकारणाच्या चालू घडामोंडीवरील भाष्यकार म्हणून, ते या लेखांतून प्रकट होताना दिसतात. शिवाय लेखक विचारवंत म्हणून, जेवढे वाचकांसमोर येतात तेवढेच कमालीच्या नाजूक, कोमल भावना जपणारा 'माणूस' म्हणूनही या लेखांतून दिसतो. त्यांच्या या लेखनाबाबत प्रा. ना. सी. फडके असा उल्लेख व गौरव करतात. "यशवंतरावांचं पडलेलं भाषण कधी कुणी ऐकलेलं नाही.क्वचित प्रसंगी त्यांची लेखनाची पातळी इतक्या उंचीवर गेलेली असते की, ती पाहून मी स्तिमित होतो... भावनेनं ओथंबलेलं, प्रभावी भाषेनं नटलेलं हे लेखन जी लेखणी करू शकते, ती साधीसुधी लेखणी नाही. श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातात शोभावी अशीच ती आहे." यशवंतरावांच्या साहित्यविषयक गुणांचा अर्कच प्रा. फडके यांनी सांगून टाकला आहे.

यशवंतरावांनी प्रासंगिक लेखन हे वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, दिवाळी अंक, विविध पुरवण्या इ. मधून केले आहे. या लेखनाचे स्वरुप विभिन्न आहे. सर्व लेखनाचा पोत एकसारखा नाही. बरेच लेखन हे राजकीय स्वरुपाचे आहे. या लेखनातूनही त्यांची रसिक वृत्ती व वकिली बाणा दिसतो. जीवनातील अमंगल आणि मंगल प्रसंगाचा जो अनुभव आला त्याचा पट उलगडून दाखविण्याचा
त्यांनी प्रयत्न केला आहे. भाषण करताना त्यांना कधी वाचून दाखवावे लागले नाही. ते त्यांना आपोआप स्फुरत असे. भाषणातील विचारांशी ते नेहमी आग्रही राहात. हळुवारपणाने श्रोत्यांच्या मनाचे एकेक कप्पे ते उघडत असत. त्यामुळे लोक तल्लीन होऊन ऐकत. लोकांना तो आपलाच माणूस वाटे. त्यांच्या भाषणाला कसला दर्प नसे. त्यामुळे आपलेच प्रश्न, आपलीच सुखदु:खे त्यांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत असे श्रोत्यांना वाटत असे. असा मजबूत शब्दांचा,सच्चा, विनम्र स्वभावाचा, दिलाचा पक्का, शालीन, नम्र असा हा नेता होता. त्यामुळे मराठी भाषणांच्या वैभवशाली भाषासौंदर्याने राजकारणात एक स्वतंत्र युग त्यांनी निर्माण केले. असे हे युगंधर लोकनेते भाषासामर्थ्याच्या दृष्टीनेही समर्थ ठरतात व नवमहाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरतात.