यशवंतरावांच्या विविध गुणकर्तृत्वाचा आलेखच येथे या लेखकाचे उभा केला आहे. त्यांच्या या विविध विषयांवरील भाषणांत अफाट माहितीचे भांडार आहे. तसेच चिंतनशील विचार व श्रोत्यांबद्दल जिवंत कळकळही दिसते. या भाषणांतून त्यांच्यातील विद्वत्ता, तात्त्विकता, जागोजागी पाहावयास मिळते. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. ना. सी. फडके त्यांच्या वक्तृत्वाबद्दल लिहितात. "हजारो लोकांची विराट सभा असो किंवा शे-पाचशे निवडक श्रोत्यांची सभा असो, ही हमखास जिंकण्याचं कौशल्य, यशवंतरावांनी कमावलेलं आहे. श्रोत्यांच्या भावनांना आवाहन करण्याचं आणि त्याचप्रमाणे वैचारिक प्रतिपादनान श्रोत्यांना जिंकण्याचं दोन्ही प्रकारचं कौशल्य त्यांच्या वक्तृत्वात आढळतं. प्रतिपक्षाला घायाळ करण्याचं चातुर्य ते अनेक वेळा प्रगट करतात. त्यांच्या भाषणाला अवश्य तेवढी विनोदाची झालरच असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की, त्यांचं भाषण अत्यंत प्रमाणबद्ध आणि आटोपशीरही असतं. महाराष्ट्राच्या नामांकित वक्त्यांत यशवंतरावांची गणना अवश्य करावी लागेल." यशवंतरावांच्या गुरूंनी आपल्या शिष्यांबद्दल व त्यांच्या भाषणाबद्दल लिहिलेल्या प्रतिक्रिया स्पृहणीय तर आहेतच शिवाय एकूणच त्यांच्या भाषणगुणाचे कैतुक व मूल्यमापन करणा-या आहेत.
यशवंतरावांची भाषणे ही ललित निबंध वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून त्यांच्या निबंधशैलीतील शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील भाषणे महत्त्वाची आहेत. या भाषणातून मुद्देसूद मांडणी, अंत: करणाला भिडणारी भाषा, राककीय दूरदृष्टी यांचा संगम त्यांच्या भाषणात दिसतो. यशवंतरावांची ही भाषणे निबंधाच्या व्याख्येत चपखपणे बसतात. कारण निबंधाचे स्वरुप 'कोणालातरी उद्देशून बोलल्यासारखे' असते किंवा वाचकाला उद्देशून लेखक बोलत असतो. तसेच यशवंतरावांनी सुद्धा श्रोत्यांना व समाजाला आपले विचार सांगितले आहेत. त्यामुळे त्यांची भाषणे वाचताना ही भाषणे वाचत नसून निबंध वाचतो आहोत अशी जाणीव होत राहते. ग्रामीण जीवनपद्धतीत विविध स्तरांवरील सुसंस्कृत व्यक्तींचा सहवास या सर्वांचा संस्कार त्यांच्या या ललितरूपी भाषण साहित्यावर झालेला आहे. त्यांनी या साहित्यातून मराठी माणसाला स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारा विचार मांडलेला आहे. एकूणच राष्ट्राची उभारणी करण्याचा मनोदय त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आत्माविष्कारासाठी विचार प्रकटीकरण हा हेतू न ठेवता संवेदन वृत्तीने सामाजिक, शैक्षणिक विषयावर राष्ट्रीय भावनांनी भरलेले विचार ते मांडतात. साहजिकच हे विचार एखाद्या प्रबंधासारके वाटतात. यामुळे या विषयावरील भाषणे ही मराठी भाषेवरील त्यांचे विलक्षण प्रभुत्व दाखवणारी आहेत. शिवाय मरगळलेल्या सामाजिक जाणिवा दूर करण्याचे महत्त्वाचे काम यशवंतरावांच्या भाषणांनी केले आहे थोडक्यात समाजजीवनामध्ये परिवर्तन घडवून एकसंध, समृद्ध समाज निर्माण व्हावा अशी वास्तव अपेक्षा ते व्यक्त करतात.
यशवंतरावांनी इतर विषयावर दिलेली भाषणे आशय, आविष्कार व अभिव्यक्तीच्या दृष्टीने महत्तवाची असल्याने तीही अभ्यासाचा विषय बनतात. या भाषणांतून त्यांनी उद्बोधन आणि प्रबोधनाची भूमिका स्वीकारल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी अनेक योजना राबविल्या पाहिजेत व त्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत. या दृष्टीने आर्थिक राजकीय, संरक्षण, परराष्ट्र धोरण इ. विषयावर मुक्त चिंतन केले आहे. जनतेला न्यायाची, समानतेची नि विकासाची शाश्वती देण्यासाठी या विषयांवर अनेक व्यासपीठांवरून विचार मांडले. आर्थिक विकासावर अधिक भर दिला. त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर दिलेल्या भाषणांतून समाज प्रबोधनाचे शिक्षण दिले व तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. राजकारण हेच समाजकारण व्हावे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. तसेच भारतीय जवानांना पुरुषार्थाची प्रेरणा देऊन त्यांचे स्फुल्लिंग जागृत करण्याचे काम त्यांच्या अनेक भाषणांनी केले आहे. या भाषणातून देशाच्या ऐक्याचा आणि स्थैर्याचा प्रश्न सतत मांडला. सर्वांचे मनगट एका सामर्थ्यांने बांधले गेले पाहिजे म्हणजे ऐक्य व स्थैर्य प्रस्थापित होईल असा विश्वास ते व्यक्त करतात.