विरंगुळा - ६६

या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचे कार्यक्रम चढत्या भाजणीनं सुरू राहतील यासाठी त्यांनी धोरणात्मक आखणी सुरू केली. राज्यानं विविध क्षेत्रांत अग्रेसरत्व प्रस्थापित करण्यासाठी काही महत्वाकांक्षी योजना त्यांच्या मनात घोळत असाव्यात. एक वेगळं स्वप्न ते पहात होते. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्य हे अस्सल पुरोगामी आणि समृद्ध राज्य बनण्याचं चित्र त्यांच्या मनात तयार झालं होतं. देशाला त्याचं दर्शन घडवायचं होतं.

दरम्यान अनपेक्षितपणे नाट्यमय परिस्थितीला त्यांना सामोरं जाण भाग पडलं.

सत्येच्या नाटकाची नांदी

६ नोव्हेंबर १९६२! यशवंतराव मुंबईत सचिवालयात नित्याची कामं पहात होते. तेवढ्यात अचानक फोन खणखणला. नव्या नाट्यप्रसंगाची ती नांदी होती. दिल्लीहून पंतप्रधान पं. नेहरू बोलले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालतान अन्य कोणी नाही ना याची खात्री करून घेतली आणि तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याबद्दल 'हो' किंवा 'नाही' एवढचं उत्तर मला पाहिजे असं निर्वाणीचं सांगितलं. पुढं म्हणाले, तुम्हास दिल्लीस 'संरक्षणमंत्री' म्हणून यावं लागणार आहे. मला तुमचं मत ताबडतोब हवं आहे. यावर ''जेव्हा आणि जिथं कुठे माझी आपणास गरज पडेल तिथे आणि त्यावेळी मी निश्चित येईन; परंतु माझी तिथे येण्याची गरज आहे का, हे एकदा तुम्हीच कृपा करून मनाशी निश्चित व पक्के केलेले बरे.'' यशवंतरावांनी सांगितलं.

१९६२च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर देशात संरक्षणविषयक निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात, राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ नेत्यानं - पं. नेहरूंनीच यशवंतरावांना दिल्ली येण्याची हाक दिली होती. हे सर्वच अनपेक्षित होतं. दिल्लीची भूमीच अशी आहे की, तिथे घडतं ते बहुतेक अनपेक्षित! फार फार पूर्वीपासून हे सुरू आहे. पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात दाखल होण्याची घटना अशी नाट्यपूर्ण घडली. कृष्ण मेनन त्यावेळी संरक्षण मंत्री होते.
दिल्ली ही मायानगरी असली तरी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची समारंभपूर्वक घोषणा करण्यासाठी १ मे १९६०ला पं. नेहरू मुंबईत आलेले असताना, त्या समारंभात बोलताना ''हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावेल'' असा 'शब्द' दिला होता. ती वेळ आता आली. पं. नेहरूंचीच हाक यावी ही महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी घटना असली तरी सह्याद्रीवर यशवंतरावांचा मुक्काम आणखी काही काळ वाढावा, घडावा असं महाराष्ट्राला वाटणं स्वाभाविक होतं. महाराष्ट्राला त्यांच्या अस्तित्वाची नितांत गरज होती.

संरक्षणविषयक आणीबाणीच्या काळात देशाची हाक आल्यानं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं विदर्भाचे नेते मारोतराव कन्नमवार यांच्या स्वाधीन करून संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी यशवंतराव २० नोव्हेंबर १९६२ला जड अंत:करणानं दिल्लीला गेले. दिल्लीला जाण्यासाठी मुंबईहून निघाले त्यावेळच्या त्यांच्या मनस्थितीवर प्रकाश टाकणारे एक पत्र उपलब्ध आहे. दिल्लीत पोहोचल्यावर ता. २१ नोव्हेंबर १९६२ ला त्यांनी पत्नी वेणुताईना जे पत्र लिहिले त्यात ते नमूद करतात-
------------------------------------------------------------