विरंगुळा - ६८

६ नोव्हेंबरला पंडितजी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांचे खलबत झाले. केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री आणि मुख्यमंत्री यांची नामावली तपासली. ती तपासत असताना यशवंतरावांच्या नावाशी दोघेही थांबले आणि एकमत होताच पंडितजींनी यशवंतरावांना फोनवरून आदेश दिला. मेनन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता परंतु काँग्रेस कार्यकारिणीच्या ६ नोव्हेंबरच्या बैठकीत सभासदांनी ''आज मेननची पाळी आली आहे, उद्या तुमच्यावर येईल'' असे पंतप्रधानांना परखडपणे सुनावल्यामुळे पं. नेहरूंना धक्का बसला. मेनन यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पं. नेहरूंनी ७ नोव्हेंबरला जाहीर केलं.

घटना झपाट्यानं घडत राहिल्या. संरक्षण खात्याची जोखीम पंतप्रधानांनी स्वत:कडं घेतली. ताबडतोब दिल्लीला या असा यशवंरावांना फोनवरून निरोप दिला. विचार करायला यशवंरावांना अवधीच उरला नाही. १० तारखेला ते दिल्लीत पोचले.

''संरक्षणाच्या प्रश्नाचं आपल्याला काही ज्ञान, त्यासाठी कांही काळ खर्च करावा लागेल, देशभक्तीशिवाय अन्य कुठलीही पात्रता आपल्याजवळ नाही.'' असं यशवंतरावांनी कृतज्ञतेनं पंडितजींना सांगितलं. मनातील काही घरगुती समस्यांचाही उल्लेख केला. त्यावर ''जे काही करायचं ते तुम्ही लवकर आत्मसात कराल. मला इथं राजकीय नेतृत्व देईल असं कुणी हवं आहे. तुम्ही दिल्लीला असणं माझ्या दृष्टीनं आवश्यक आहे.'' पंडितजींनी स्पष्ट केलं.

''आता अधिक विचार करावा असं काही उरलेलं नाही. संरक्षणमंत्रीपद तुम्हाला बहाल करतोय हे पाहून टी. टी. कृष्णम्माचारी बरेच खवळले आहेत परंतु मी माझा निर्णय केलेला आहे. तुम्ही आता मुंबईला परत जा, कारण तुम्हाला तातडीनं परतायचं आहे.'' असं दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या भेटीत पं. नेहरूंनी निर्वाणीचं सांगितलं. मागोमाग १४ नोव्हेंबरला, यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनल्याचं दिल्लीनं जाहीर केलं.

येथपर्यंत घटना घडल्या परंतु हे नाटक इथंच थांबायचं नव्हतं. मुंबई सोडून २० नोव्हेंबरला यशवंतराव दिल्लीत पोहोचले त्या रात्री बिजू पटनाईक त्यांना भेटण्यासाठी आले. संरक्षण खाते स्वत:कडं घेतल्यावर पं. नेहरूंनी पटनाईक यांना सल्लागार म्हणून जवळ केलं होतं. कृष्णम्माचारींप्रमाणे पटनाईक हेही संरक्षण खात्यावर कबजा करण्यासाठी उत्सुक होते. चव्हाणांच्या या पहिल्याच भेटीत पटनाईक यांनी संरक्षणविषयक विविध समस्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. 'लष्करी डावपेच' म्हणून जे म्हणतात त्या बाबतीत यशवंतरावांना सज्ञान करावं, असा त्यांचा हेतू असावा. यशवंतरावांनी फक्त श्रोत्याची भूमिका बजावली तेव्हा गप्पांच्या अखेर टप्प्यात ''तुम्ही दिल्लीला, इतक्या लवकर कशाला आलात?'' असा प्रश्न विचारला. चीन झपाट्यानं पुढं सरकत असून कदाचित मुंबईला धोका निर्माण होऊन मुंबई हीच युद्धभूमी बनण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्ही मुंबईतच असलं पाहिजे असा सल्लाही दिला.