विरंगुळा - ६१

येत्या वर्ष-सहा महिन्यांचा काळ राजकीय परिस्थितीमुळे अत्यंत आणीबाणीचा व कसोटीचा ठरणार आहे असे निश्चित वाटू लागले आहे. मानसिक एकाकीपणाचा मला कंटाळा आला आहे. कुठेतरी दूर निघून जाण्याचे विचार मनात डोकावतात. पण ही सर्व आपत्ती आहे. यातून बचावले पाहिजे. असाही विचार मनात येतो. ज्यामुळे दु:ख होईल ते सर्व टाळण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यात मी यशस्वी होईन असाही विश्वास वाटतो. अधिक काय लिहू? १८ तारखेपर्यंत लांबलचक दौरा आहे. कसा पुरा होणार कोण जाणे!
-यशवंतराव
------------------------------------------------------------

द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतरावांची निवड झाली पण तो काटेरी मुकुट होता. द्विभाषिकाच्या निर्णयासंबंधात दिल्लीकरांनी मोरारजींना अंधारात ठेवल्यामुळं ते नाराज होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीनं सुरू केलेलं आंदोलन शिगेला पोहोचलं होतं. समितीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं ते चिरडण्यासाठी त्या काळातले मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी हिंसेला हिंसेने उत्तर देण्याचा पवित्रा घेतल्यानं चळवळीचा आगडोंब सर्वत्र पसरला होता. समितीच्या व्यासपीठावर सर्व विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकत्र आलेले होते. काँग्रेसविषयी लोकांच्या मनांत अप्रियता वाढली होती. काँग्रेस अंतर्गत यशवंतराव आणि भाऊसाहेब हिरे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे जाण्याचा मार्ग भिन्न बनला होता.

काँग्रेसविरोधी भडकलेल्या लोकांच्या भावना शांत होण्यासाठी मंत्री आणि पदाधिकारी यांनी राजीनामे देण्याच्या मार्गाचा अवलंब करावा असा भाऊसाहेब हिरे आणि शंकरराव देव यांनी आग्रह धरला तर राजीनामे देऊन काँग्रेसविरोधी समितीच्या गोटात दाखल होण्याची कल्पना यशवंतरावांना मान्य नव्हती. महाराष्ट्रात काँग्रेस अंतर्गत उलटसुलट विचार होऊ लागले तेव्हा अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष श्री. ढेबरभाई यांना भेटून यशवंतरावांनी सल्लामसलत केली. राजीनाम्याचा प्रश्न त्यानंतर उपस्थित झाला त्यावेळी राजीनामा सादर न करणारे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हेही काँग्रेसनिष्ठ आहेत असा उल्लेख राजीनाम्याचा आदेश देणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या ठरावात करण्यात यावा असं यशवंतरावांनी सुचवलं. भाऊसाहेब हिरे हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसनिष्ठा व्यक्त करण्यासाठी राजीनामे दिले पाहिजेत हे यशवंतरावांना मंजुर नसल्याने हिरे-चव्हाण दरी अधिकच वाढली.