विरंगुळा - ५६

येथील लहान थोर अनेक मंडळींशी मी स्थानिक परिस्थितीवर माहिती मिळविण्याच्या दृष्टीने चर्चा केली. येथील राजकीय परिस्थितीबाबत अधिक काळजी करण्यासारखी स्थिती आहे. याबाबत कितीतरी लिहिता येण्यासारखी माहिती मिळविली आहे. परंतु हे सर्व घाईघाईनं लिहावं असं नाही. तसं लिहिणं मला शक्य नाही. पाहू, पुढे केव्हा तरी.
-यशवंतराव

परिषदांसाठी प्रवास करण्यांत बराच काळ यशवंतरावांना १९५५ मध्ये व्यतीत करावा लागला. ते पुरवठा, स्थानिक स्वराज्य आणि जंगल खात्यांचा कारभार संभाळत होते. या खात्यांच्या संदर्भात देशात निरनिराळ्या प्रांतात परिषदांचे आयोजन होत राहिल्याने त्यात सहभागी होण्यासाठी प्रवास करणे आवश्यक होते. या वर्षात त्यांनी उत्तरेत पंजाब-सिमला, काश्मिर तर दक्षिणेत उटकमंड पर्यंतचा प्रवास केला. या प्रवासातील स्मृति त्यांनी स्वहस्ते नोंदवून ठेवल्या. दक्षिणेतील या प्रवासाच्या संदर्भात ते लिहितात -
------------------------------------------------------------

उटकमंड
१३ मे १९५५

प्रिय सौ. वेणुबाईस,
 
उटकमंडला एकदाचे रात्री येऊन पोहोचलो. गेले चार दिवस अंकोला, दांडेली, बंगलोर, कोइमतूर या मार्गाने एकसारखा प्रवास करावा लागला.

उटकमंड यापूर्वी पाहिले नव्हते. रात्री येथे पोहोचलो तेव्हा महाबळेश्वर आणखी थोडे उंच केले की झाले! उटकमंड असे वाटले. खरे म्हणजे फारच सुंदर ठिकाण आहे. वृक्षराजी अधिक दाट, उंचच्या उंच विशेष म्हणजे विविध प्रकारची आहे. इथली वस्तीही वेगवेगळ्या उंचवट्यावर पसरलेली आहे. बहुतेक राजे महाराजांचे इथे बंगले आहेत. त्यातल्याच एका बंगल्यात परिषदेचे सर्व पाहुणे उतरले आहेत. याच बंगल्यातल्या एका प्रशस्त दिवाणखान्यात परिषद भरते. रात्री थंडी फार पडली होती. माझ्याकडे गरम कपडे यथातथाच आहेत याची जाणीव खऱ्या अर्थाने रात्री झाली.

येथे येऊन पोहोचेपर्यंत प्रवासाची जी दगदग झाली ती पाहून पत्नीसह आलो नाही, एकटाच आलो हे बरे झाले असे वाटले. विशेषत: बंगलोर नंतर जलारपेठमध्ये मद्रास-मुट्यापलम या गाडीचे जे कनेक्शन ठरले त्यामुळे फारच त्रास झाला. रात्रभर आमच्या गाडीचा डबा बाजूला काढून जलारपेठला सायडिंगला ठेवून दिला होता. सकाळी तो कोइमतूर पॅसेंजरला जोडला तेव्हा आमचा प्रवास पुढे सुरू झाला. दोन तासांचा हा कंटाळवाणा प्रवास. गाडीतले पाणी संपलेले. परिषदेचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हुकला ही रुखरुख. त्यामुळे नकोशा झालेल्या या अविस्मरणीय प्रवासाची आठवणसुद्धा नको होती.