विरंगुळा - ३२

मुंबई
४ जानेवारी १९५३

खऱ्या अर्थानं रविवार होता. कोठे जाणे नाही, कोणी येणे नाही. अक्षरश: निवांत दिवस जाणार असे वाटत होते. आज काही वाचण्याची इच्छा होत नव्हती.

इतक्यात फोन खणखणला आणि तो निघाला हिरे यांच्याकडे येऊन उतरलेल्या काका गाडगीळांचा. दोन वाजता त्यांना भेटलो. श्री. किडवाईंशी त्यांचीही बोलणी झाली होती. त्याचा सारांश त्यांनी सांगितला. किडवाईंचे हिरे यांच्याशी जे बोलणे झाले होते त्यांच्याहून काकांच्या बोलण्यात निराळाच सूर दिसला. किडवाई दोघांशी निरनिराळे बोलले, की दोघांनी निराळा अर्थ घेतला हे प्रत्यक्ष दिल्लीत परिषदेसाठी गेल्यावरच कळणार. श्री. काकासाहेब बोलत होते मात्र खूपच मनमोकळेपणाने. मोकळेपणाने बोलत असले की सहजगत्या 'आत्मप्रौढी' व थापा सरमिसळ करून सांगतात. आपण फक्त थंड श्रोत्याची भूमिका मात्र घ्यावयास हवी. ''पंडितजींचे आंतरराष्ट्रीय धोरण फसले असून त्यांचा धीर सुटला आहे'' असे आपले मत खाजगीत म्हणून त्यांनी सांगितले. दरम्यान श्री. किडवाई यांचे हैद्राबाद अधिवेशनानंतर महाराष्ट्राच्या दुष्काळी विभागाला येतो असे पत्र आले आहे. राजभवनवर दुष्काळ मदत कमिटीची मध्यवर्ती कमिटीच्या स्थापनेची बैठक झाली. श्री. वाजपेयी (राज्यपाल) यांनी मोठ्या कुशलतेने काम चालविले. त्यांचे भाषाप्रभुत्व, कठीण व गैरसोयीचे प्रश्न टाळताना कुशलतेने वापरलेली विनोदबुद्धी आणि उभ्या राहाणाऱ्या सर्व तपशीलवार प्रश्नांचा अगोदर विचार करून, मनाशी निर्णय ठेवण्याची हुशारी पाहून 'बुढ्ढा' मोठा अर्क आहे असा विचार येऊन गेला. निधीसाठी काही 'टारगेट' ठरवूया अशी कोणीतरी सूचना केली. 'कुठपर्यंत पोहोचायचे ते एकदा ठरवा म्हणजे निदान त्याच्या जवळपास तरी पोहोचू' असे म्हणून किती, पाच कोटी की दहा कोटीचा संकल्प सोडूया? असा त्यांनी प्रतिप्रश्न केला तेव्हा प्रश्न विचारणारा सर्दच झाला.
------------------------------------------------------------

मुंबई
६ जानेवारी १९५३

दिल्लीची फूड परिषद ६ जानेवारीला ठरल्याने या अन्नमंत्र्यांच्या परिषदेची कल्पना द्यावी म्हणून श्री. मोरारजींना भेटलो. आठ दहा दिवसांनी निवांत भेटत असल्यामुळे बरेच बोलणे झाले. गुजरात काँग्रेस कार्यकारिणी कशी झाली ते सांगत होते. महाराष्ट्रांतील घटनांची प्रतिक्रिया तेथे झाली आहे. मोरारजी गुजराथचे हितसंबंध राखू शकतील की नाही असा काही मंडळींनी अविश्वास व्यक्त केला. 'इन द इंटरेस्ट ऑफ दि नेशन आय वुइल वाइप औट गुजराथ इफ नेसेसरी' असे त्यांनी उत्तर दिले व ही त्यांची भूमिका गुजराथ कार्यकर्त्यांनी मान्य केली.

आम्ही प्रसंगोपात का होईना आमच्या सहकाऱ्यांना असे सांगू शकू का असा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला.
-------------------------------------------------------------------------

मुंबई
७ जानेवारी १९५३

मोरारजी भाईंनी नंतर हैद्राबाद येथील वर्किंग कमिटीच्या बैठकीत काय विशेष घडले ते सारांश रूपाने सांगितले. भाषावार प्रांत रचनेसंबंधी चर्चा होताना हैद्राबादचा प्रश्न निघाला असताना ''हैद्राबादची विभागणी मी होऊ देणार नाही. प्रसंग पडल्यास सर्व सैन्य नेऊन उभे करीन” असे उद्गार पं. नेहरूंनी काढल्याचे त्यांनी सांगितले. मोरारजींना हे धोरण कितपत पसंत आहे कोण जाणे? परंतु भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व एकदा आंध्राला मान्यता देऊन स्वीकारल्यानंतर हैद्राबादच्या विभागणीस विरोध करण्यामागे काय विचार आहेत मला समजत नाही.