यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३२

पत्र - ३२
दिनांक ०८-१०-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

मला १९८२ साली 'बंडोगोपाळा मुकादम पुरस्कार' जाहीर झाला.  रयत शिक्षण संस्थेत शिकलेले माजी विद्यार्थी कुसुर ता. कराड येथे जमले आणि त्यांनी दानशूर बंडोगोपाळा मुकादम या अण्णांच्या सहकार्‍यांच्या नावे मराठीतील नामवंत साहित्यिकास पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली.  त्यातला पाहिल्या किंवा दुसर्‍या वर्षातला पुरस्कार मला जाहीर झाला.  या वर्षी पुरस्कारच पुरस्कार मिळाले.  वर्तमानपत्रामध्ये माझ्या नावाची मोठी धमाल सुरू होती.  माझे सत्कारही ठिकठिकाणी सुरू होते.  पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने माझा सत्कार आयोजित केला होता.  त्यासाठी मी मराठी विभागात गेलो होतो.  विभागप्रमुख होते डॉ. भालचंद्र फडके.  हे फडके म्हणजे आमच्या चळवळीतले आणि साहित्यिक म्हणून दलित साहित्याचे मोठे समीक्षक, पाठीराखे. त्यांचा माझा-मोठा स्नेह होता.  त्यात आम्ही दोघेही चव्हाणसाहेबांचे जावई.  डॉ. फडकेसर यशवंतरावांचेही तेवढेच भक्त. कार्यक्रम संपल्यावर आम्ही आपसात चर्चा करीत होतो.  फडकेसरांनी त्यांची एक रचना मला ऐकवली.  ती यशवंतरावांना न्याय देणारी होती.

नमुने वाहुन, स्तवने उधळू गाऊ मंगल नाम
महाराष्ट्राच्या प्रेमळ नेत्या तुजला लक्ष प्रणाम
या सोन्याच्या दिनी भेटली मोरणेला कृष्णा
या ज्ञानाच्या मंदिरी करतो स्वागत यशवंता
सह्याद्रीच्या दर्‍यांत घुमतो तुझा कीर्ती घोष
वर्‍हाडाच्या मातीत जागतो तुझाच आवेश
घराघरातून आज वाहतो हर्षाचा गंध
तुझिया स्पर्शे तेवत राहील इथे ज्ञानज्योत
लोक सुखी तर देश सुखी हा अमुचा मंत्र
एकमुखाने गर्जत राहू आमुचा महाराष्ट्र

डॉ. भालचंद्र फडकेसर मोठे विद्वान, साहित्यिक, परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी.  बाबासाहेबांच्या मिलिंद महाविद्यालयात घडलेले व्यक्तिमत्त्व.  त्याने आरपार आंबेडकरवादी.  त्यांना लोक महार फडके म्हणून हिणवत.  जसे श्री. म. माट्यांना महार माटे म्हणत तसे डॉ. फडक्यांनाही लोक महार फडके म्हणत.  त्यात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही.  त्याचा अभिमान बाळगला.  त्यांनीही तुझ्या-माझ्यासारखाच आंतरजातीय विवाह केलेला.  त्यांचे सासरे डॉ. कदम कृषीखात्याचे सहसंचालक व आंतरराष्ट्रीय किर्तीचे संशोधक.  यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे जवळचे मित्र.  सर सांगत होते. माझाच परिचय डॉ. कदमांचे जावई असा करून दिला आणि साहेब लगेच म्हणाले 'म्हणजे काय, म्हणजे आमचेच जावई.'  लगेच त्यांच्या रहाण्याची चौकशी केली.  घर मिळाले नाही असे समजले.  तेव्हा शेजारी बसलेल्या जिल्हाधिकार्‍यांना म्हणाले 'काय हो शिंदे, आमच्या जावयाला घर द्यायला पाहिजेल.'

डॉ. शिंदे म्हणाले, साहेब, कदमांनी मुलगी दिली, आम्ही घर देऊ.

चार दिवसांत फडकेसरांना घर मिळाले.  साहेबांच्या कितीतरी आठवणी सर सांगत होते.  एकदा यशवंतराव मिलिंद महाविद्यालयात आले होते.  डॉ. आंबेडकरांसंबंधी त्यांच्या मनात खूप आदर होता.  त्यांच्या भाषणातील एक वाक्य आठवते.  ते म्हणाले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांडपंडित होते.  त्यांच्याजवळ महात्मा बुद्धांची प्रज्ञा आणि करुणा होती.  पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी दिली तेव्हा ते सत्तेवर नव्हते.  सत्तेवर नसताना त्यांना पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन गौरविले.  त्यावेळचा प्रसंग फडकेसर सांगत होते.  तो प्रसंग असा, यशवंतरावांच्या स्वरातच एकप्रकारचे आर्जव आणि मार्दव असते.  सत्तेवर असणारी माणसे आपल्याच कार्यकर्त्यांशी तुसडेपणाने वागतात.  मग इतरांना तर कसे वागवतात ते आपण रोजच पाहतो.  यशवंतराव सत्तेवर होते तेव्हा आणि सत्तेवरून उतरल्यानंतरही त्यांच्या वागण्याबोलण्यात तोच जिवहाळा, तीच गुणग्राहकता होती.  ते या पदवीदान समारंभात केलेल्या भाषणात म्हणाले,