यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३२-०८१०२०१२-२

महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासावर त्याचा फार मोठा प्रभाव पडेल.  माझ्या दृष्टीने सांगायचे, तर आम्ही वेगवेगळ्या विचारधारेने पोहणारे, पण अंतिम ध्येय एकच असलेले लोक आहोत.  यशवंतराव समाजवादीच होते. त्यांच्या विचारावर समाजवादाची जी छाप पडली होती ती आपणास पहावयास मिळते.  मग त्यांचे कुळकायद्याचे बिल असो, की सीलिंग ऍक्टचा कायदा, की शिक्षणासाठी त्यांनी उपसलेले कष्ट असोत.  आपण देशभर ज्या साखर-कारखान्यांचीच चर्चा करतो आहोत तो सहकार तरी समाजवादापेक्षा कुठे वेगळा आहे.  आपले लोक एक गोष्ट विसरतात ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या खाजगी साखर कंपन्याकडे असलेली जवळजवळ ८० हजार एक जमीन त्यांच्याकडून घेऊन तिचे सत्तांतर शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विशाल कृषी क्षेत्रात करणे, ही हजारो एकर जमीन शासनाने नेमलेल्या शेती महामंडळाच्या हाती सोपवायची आणि तिथे प्रचंड प्रमाणावर ऊसाचे उत्पादन करून तो ऊस सहकारी साखर कारखान्यांना पुरवायचा, अशी ती भव्य योजना होती.  शासन नियंत्रित शेती महामंडळाचा हा भक्कम आधार जर पाठीशी नसता तर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने एवढ्या मोठ्या प्रमाणात उभे राहिले असते की नाही यात शंका आहे.  हे शेती महामंडळ आपण आर्थिक समाजवादाच्या दिशेने राज्याची वाटचाल व्हावी म्हणून निर्माण करीत आहोत याची जाणीव त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांच्या ठिकाणी होती.  ती त्यांनी समाजवादाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते, अशा शब्दात बोलूनही दाखवले होते.  यशवंतरावांनंतर इतर मुख्यमंत्र्यांना ही जाण होती किंवा आहे असे दिसत नाही.  नाही तर या जमिनीपैकी हजारो एकर जमिनी पुन्हा मूळ मालकांना देण्याची योजना राज्यकर्त्यांनी मनाशी आखलीच नसती.  लक्ष्मण, आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली याचे भान यशवंतरावांएवढे कोणासही नव्हते.  खाजगी क्षेत्र, शासकीय क्षेत्र, सहकारी क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये आपण गुंतवणूक करीत होतो पण सामान्य माणसाच्या विश्वासाला, कर्तृत्वाला वाव मिळाला तो सहकारातच.  यशवंतरावांची ही मोठी जमेची बाजूहोती असे मी तरी समजतो.  यशवंतरावांची आणखी एक कामगिरीही राष्ट्रासाठी मोलाची ठरली.  कृष्णमेनन जितके बडबडे तितके यशवंतरावजी मितभाषी.  अजिबात गाजावाजा न करता त्यांनी आपल्या सेनादलाची फेररचना केली.  उणिवा दूर केल्या.  दारूगोळ्याचे कारखाने मेनन यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विजेच्या किटल्या आणि गॅसच्या चुली अशासारख्या फलतू गोष्टी न करता, दारूगोळा तयार करतील यावर यशवंतरावांनी भर दिला. सेनादलाच्या पुनर्रचनेचा जो भक्कम पाया त्यावेळी यशवंतरावांनी घातला त्यावरच आजच्या आपल्या सामर्थ्यवान सेनादलाची इमारत उभी आहे.  याचा विसर आपणास पडता कामा नये.

एवढी राष्ट्राची भरीव कामगिरी ज्या यशवंतरावांनी केली, त्यांच्याकडे पुढे पुढे दुर्लक्ष झाले.  त्यांच्या अंगच्या कर्तृत्वाचा आणि अनुभव संपन्नबुद्धीचा जो लाभ शासनकर्त्या पक्षाला आणि विरोधी पक्षाला मिळायला हवा होता तो मिळू शकला नाही.  ते आता अडगळीत पडल्यासारखे वाटते आहे.  याचे दुःखही होते.  त्यांच्यासारख्या वकुबाचा राजकारणी आज सत्ताधारी पक्षात एकही दिसत नाही आणि विरोधी पक्षांतही दिसत नाही.  आम्ही संघर्षही खूप केले.  भांडलो-तंडलो, पण ते काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही.  देशहित हे पहिले गोरगरीब जनता, तिचे जगणे हा आमच्याच पिढीच्या चिंतनाचा विषय होता.  भेद, मतभेद हे सारे राष्ट्रासाठी विरले की नितळ प्रेम उरतेच.  नानासाहेबांना असे बोलताना मी क्वचितच पाहिले असेल.  जुनया पिढ्यातील स्वातंत्र्यसैनिक विचाराने वागत असत.  आज विचार करणार्‍या माणसांची राजकारणात वानवा आहे.  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.  शहाणी माणसं सत्तेला चालत नाहीत.  नानासाहेबांसोबत तीन-साडेतीन तास गप्पा झाल्या.  लाखांच्या सभा घेणारे हे लोक पन्नास माणसांपुढेही तेवढ्याच तावातावाने बोलत असत.