यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३३-०८१०२०१२

पत्र - ३३
दिनांक ०८१०२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

'उपरा' ची पहिली आवृत्ती हातोहात संपली.  प्रसिद्धीच्या आणि पारितोषिकांच्या उधळणीने खरोखर मी भारावून गेलो होतो.  उपराच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन साहेबांच्या हस्ते करावे असे 'ग्रंथाली'चे चिटणीस दिनकर गांगल यांनी मला सुचवले.  मी साहेबांशी बोललो, तारीख ठरली.  डोंबिवलीच्या कोणत्या तरी थिएटरमध्ये प्रकाशन कार्यक्रम ठरला.  कार्यक्रमाला केसरीचे संपादक चंद्रकांत घोरपडे, नवशक्तीचे संपादक तुकाराम कोकजे, गांगल, प्र.ना. परांजपे, अरुण साधू ही नामवंत मंडळी पाहुणे उपस्थित होती.  सायंकाळी साडेसहा वाजता प्रकाशनाचा कार्यक्रम होता.  साहेबांनी दुपारीच मला बोलावले होते.  ते दिल्लीहून आदल्या रात्रीच रिव्हिएरामध्ये मुक्कामाला आले होते.  ते आता इंदिरा काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.  त्यांना बाईंनी फार वेह ताटकळत ठेवले. याचे आम्हा सार्‍या त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटत होते.  माझ्यासोबत यल्लाप्पा वैदूगुरुजी होतेच.  आम्ही दोघे त्या काळी खूप भटकलो.  मुंबई बसने, रेल्वेने पाहत होतो.  लोकलचा प्रवास म्हणजे मोठी जीवघेणी गोष्ट.  मला तशी गर्दी अजिबात आव़डत नाही.  त्यामुळे शक्यतो बसने आम्ही फिरायचो.  दुपारी साहेबांकडे गेलो.  साहेब एकटेच होते.  समोर मरिन ड्राइव्हचा सागर उसळला होता.  उंचच्या उंच एकामागून एक येणार्‍या वेगवान लाटा.  किनार्‍याला त्यांचे येऊन फुटणे आणि पाणी उसळ्या मारीत रस्त्यावर फूटपाथवर येऊन पसरणे.  अनेक नवपरिचित जोडप्यांना आपल्या तुषारांनी ओलेचिंब करणारे सागरातले खारे पाणी, उचंबळणारा समुद्रकिनारा, भरउन्हातही चांदण्यात बसावे तसे सागराकडे तोंडे करून बसलेले तरुण पोरापोरींचे थवे.  मुंबईची सारी गर्दी एका बाजूला आणि दुसरीकडे हे प्रेमी जीव.  गर्दीपासून दूर, सागराच्या साक्षीने एकमेकांना समर्पित करणारे.  मी आणि यल्लाप्पा कितीतरी वेळ खिडक्यांशी उभे होतो.

साहेब, आता आठव्या वित्तआयोगाचे प्रमुख झाले होते.  त्यामुळे पुन्हा लाल दिव्याची गाडी व दिमतीला स्टाफ आला होता.  मधल्या काळात रसिकभाई शहा या त्यांच्या मित्राची गाडी साहेब वापरीत.  काळ्या रंगाची देखणी गाडी साहेबांच्या दिमतीला असे. साहेब महाराष्ट्रात आले की हीच गाडी वापरीत.  मला वाटे, ही साहेबांचीच गाडी असावी.  नंतर साहेबांनीच मला सांगितले.  त्याचे असे झाले-  रावसाहेब कसबे हे संगमनेरला प्राध्यापक होते.  'झोत'मुळे साहेब त्यांना खूप छान ओळखत होते.  कसब्यांनी मला साहेबांना संगमनेरला व्याख्यानासाठी निमंत्रण द्यायचे असल्याचे सांगितले होते.  रावसाहेब कसब्यांचा निरोप मी साहेबांना दिला, तेव्हा म्हणाले, 'लक्ष्मण, रावसाहेबांना सांगा माझ्याकडे गाडी नाही.  गाडीची काही व्यवस्था करता आली तर मी त्यांना वेळ कळवतो.'  माझे काळीज चर्र झाले.  साहेब देशाचे उपपंतप्रधान होते.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात २०-२२ वर्षे वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री होते.  चाळीस वर्षे हा माणूस सत्तेच्या खुर्चीत बसला होता.  याचे घर दिल्लीत नव्हते.  मुंबईत नव्हते.  रिव्हिएराही त्यांचे नव्हते. पुण्यात नव्हते.  कराडला घर बांधले होते ते अगदी अलिकडे.  आता नगरपालिकेत निवडून आलेला माणूस कोटीकोटीची भाषा करू लागतो.  ज्याने हजारो लोकांचे संस्थांचे संसार उभे केले, देशाचे नेतृत्व केले, राज्याचे नेतृत्व केले त्या माणसाकडे स्वतःची गाडी नव्हती !  मी त्यांना म्हणालो, साहेब, आपण इतकी वर्षे सत्तेत होता, गाडी घ्यावी असे कसे वाटले नाही ?  आता गल्लीबोळातल्या पुढार्‍याकडे या गोष्टी सहज असतात.  साहेब छान हसले.  'लक्ष्मण, मी १९४६ साली सत्तेच्या राजकारणात आलो.  तेव्हापासून सरकारी गाडी नि सरकारी बंगला कायम मिळत गेला.  त्यामुळे स्वतःची गाडी असण्याची गरजच वाटली नाही.  वेणूबाईंना दिल्लीत लोकल कामासाठी जावे लागते त्यासाठी मी तिच्या सोयीसाठी एक गाडी घेतली आहे ना, ती दिल्लीत असते.  स्वतःची गाडी असावी असे वाटण्याचे कारणच नव्हते.  कधी रसिकभाईंची, कधी कल्लाप्पा अण्णांची गाडी दिमतीला असते.  मला काय करायची गाडी, हिंडाफिरायची व्यवस्था झाली की झाले.  रावसाहेबांना सांगा मी संगमनेरला येईन.  त्यांना म्हणावे पत्र टाका.'

साहेब तयार होऊन आले.  चला लक्ष्मण, 'उपरा'च्या अशाच आवृत्त्या निघतील.  निघूया आपण.  आम्ही पायर्‍या उतरून खाली आलो.  साहेबांनी खांद्यावर हात ठेवला.  त्यांच्या डोळ्यांतले कारुण्य मला दिसत होते.  डोळ्यांतली प्रतिमा वाचण्याचा प्रयत्‍न मी करत होतो.  सुप्रिया, खरे सांगतो, हा देवमाणूस किंचितही साधनांसाठी दुःखी होताना मी पाहिला नाही.  राजा असूनही उपभोगशून्य स्वामी असावा तसा.  हसत हसत आम्ही दोघे मागच्या सीटवर बसलो.  यल्लाप्पागुरुजी पुढच्या सीटवर बसले.  आम्ही डोंबिवलीला लाल दिव्याच्या गाडीतून निघालो.  गाड्यांचा ताफा नव्हता की लोकांची वर्दळ नव्हती.  साहेब म्हणाले, लक्ष्मण, आता कसे वाटते ?