मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ७-२

एकदा त्यांना असाच बंगल्यावर भेटायला गेलो होतो. माझे बोलणे होत असताच इतर लोक येऊ लागले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘यशवंतराव, मी जातो आता. पुन: केव्हा तरी येईन.’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘अरे बैस रे, तुम्ही नेहमी मंर्त्यावर टीका करता व त्यांची मजा असते असे म्हणता. जरा थांब आणि आमची मजा बघ एकदा.’’ त्यानंतर दोन तास मी तेथेच होतो. अनेक सारखे येत होते व यशवंतराव राग आवरीत त्यांना शांतपणाने समजावीत होते. जागा मागायला आलेले एक गृहस्थ काय ताठ्यात बोलत होते. ते ऐकून मलाच राग येत होता. पण यशवंतराव त्यांना समजावीत होते व शांतपणा सोडीत नव्हते. भेटायला येणा-यात त्या दिवशी शेवटी आले ते बडे गुलाम अली खाँ. स्वरांचा व ठुमरींचा तो राजा यशवंतरावांकडे जागा मागायला आला होता. ‘मुसलमान मोहल्ल्यात जागा हवी ना’ असे यशवंतरावांनी विचारले. बडे गुलाम अली खाँ म्हणाले, ‘‘छे! छे! त्या मोहल्ल्यात नको. साहेब एक लक्षात ठेवा. गायकांत व वादकांत मुसलमान बरेच दिसत असले तरी सामान्य मुसलमानात शास्त्रीय संगीताचे शोकिन अत्यंत कमीच. त्यामुळे मला जागा हवी हिंदू मोहल्ल्यातच. माझ्या रियाजाला आदराने येऊन ऐकणारे लोक मला त्या समाजातच मिळतील.’’

बडे गुलाम अली खाँ गेल्यावर यशवंतराव मला म्हणाले, पाहिलंस, एक कटू सत्य या गायकाने सांगितले. मी त्याच एका विचारात गढून गेलो.

राजकारणात असणारा माणूस बहुधा रूक्ष वाटतो असा अनुभव ब-याच वेळा येतो. पण यशवंतराव तसे नव्हते. त्यांना साहित्यात रस होता, शिक्षणात होता, तसा गायनातही होता. शांता आपटेच्या भजनाचा कार्यक्रम त्यांच्या बंगल्यावर झाल्याचे मला आठवते. घरगुती स्वरूपाचा तो कार्यक्रम होता. मी जणू घरचा म्हणून त्या कार्यक्रमास हजर होतो. त्या कार्यक्रमात यशवंतराव जो रस घेत होते ते पाहून मी तर भारावलो. महाराष्ट्राचा हा मुख्य मंत्री. हजारो समस्या याच्या डोक्यात. तरीपण ते सर्व विसरून हा गृहस्थ शांता आपटेच्या  भजनात रमून गेलेला मी पाहिला.

आणखी एक प्रसंग मला असाच आठवतो. नागपूर येथे त्यांचा दौरा  होता. त्या वेळेस त्यांचेबरोबर संपूर्ण चार दिवस मी होतो. संगीतात प्रावीण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांना बक्षिसे वाटायची होती व थोडे त्यांचे गायनही होते. त्या सर्व कार्यक्रमात यशवंतराव अगदी रंगून गेलेले मी पाहिले. शिवराम राजे भोसले हे त्या कार्यक्रमाचे संयोजक होते. शेवटी समारोपाच्या भाषणात यशवंतराव म्हणाले होते, ‘‘माझ्या एका आवडत्या विषयाच्या या कार्यक्रमात मी रंगून गेलो होतो. हा वेळ चांगला होता. इतक्या सुंदर कार्यक्रमातून आता एकदम एका निराळ्या कार्यक्रमाला जायचे आहे. तेथे काय होते कुणास ठाऊक!’’

आणि खरोखरच ते म्हणाले तसेच झाले. कापड मार्केटच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या त्या समारंभात निदर्शने झाली व त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेऊन निघून जावे लागले होते.

महाराष्ट्रातील एस.टी. कामगारांच्या संघटनेचे काम मी पाहात होतो. रेडिओ क्लबवर एस्.टी.च्या वार्षिक समारंभाचा कार्यक्रम होता व त्याच वेळी कामगारांना करारापोटी काही लाख रुपये दिल्याची घोषणा होणार होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव हे होते. बोनसचा कायदा त्या वेळी झालेला नव्हता. तरी त्याचे तत्त्व एस्.टी.ला मी स्वीकारायला लावले होते. पगार-भत्ते याव्यतिरिक्त कामगारांना पाच लाख सानुग्रह रक्कम द्यायचे ठरले होते. यशवंतरावांनी आपल्या भाषणात एस्.टी.बद्दल सांगितले व करारापोटी अमुक एक रक्कम द्यायचे ठरल्याचे जाहीर केले. पण सानुग्रह रकमेचा उल्लेख त्यांनी केला नाही. लगेच मी उठून त्यांचेजवळ गेलो व त्यांना याची आठवण देऊन ‘ती रक्कम जाहीर करा’ म्हणून विनंती केली. त्यांनी चेअरमन सरैयांना तसे जाहीर करण्यास सांगितले व त्यांनी ते केले. कौतुक याचे की, कार्यक्रम आटोपत आला असताही त्यांनी कामगारांचा प्रश्न म्हणून माझी विनंती मानली.