मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ७

७. सहकारी मित्र – वि. वा. नेने

यशवंतराव चव्हाण हे माझे शाळकरी मित्र होते. ते आणि मी टिळक हायस्कूल, कराड येथे एकत्र होतो. ही मैत्री शेवटपर्यंत कायम राहिली. लहानपणापासून अभ्यासू वृत्तीचे, शांत स्वभावाचे ते व्यक्तिमत्त्व होते. महात्माजींच्या चळवळीची ओढ असूनही त्यांनी शिक्षण सोडले नाही, नेतृत्वाचे काही गुण हे मुळातच त्यांच्यात असावेत. पण मोठा नेता झाला तरी त्याने कराड व कराडकर मित्र यांचा विसर कधी पडू दिला नाही.

अत्यंत संयमी पण कणखर वृत्ती, काँग्रेस संघटना व तिचे नेतृत्व याविषयी अविचल निष्ठा,अभ्यासू व विचारी वृत्ती, आतिथ्यशिलता, स्वभावात गोडवा, विरोधकांविषयी मनात कटुता नाही, काळवेळ व परिस्थिती पाहून वागण्याची कसोटी, शासनातही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती, राजकारणाच्या धबडग्यात राहूनही स्वत:च्या चारिर्ताला जपणारा, सुस्कृंत मनाचा, कलांविषयी आवड असणारा, कलावंतांविषयी आदर व प्रेम बाळगणारा, पुढे जाणाराचे पाय मागे न ओढता त्यास पुढे जाण्यासाठी सहाय्य करणारा, निष्ठावान व ढोंगी यांची अचूक पारख करणारा, सत्ता हाती येऊन आपले गुण न सोडणारा व सत्तेचा ताठा न बाळगणारा असा हा नेता महाराष्ट्राचे भूषण  होता, मुकुटमणी होता.

त्याच्या कर्तृत्वाला दैवाचीही उत्तम जोड मिळाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंर्ताच्या लढ्यात ज्या देशनिष्ठेने त्याने भाग घेतला, त्याच निष्ठेने त्याने स्वातंर्ताचे राजकारणही केले. प्रांतहितापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे, राष्ट्रनिष्ठा ही प्रांतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांचे ठाम मत होते. संयुक्त महाराष्ट्राचे वेळी त्यांनी हे दाखवून दिले. मग त्यासाठी लोकांची अप्रियता पत्करावी लागली तरी त्याची तयारी त्यांनी ठेवली होती. नेतृत्वाबद्दलची निष्ठा ही त्यांची अनन्य होती. त्याहीपेक्षा संघटनेची निष्ठा जाज्वल्य होती. या संघटना की, नेतृत्व यांच्या निष्ठा जेव्हा डळमळीत व्हायची वेळ आली तेव्हा त्यांना मनाच्या कठीण अवस्थेतून जावे लागले. पण ते प्रसंगही त्यांनी निवारून नेले. स्वातंर्तानंतर सत्तेला सर्वस्व मानण्याची प्रवृत्ती वाढीला लागली व आजही ती बलवत्तर आहे. त्यामुळे आयुष्याची शेवटची वर्षे त्या सत्तेची वक्र दृष्टी झाल्याने त्यांना कठीण काळ आला. पण सत्ता नसली तरी यशवंतराव व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर कधी कमी झाला नाही. शेवटी सत्ता नसतानाही आदरणीय व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसातील प्रतिमा कायम राहिली.

१९३९ सालची गोष्ट! मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्यासाठी म्हणून मी कराडला टिळक हायस्कूलमध्ये इंग्रजी ७वीत दाखल झालो होतो. १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत वयाच्या सोळाव्या वर्षी भाग घेतला. तेव्हा प्रतिज्ञा केली होती की, इंग्रजांनी मान्यता दिलेल्या शाळेत जाणार नाही. त्यामुळे सगळा मार्गच वेगळा झाला. पुढे १९३७ साली काँग्रेसचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले व म्हणून मी टिळक हायस्कूलमध्ये आलो होतो.

त्या वेळी कराडला मी सेवादलाचेही कार्य करीत होतो. आमची एक शाखा डबीर आळीच्या डबीरांच्या वाड्यात भरत असे. तेथेच यशवंताचे बि-हाड होते. त्याच्या मातोश्री विठाबाई त्या वेळी तेथेच असत. तोही सेवादलाला अधूनमधून भेट देत असे. त्या वेळी मी कविताही करीत होतो. काही किर्लोस्कर इ. मासिकांतून प्रसिद्धही झाल्या होत्या. त्या कविता पाहण्यास मी यशवंताला बोलावले होते. तो अगत्याने माझ्या घरी आला व त्याने संपूर्ण कविता वाचून ‘छान’ असा अभिप्रायही दिला होता. ललित साहित्यात रस घेण्याची त्याची प्रवृत्ती तेव्हापासून होती.

१९४० साली मी मॅट्रिकच्या परीक्षेला बसलो. त्या कालात मॅट्रिक परीक्षेची महाराष्ट्रात दोन केंद्रे होती. एक पुण्यास व एक सांगलीस. मी पुण्याला बसणार होतो. त्या काळी मॅट्रिकची परीक्षा ठरल्याप्रमाणे १३ एप्रिलला सुरू होत असे. मी व यशवंता दोघांनी मिळून एप्रिल ६ ते १३ या राष्ट्रीय सप्ताहात सातारा जिल्ह्यात प्रचारदौरा करायचे ठरवले. ते साती दिवस आम्ही एकत्र प्रचार केला. एकसळ येथे साखळकर गुरुजी हा सत्त्वशील मनुष्य काँग्रेसचा कार्यकर्ता होता. तेथील कार्यक्रम मला चांगला आठवतो. सभा चांगली झाली व भाषणेही छान झाली. यशवंताचे वक्तृत्व त्याही काळात शांत पण निश्चयी, आकर्षण करून घेणारे असे होते. पुण्याला परीक्षेला बसण्यापूर्वी हा ‘अभ्यास’ करून मी गेलो होतो.