मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ६-२

यशवंतराव कसलाही प्रसंग असला तरी भावनेच्या आहारी कधी जात नसत. योग्य वेळ आल्यावर आपले मत स्पष्ट मांडत. कुणाचाही मुलाहिजा ठेवीत नसत.  

तसे मोरारजीभाई अत्यंत जिद्दी व हट्टी. मुंबई महाराष्ट्रास द्यावयाची नाही. तेव्हा द्विभाषिकाचा तोडगा! सर्व गुजराथचा यशवंतरावजींच्यावर संपूर्ण विश्वास! पंडितजींनी दोन वर्षांकरता तो पत्करून पुन्हा निर्णय घेण्याचे ठरविले !

यशवंतरावांनी ती दोन वर्षे गुजराथ व महाराष्ट्र यांचा विश्वास संपादन करून चांगले राज्य चालवले!

सर्वांना वाटले आता यशवंतराव म्हणणार की, द्विभाषिक फार चांगले आहे!

दोन वर्षे झाल्यावर पंडितजींनी विचारले, ‘‘काय यशवंतरावजी, तुमचा निर्णय काय?’’ यशवंतरावांनी वस्तुस्थितीस धरून अत्यंत मार्मिक उत्तर दिले, ते म्हणाले, ‘‘पंडितजी, राज्य चांगले चाललेय अॅडमिनिस्ट्रेशनदृष्ट्या! परंतु एकात्मता निर्माण होऊ शकली नाही! ‘‘पंडितजींनी ताबडतोब ओळखले व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्राला देण्यास त्यांच्या स्वाधीन केला! मोरारजीभाई सपशेल आदळले. परंतु त्याचा विचार केला नाही. महाराष्ट्राच्या हितापुढे वैयक्तिक रागालोभाची पर्वा न करता तो महाराष्ट्राचे स्वाधीन केला!

हा सर्व भाग महाराष्ट्रातील सर्वांना माहीत असल्यामुळे स्थलसंकोचास्तव तपशीलवार दिला नाही. नाहीतर ते दिवस, क्षणाक्षणास जीवनमरणाचे होते! लोकक्षोभ-कुणी अंडी मारली, रस्त्यावर चपलांच्या माळा बांधल्या! पण त्यांच्याकडे त्यांनी वाट चुकलेले देशभक्त याच दृष्टीने बघितले! राग कुणावर धरला नाही!

‘‘उपकारप्रधान स्यात् अपकारपरेऽपिअरौ’’ माणसानं आपली प्रवृत्ती उपकारप्रधान ठेवावी,
प्रत्यक्ष आपल्यावर अपकार करणारा किंवा प्रत्यक्ष क्षत्रू असला तरी.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात आचार्य अर्त्यानी अगदी भयंकर दाळ नासलेली! प्रत्येक काँग्रेसवाल्यास तुझ्या भानगडी ‘‘मराठी’’ वर्तमानपत्रात छापतो म्हणून ब्लॅकमेल करावयाचे किंवा अंकात एवढेच म्हणावयाचे ‘‘उद्याच्या अंकात मंर्त्याच्या भानगडी! की मग सर्वांनी अत्रे साहेब यांच्याकडे जावयाचे व ‘‘माझ्याबद्दल काही आहे का?’’ असे विचारावयाचे! यशवंतरावांवर कधी हल्ला चढवणेची छाती झाली नाही! फारतर टवाळासारखा विनोद करावयाचा! ‘चव्हाण, या शब्दातील च काढला तर काय राहील? कित्येक त्यांना म्हणत हे झालाच पाहिजे, केलाच पाहिजे हे काय?!! पण त्यापेक्षा त्यांचे नाव काढत नसत! त्यांच्या बुद्धीस व चारिर्तास वचकून असत! एकदा मुंबईच्या विधानसभेस ‘‘मच्छीबाजार’’ असा शब्द आचार्य अर्त्यानी वापरला! झाले. विधानसभेत त्याबद्दल गोंधळ सुरू झाला! एक यशवंतरावांनी कमिटी नेमली व या प्रकरणाचा सांगोपांग विचार करून निकाल द्यावा! असे सांगितले. या कमिटीस असे असभ्य अन् पार्लमेंटरी शब्द वापरल्यास शिक्षा करावयाचा अधिकार असतो?

मग कमिटीने निकाल दिला, एक महिना कैद व ५०० रु. दंड!! अर्त्याना विधानसभेत बोलवून वारंट काढून निकाल त्यांचे हाती द्यावा!

आचार्य अर्त्याना विधानसभेत हजर ठेवले व यशवंतराव मुख्यमंत्री त्यांच्या टेबलावर कमिटीने निकाल ठेवला! यशवंतरावांनी तो निकाल पाहिला. हा खरा सत्त्वपरीक्षेचा प्रसंग!

पण त्यांनी सभागृहास निकाल वाचून दाखवला व म्हणाले, ‘‘खरोखर एवढ्या मोठ्या विद्वानाने असे काही आपल्या पवित्र अशा संसदेस म्हणावयास नको होते! ठीक आपल्या सर्वांच्या भावना मी जाणतो! तेव्हा मला वाटते, जेल शिक्षा काही करू नये, फक्त दंड करावा!’’

आता यशवंतरावांनी म्हटल्यावर विरुद्ध कोण बोलणार? तसा ठराव केला व दंड भरून घेतला! आचार्य अत्रेसाहेब मात्र ओशाळून निघून गेले.

१९४२ चे प्रतिसरकारचे आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धरले. रेल्वे गाड्या पडू लागल्या, सामुदायिक दंड बसू लागले! तेव्हा काही गांधीवादी व काही त्यांच्या आडून सरकारी अधिकारी म्हणू लागले की हे साता-याचे काम काँग्रेसच्या ध्येय धोरणात बसते का?

त्या वेळी मसूरच्या सभेत यशवंतरावजी बोलत होते ते म्हणाले, ‘‘सातारा काँग्रेसमध्ये बसतो की नाही मला माहीत नाही, परंतु भारतात जर कुठे काँग्रेस जिवंत असेल तर ती एकट्या साता-यातच आहे.’’