मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ५-१

अकरावीच्या सेंड ऑफच्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यातर्फे इंग्रजीतून आभाराचे भाषण केले. ते हे.मा. व मुख्य पाहुणे यांच्या भाषणापेक्षाही सरस ठरले.

अकरावीनंतर यशवंतराव कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये गेले व मी पुण्याला आलो.

बिंदू चौकात भुसारी वाड्यात खोली घेऊन राहून त्यांनी कोल्हापूरात अभ्यास केला.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे अधिक लक्ष असल्याने त्यांची हजेरी भरत नसे. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण हे यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेकडे व सौजन्याकडे पाहून या गोष्टीकडे काणाडोळा करून माफ करत असत.

इंटरला असताना यशवंतराव टॉयफाइडने आजारी पडले. फॉर्म भरायच्या वेळी त्यांना टॅक्सीने कोल्हापूरला नेले व १।। महिन्याच्या अभ्यासाने इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले.

बी.ए.नंतर एल.एल.बी.साठी पुण्यात आले. मी त्या वेळी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेत नोकरी करत होतो. मला ते म्हणाले, ‘‘अरे, आपल्या क-हाडच्या पंडित सड्यांचे काव्य छापू या.’’

टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन समारंभ झाला. प्रा.माटे अध्यक्ष होते. यशवंतराव त्या वेळी हजर होते. या प्रकारे त्यांनी मला प्रकाशक बनविले.

क-हाडहून निघताना ते मला म्हणाले, ‘‘तू डॉक्टर हो, मी वकील होणार.’’ मी त्यानुसार आयुर्वेदाचा चार वर्षे अभ्यास केला परंतु मी झालो प्रकाशकच. ते मात्र ठरवल्याप्रमाणे वकील झाले.

आम्ही शाळेत बरोबर होतो. तुरुंगात बरोबर होतो. त्यांच्या एल.एल.बी.च्या वेळी पुण्यातही दोन वर्षे बरोबर होतो. मी माझे पूर्वज कृष्णदयार्णव यांच्या हरिवरदा ग्रंथाचा पहिला खंड यशवंतरावांच्या हस्ते साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये प्रकाशित केला. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘मी मंत्री म्हणून आलो नसून मित्र म्हणून आलो आहे. लहानपणी दयार्णव नाव का ठेवले असे मी त्यांच्या वडलांना विचारले होते. ते नाव ठेवणे आज सार्थ झाले.’’ या समारंभात आभार मानताना मी म्हटले, ‘‘यशवंतराव मंत्री झाले नसते तर साहित्यिक झाले असते. त्यांनी हायस्कूलमध्ये असताना मेळ्याची पदे लिहिली होती त्यातील ‘बाल तिलक वंदू या’ हे गाणे अजून मला पाठ आहे.’’ २२०० पानांचा हरिवरदा ग्रंथ पूर्णपणे प्रकाशित झाला याची प्रेरणा यशवंतरावांचीच आहे.

यशवंतराव पुण्यात माझ्या घरी उतरत त्या वेळी ते काव्य, साहित्य, समीक्षा अशीच पुस्तके वाचीत असत. इतर सटरफटर वाचनाची त्यांना आवड नव्हती. पुढे ते मंत्री झाल्यावर ते ज्या त्या खात्याचा संपूर्ण, मूलगामी अभ्यास करत. त्यासाठी रात्री उशीराही पुस्तक मागून घेत.

यशवंतरावांचा व माझा घरगुती स्नेह होता. जाणेयेणेही होते. ते क-हाडला गेले असता मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांची आई मला म्हणाली, ‘‘अरे, यशवंता कसली नोकरी करतुया रे? सारखी माणसं. त्याला जेवायलाही सवड नाही. घरातल्या माणसांशी बोलायला सवड नाही.’’

मी त्या वेळी म्हटले, ‘‘अगं आई, तो राजा आहे, तो राज्य करतो.’’

यशवंतराव पुण्यास माझ्याकडे आले. माझी आई, माझे वडील व माझी पत्नी यांच्या समवेत त्यांच्या माझ्या गप्पा चालू होत्या. त्यांनी आमच्याकडे दोन मुलींची हकीगत सांगितली. एक एका डी.एस.पी.ची इंटर झालेली मुलगी होती, व दुसरी मो-यांची मुलगी. यातली कोणती पसंत करू असे त्यांनी विचारले, तेव्हा आम्ही सर्वांनी एकमताने त्यांना सांगितले की, ‘त्या डी.एस.पी.च्या मुलीऐवजी दुस-या मुलीशी लग्न कर. म्हणजे तुझं घर फुटणार नाही. एकत्रच राहील.’’ त्याने तो सल्ला मानला. ती दुसरी मो-यांची मुलगी म्हणजेच वेणूताई. वेणूतार्इंनी त्यांना आयुष्यभर उत्तमच साथ दिली.

यशवंतरावांचे व माझे बाळपणापासून स्नेहसंबंध कायमच राहिले. पुण्यात कृष्णाकाठ, हिरोशिमा व बंद दरवाजा या पुस्तक प्रकाशनात त्यांची भाषणे झाली त्यांना मी हजर होतो. बंद दरवाजाचा कार्यक्रम संपला व मी विचारले, ‘‘यशवंतराव किती दिवस मुक्काम?’’ ते म्हणाले, ‘‘असाच विमानतळावर जाणार आहे,’’ हे त्यांचे माझे शेवटचे संभाषण.

त्यानंतर ते लवकरच गेले व मला मात्र चुटपुट लागून राहिली.