मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ४-२

१९४२ च्या ‘भारत छोडो’ या अखेरच्या आंदोलनात यशवंतरावांनी त्या वेळच्या मोठ्या सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले. १९४१ साली कायद्याची पदवी परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. वकिलीची सनद हातात पडल्यावर वकिलीकडे लक्ष न देता सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. २ जून १९४२ ला एका सुखवस्तू घरंदाजाच्या मुलीशी विवाहबद्ध झाले. दिसायला नीटनेटक्या, सुरेख म्हणून पसंत झालेल्या वेणूतार्इंशी लग्न केले. विवाहाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. परंतु लगेच भूमिगतांचे नेतृत्व सुरू झाले. स्वातंत्र्यसंग्रामात अखेरचे १९४५ पर्यंतचे जे जे महाराष्ट्रात नेते झाले, त्यांच्यातील सर्वांत तरुण यशवंतराव हे होते. १९४६ साली विधानसभेवर ते निवडून आले.

मुंबई ही एका अर्थाने भारताची आर्थिक राजधानी आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतच्या सर्व सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीचे भारतातील श्रेष्ठ असे एक केन्द्रस्थान मुंबई होय. त्या वेळच्या बहुभाषिक मुंबई राज्याच्या राजधानीत यशवंतराव एक पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून राहावयास गेले. १४ एप्रिल १९४६ ला या भूमिकेतून या पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. साता-याकडील अनेक मित्रमंडळींची आणि एकंदरीत राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक अशा मतदारवर्गाची उत्कट इच्छा होती की, यशवंतरावांना मुंबईतील खेर मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा अधिकार मिळावा. परंतु यशवंतरावांचा स्वभाव जे अनायासे प्राप्त होते, ते समाधानाने स्वीकारावयाचे. शासनाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळाला यातच समाधान मानले. त्या वेळी मोरारजी देसाई हे गृहमंत्री होते. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्थान भक्कमपणे मांडता येणार नाही हे ओळखून त्याकरिता सामान्य ग्रामीण जनतेला नवोदित, कर्तबगार तरुणाला हाताशी घेणेच आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून मोरारजींनी अशा आपुलकीच्या आर्जवी भाषेत यशवंतरावांची विचारपूस केली. गृहखात्याकडेच दाखल का होत नाही? असा विनंतीवजा शब्द टाकला आणि मोरारजींच्याच खात्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून रुजू होऊन यशवंतराव कारभार पाहू लागले.

पार्लमेंटरी सेक्रेटरीपदावर राहून यशवंतराव मुंबईत काम करत होते. शरीर मुंबईत, पण मन कराडात, मुंबईतील राज्यकारभारात त्याचप्रमाणे कराड येथील घरात, अशा द्विधा स्थितीमध्ये मन ताणले गेले होते. परमप्रिय वडील बंधू गणपतराव क्षयाने आजारी होते. त्यांची सेवा करीत असताना गणपतरावांच्या पत्नींनाही त्या संसर्गजन्य रोगाने पछाडले. या दोघांच्या सेवेमध्ये यशवंतरावांची तरुण पत्नी वेणूताई सारख्या झटत होत्या. त्यांनाही क्षयाची बाधा झाली! १९४७ च्या डिसेंबर महिन्यात गणपतराव दिवंगत झाले. दोन वर्षांत यशवंतरावांची भावजय म्हणजे गणपतरावांच्या पत्नी याही इहलोकातून गेल्या. गणपतरावांच्या मुलांची म्हणजे पुतण्यांची जबाबदारी यशवंतरावांवर पडली. सेवा करीत असताना वेणूताईची प्रकृतीही ढासळलीच. अशा आपत्तीच्या वेढ्यात यशवंतराव सापडले. वेणूताई मिरजेच्या डॉ. जॉन्सन या मिशनरी डॉक्टरांच्या उपचाराने या संकटातून बाहेर पडल्या.

प्रत्यक्ष काँग्रेस संघटनेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसमधून फुटून निघालेल्या डाव्या गटाचा शेतकरी कामकरी पक्ष १९४९ सालच्या दरम्यान स्थापन झाला. बहुजन समाजातले काही मुरब्बी नेते काँग्रेस सोडून या नव्या पक्षाचे नेतृत्व करू लागले. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव, र.के.खाडिलकर, यशवंतराव मोहिते इत्यादिकांनी या पक्षाच्या प्रसारास वेग आणला. यशवंतराव चव्हाण या पक्षाच्या स्थापनेच्या वेळी जी अनेक खलबते झाली त्यांतील काही बैठकींत स्वत: उपस्थित होते. परंतु आयत्या वेळी पक्षस्थापनेच्या प्रसंगी पुन्हा बाजूला होऊन ते काँग्रेसलाच चिकटून राहिले. खरोखर हा यशवंतरावांच्या दृष्टीने इकडे जावे की तिकडे जावे अशा त-हेचा मानसिक भावनांचा संघर्षच होता. त्यातून विवेकाने ते क्षणात बाहेर पडले..