मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ३

३. यशवंतरावजी: आमचे कुटुंबप्रमुख – म. ध. चौधरी

यशवंतरावजींना (आपल्यातून) जाऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या आठवणींनी महाराष्ट्राचे समाजमन आजही आकंठ भरून आहे. ह्या आठवणींनी ते गहिवरते, व्याकुळ बनते, कृतज्ञतेने भरून येते. त्यांच्या निर्वाणानंतर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करणारे, त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे, तसेच त्यांच्या अनेकविध कार्याचे मूल्यमापन करणारे भाष्य व लिखाण केले. तरीही त्या पलीकडे सामान्यापर्यंत पोहोचलेली यशवंतस्मृति सर्वार्थाने अभिव्यक्त झाली असे म्हणता येणार नाही. कारण उण्यापु-या अर्धशतकाच्या सार्वजनिक कार्यातून ते महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या कोंडीमुळे ते अवघडले, अडखळले. थोडे बाजूला पडले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात समाजाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर इतका व्यापक प्रभाव असणारा समाजजीवन घडविणारा दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणण्यात येते.

त्यांची विवेक विचक्षण बुद्धी, निर्धार परंतु भावूक मन, लोकसंग्राहक स्वभाव, धीरगंभीर वृत्ती व या सर्वातून प्रगट झालेले भारदस्त व्यक्तिमत्त्व त्यांच्या सहवासात येणा-याला आकर्षून घेणारे होते. राजकीय विरोधक किंवा पक्षांतर्गत विरोधकांशी देखील ते तत्त्वासाठी भांडले पण कधी फटकून वागले नाहीत व संबंध तोडून बसले नाहीत. सहिष्णुता व खिलाडू वृत्तीने त्यांनी आपले व समाजाचे जीवन निश्चितच समृद्ध बनविले. आपल्यापेक्षा मोठ्यांच्याबद्दल आदर व अदब बाळगत असतानाच आपल्यापेक्षा लहानांना त्यांनी नेहमीच सन्मानाने व औदार्याने वागविले.

माझी यशवंतरावजींची प्रथम भेट, १९५२-५३ च्या सुमाराला झाली. त्यानंतरच्या एका लहान प्रसंगाने परिचय दृढ झाला. प्रसंग लहानसा परंतु त्यातून त्यांच्या उदार स्वभावाचे दर्शन घडते. माझ्या वडिलांच्या हत्येनंतर मी पुढचे शिक्षण सोडून सातपुड्याच्या आदिवासी भागात त्यांनी सुरू  केलेले काम एक आव्हान म्हणून स्वीकारले होते. सामान्य माणसाची अपार सहानुभूती होती. आदिवासी बांधवांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत होते. सरकारी अधिकारीही सहकार्याचा हात देत होते. कै. बाळासाहेब खेर, मोरारजीभाई, वैकुंठभाई, आबासाहेब बी.डी.देशमुख, वांद्रेकर आदी नेत्यांचे कृपाछत्र होते. परंतु अनेक अडचणी होत्या. छुपा विरोधही खूप होता. अशा परिस्थितीत वनविभागाचे असे एक नवे अधिकारी बदलून आले की ज्यांनी आमचे सारे कार्यच उखडून टाकायचे ठरविले होते जणू. आम्ही त्यावेळचे उपमंत्री बी.डी. देशमुख व द.न.वांद्रेकर यांच्यासमोर त्या अधिका-याची कृष्णकृत्ये उघडी पाडली व त्यांच्याचमार्फत यशवंतरावजींना भेटलो. ते त्या वेळी वनमंत्री होते. त्यांनी परिस्थिती समजून घेतली व ताबडतोब योग्य ती कार्यवाही करतो म्हणून सांगितले. त्यानंतर आठवण देण्यासाठी आणखी एकदोनदा भेटलो. संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी चाललेल्या आंदोलनाचे ते दिवस होते. तिस-यांदा भेटलो  तेव्हा ते थोडे व्यग्र वाटले. पण आम्ही हळूच कामाची आठवण दिली, व त्यांच्या व्यग्रतेला जणू तोंड फुटले. मला म्हणाले, ‘‘तुमच्याने काम होत नसले तर सोडून द्या परंतु पुन्हा मला त्रास देऊ नका.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘ह्या अधिका-याने आमचे सारे काम उद्ध्वस्त करण्याचा जणू विडा उचलला आहे. आपण हे थांबविण्याच्या दृष्टीने काही कार्यवाही करतो असे आश्वासन  दिले म्हणूनच आठवणीसाठी मी आपणाला भेटत असतो. आपल्याकडून काम होणार नसेल तर आम्ही त्याला तोंड देऊ. परंतु मी काम सोडावे हे सांगण्याचा अधिकार आपणाला नाही! कारण हे एक आव्हान म्हणून स्वेच्छेने स्वीकारले आहे. मात्र आपल्याला असे सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण आपण लोकांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आहात.’’ ह्या बोलण्याने यशवंतरावजी चिडले असते तर माझ्यासारख्या एका पंचविशीतल्या दरीडोंगरात काम करणा-या लहानशा कार्यकर्ताला त्यांना अधिकाराचा वापर करून खूप अद्दल घडविता आली असती. परंतु झाले वेगळेच. त्यांच्या चेह-यावरची व्यग्रतेची, रागाची जागा क्षणात करुणेने घेतली. मला प्रेमाने जवळ घेऊन त्यांंनी आश्वस्त केले व ‘तुमच्या अडचणींची मला जाणीव आहे. तुमचे काम करतो.’ असे म्हणून लगेच फोन उचलला. आमच्या कामावरचे संकट दूर झाले.