मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ८

८.  स्मृती जयाची चैतन्य फुले ! – व्यंकटराव पवार

गेल्या चार तपांचा यशवंतराव यांचा नि माझा सार्वजनिक जीवनातला कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमासारखा, त्याच परिसरातला घनिष्ठ संबंध. स्वांतत्र्यपूर्वकालात, घराघरात काँग्रेसचा संदेश भिडवून, जनजागृतीत आम्ही गढलो होतो. आमच्या संबंधाविषयी, त्या भागाचे स्वातंत्र्यसैनिक श्री. पांडुरग पुजारी, माझ्या एकसष्टीनिमित लिहिताना म्हणतात, ‘‘सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीनं मा. यशवंतरावजी व मा. व्यंकटरावजी ही रामलक्ष्मणाची जोडी स्वत:चे कर्तृत्वाने जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ होती. दोघेही स्वातंत्र्य संग्रामात बिनीचे स्वार ठरले. दोघांच्याही प्रतिमा एवढ्या एकरूप झाल्या की, पुण्या-मुंबईचे वृत्तपत्रांतून काही वेळा व्यंकटराव चव्हाण व यशवंतराव पवार असा उल्लेख झाला ! ’’

असे दृढ संबंधाचे सन्मित्र यशवंतराव देवाघरी गेल्याने उत्पन्न झालेली हुरहूर व विषण्णता आजही ताजी आहे.

पंधरा वर्षाच्या तरुणाने ग्रामे चेतवली

देशात गो-या साहेबाचा सुलतानी वरवंटा चालू होता. त्याविरुद्व अनेक राष्ट्रभक्तांची स्वातंत्र्य संग्रामात आहुती पडलेली पाहून आमचा हा पंधराविशीतला मित्र अस्वस्थ झाला, त्याला राष्ट्रप्रेमाने झपाटले. दहावीस सवंगड्यांसह ‘ तिरंगा ’ खांद्यावर घेऊन, निद्रिस्त ग्रामे तो चेतवीत, पेटवीत होता. सातारा जिल्ह्यात प्रतिष्ठितजन, कूपरशाहीच्या दावणीस जुंपलेला!

बहुजनसमाजवादी समाजप्रबोधनाच्या चळवळीचा जोर होता. काँग्रेस पांढरपेशांच्या छत्राखाली होती. अशा प्रतिकूल वातावरणात, प्रस्थापितांचा एकेक बुरुज काँग्रस विचाराचा, कृतीचा, सुरुंग लावून ढासळून टाकणारा हा तरुण म्हणजेच, आम्हा तरुणांचे पंचप्राण ‘‘यशवंतराव ! ’’

तो ऐतिहासिक संवाद व परिवर्तन संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मी धडपडत होतो. त्यासाठी, मुंबई विधिमंडळात ठराव मांडून, सारे अडसर बाजूस नेऊन, तो संमत करून घेण्यात यश मिळवले.

दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या शंका दूर करण्यात खासदारांबरोबर खटपट केली. राज्यात, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जोरात चालू झाले. त्यात गोळीबारात अनेक हुतात्मे झाले. प्रतापगडावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान जवाहरलालजींनी केले. एवढे रामायण घडूनही, महाराष्ट्रावर द्विभाषिक लादल्याने मी हताश होऊन, १ ऑगस्ट १९५९ ला, काँग्रेसचा राजीनामा दिला.

त्यामुळे मुख्यमंत्री यशवंतराव अस्वस्थ झाले. कराड सांगलीस, विद्युत संदेश थडकले :

‘‘ आबांना मुंबईस घेऊन या.’’

सहकारी मित्रासमवेत सह्याद्रीवर पोहोचलो. मला पाहताच ‘‘साहेबांनी’’ मिठीच मारली. ‘‘दिवाणखान्यात विश्रांती घ्या, विसाव्यानंतर बोलू ’’ असे म्हणाले. मुख्य समस्येबाबत सायंकाळच्या भेटीत झालेला संवाद असा

यशवंतराव :- ‘‘काय, आबा, तब्येत ठीक आहे ना ?

मी :-   ‘‘शारीरिक तब्येत ठीक, पण ...’’

यशवंतराव :- ‘‘अहो, तेच मला जाणायचे आहे ’’