यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९५

परिशिष्ठ क्र. ५
पुढारी व विवेकांत
लेखक – रा. ना. चव्हाण

(यशवंतराव चव्हाण विवेकांत अभ्यासू नेते होते. जनसामान्यात व विचारवंतात त्यांनी आपले खास स्थान निर्माण केले होते. त्यांचे विरोधक ही त्यांना मानत. अशा नेतृत्वाचा ‘आदर्श प्रारूप’ म्हणून समोर ठेऊन कार्यकर्त्याच्या प्रशिक्षणासाठी/ प्रबोधनासाठी लिहिलेला लेख या परिशिष्ठांत मुद्दाम समावेश केला आहे. यशवंतराव यांचे चरित्र वाचन वा स्मरण त्यांच्या गुणांचा स्विकार व आचरण यामुळेच फलदायी होईल व राजकीय पक्ष / कार्यकर्ते उत्तरोत्र अधिकाधिक ‘निकोप समाजकारण’ करतील तर निधर्मी लोकशाही अधिक बळकट होईल.

सदरचा लेख ‘युगकर्ता’ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर १९८७ यातून उदधृत केला आहे. : संपादक)

विचार व विवेक सर्वांच्या गरजेचा विषय आहे. मनुष्याला सत्यासत्य शोधथा येते. मनुष्यात निर्माण होणारा प्रत्येक विचार हा बरावाईट असू शकतो. विचार व विवेक यात असा फरक आहे की, विवेक म्हणजे शाश्वत (सत्य) व अशाश्वत (असत्य) यांच्यासंबंधी बुद्धी वापरून व तपासून जो विचार केला जातो, तो विवेक होय. प्रत्येक विचार हा विवेक नसतो. श्री. समर्थ रामदासांनी ‘विवेक’ म्हणजे काय? हे पारमार्थिकदृष्ट्या सांगितले आहे. व्यवहारातदेखील ख-याखोट्यांचा निवाडा करून विवेक करण्याची गरज असते. विवेकी माणूसच जास्ती पुढे येतो, विजयी होऊ शकतो. धंदा, उद्योग, व्यवसाय यात विवेक हा पाहिजेच. माणसाला सत् व असत् विचार प्राप्त होऊ शकतात. सदसद्विवेकबुद्धी वापरण्याची दररोजच्या प्रपंचात व संसारात जरूरी असते. केवळ बुद्धीत विचार आला व तो कार्यवाहित आणून टाकला; तर त्याचे बरे-वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून मनात येणारा विचार खरा आहे किंवा घातक आहे. यासंबंधी शोधक असा सारासार विवेक माणसास जरूरीचा आहे. मग तो मनुष्य पुढारी असो अगर विवेकवंत असो, दोघांनाही त्यांचे विचार तपासणीची नेहमी गरज असते. या प्रक्रियेला आत्मपरीक्षणदेखील म्हणता येईल. ‘चाळणा उदंड करावी’ असे समर्थ यासाठीच सागंतात, आपली मते, आपला पक्ष वगैरे जे आपले सर्व आवडते काही असते, ते खरे का खोटे, हे शोधणे, मनुष्यमात्रास उपयोगी होते व तो भावनेच्या आहारी जात नाही. सावद असतो. सावधानेतेचे विवरण व महत्त्व रामदासामध्ये देखील चांगले मिळते, बुद्धी ही सावध असण्याची नितांत गरज असते.

हल्ली पुढारी व विवेकवंत असे दोन वर्ग आढळतात, म्हणूनही ते मानाले जातात. ही फाळणी व विभागणी इष्ट नाही. पुढा-यालाही विवेक पाहिजे. अविवेकी पुढारी असला व तो अनुयायांनी मानला, तर तोटा दोघांचाही होतो. अविवेकी पुढा-यांचे पुढारीपण खड्ड्यात जाते व तो संपतो. पुढारी कसा असावा व कसा नसावा, याचाही विचार विवेकाने केला पाहिजे. गुरू करताना पारखून घ्यावा लागतो. नाही तर बुवाबाजीचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्याचप्रमाणे पुढारी-प्रतिनिधी निवडताना नीट विचाराने स्वीकारला व त्याला विवेकाने मते दिली तर देशाचा फायदाच होईल.