यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९९

पुरोहित व पुढारी

पुरोहित हा धर्मकृत्यांमध्ये मार्गदर्शन करतो, साह्य करतो. यज्ञकाळात पुरोहिताना महत्त्व होते. पुढे मूर्तीपूजा सर्वत्र प्रचारात आल्यावरही पुरोहिताची गरज राहिली. जनता निरक्षर होती त्यावेळी पुरोहित व पूजाअर्चा सांगणारा वर्ग जरूर होता. पण आता साक्षरता व शिक्षण वाढल्यावरही जोशी-जंगम यांची गरज लागते हे नवलाचे आहे. स्वावलंबन वाढले नाही. बहुतेकांना भिक्षुक हा (वकील) जरूर लागतो व दक्षिणा (फी) देखील आजकाल वाढली आहे व लोक देतात! आश्चर्य आहे. रूढीप्रिय व परंपरावादी समाजात हे सर्व टिकते व वाढते. परिवर्तन हा आपल्या समाजाचा धर्म (स्वभाव) नाही. ‘स्वभावा: दुरतिक्रम: |’ व्यक्तीचा व समाजाचा स्वभाव बदलत नाही. व्यक्ती-व्यक्तींचा समाज बनतो व व्यक्ती त्यांचा धर्म-स्वभाव बदलून दाखविण्यासाठी धैर्य करतील तर समाज बदलेल. परिवर्तन कार्यवाहित आणले आहे, अशी उदाहरणे लोकांना मार्गदर्शक होतात. पण उत्तरोत्तर हे सर्व चांगले लोपत आहे. संस्कृततज्ञ पुरोहित दुर्मिळ झाले. समाजातील चालीरिती-वहिवाटी व रूढी यांच्या मर्यादा सुधारकांनाही पडल्या. जास्तीत जास्त लोक घरी दारी जसे वागतात तसे व्यक्तीला वागावे लागते. स्त्रियांचाही प्रभाव पुरूष समाजावर पडतो व रूढीबद्ध समाज वर्षानुवर्षे पंरपरेने वागत जातो. हे सोपेही असते व पुरोहित भिक्षुक धर्मशास्त्राधारे रूढींना मान्यता देतात. पुरोहित परिवर्तनीय विचार करीत नाहीत. मग यजमान मंडळीत विवेक उत्पन्न झाला नाही तर नवल नाही! देवाधर्माच्या नावावर जगणारे फक्त ब्राह्मण – भटभिक्षुकच असतात असे नव्हे. देवऋषी, मांत्रिक-जादूटोणा करणारे ब्राह्मणेतर देखील पुष्कळ असतात. हे खेड्यापाड्यातील बाया बापड्यांना जास्ती फसवितात. पुढारी देखील नाना जातिधर्माचे असतात व प्रत्येक जातीत व धर्मात पुरोहित असतात, त्याप्रमाणे पुढारीदेखील असतात. हे पुरोहित व पुढारी विवेकी व सदाचारी लाभतील तर जनतेचा फायदाच होईल; धर्मकारण, राजकारण अशुद्ध व भ्रष्ट होणार नाही. सर्व क्षेत्रात परिस्थिती गंभीर आहे. आज खेड्यापाड्यांत ‘स्त्री जीवन’ निर्भय नाही.

अनुयायी व विवेक

पुरोहित – धर्ममार्तंड – पाद्री व मुल्लामौलवी वगैरे त्यांच्या धर्मानुयायांत धर्मांधता निर्माण करतात. धर्मज्ञान न वाढविता धर्मातील लोकांना अज्ञानच जास्ती शिकवितात. म्हणून धर्मांधता वाढतच आहे व धर्म हे राजकीय क्षेत्रात लुडबूड करतात व आडवे येतात, परमेश्वराप्रत अनुयायांना नेण्याऐवजी यादवीला प्रवृत्त करतात व धर्म ही अफू होते. वास्तविक धर्म हा मूलत: अमृत असतो. धर्म घटना करतो म्हणजे धारण करतो. पण हल्ली सर्वच धर्मविघटन करताना आढळतात, दुर्दैव आहे. अशा अवस्थेत धर्मानुयायांनी स्वत:च विवेक केला तर त्यांची दिशाभूल होणार नाही. अनुयायी स्वावलंबी विचार पाहिजेच, हे सांगावयाचे आहे. राजकारणी पुढारी जर अनुयायांनी पारखले तर त्यांची राजकीय फसवणूक होणार नाही. जिकडे स्वार्थ तिकडे पुढारी पक्षांतरे करून जातात. पक्षनिष्ठ व तत्त्वनिष्ठ पुढारी दुर्मिळ झाले आहेत. पक्षांतरे ही राजकीय धर्मांतरे असतात. धर्म म्हणजे येथे स्वभाव. विरोधी राहण्याचा, लोकशाहीत त्यागी धर्म (स्वभाव) असतो. सत्तेसाठी-खुर्चीसाठी-सत्ताधारी पक्षात पुढारी जातात. पक्षांतराचा कायदा हा मोडला जातो. सत्ताधारी पक्षातून सत्ताविहीन पक्षात म्हणजे विरोधी पक्षात जाणारे फारच थोडे. ख्रिस्ती व मुसलमानातील धर्ममार्तंड हिंदू धर्मातील दुर्बलांच्या दुर्बलपणाचा फायदा घेऊन धर्मांतरे घडवितात. हा त्यांचा गुप्त अगर उघड व्यवसाय असतो. हिंदू धर्मांतील भिक्षुक, पंडित, शास्त्री, धर्माचार्य फक्त दक्षिणा घेतात. हिंदू धर्माची कोणा इतरांना दीक्षा देत नाहीत. किंवा शुद्धी-हिंदूकरण फारसे करीत नाहीत. याचा फायदा इतर धर्मियांना मिळतो. हिंदूंनी याचा विचार करावा. सर्वच धर्मातील अनुयायांनी ‘धर्मविवेक’ करावा. प्रत्येक धर्मात जो पारमार्थिक- अध्यात्मिक भाग आहे, त्याचा लोप होत आहे व धर्मपुरोहित हरएक धर्मातील कर्मकांडच वाढवित आहेत. कारण कर्मकांडावरच त्यांना जगता येते. ज्ञानकांडावर जगता येत नाही. कारण ज्ञान झाल्यावर पुरोहित मध्यस्थाची गरज लागणार नाही. भक्तांचे स्वावलंबन वाढले तर पुरोहितांची गरज लागणार नाही. धर्मगुरूंच्या मध्यस्थीशिवाय भक्त परमेश्वरप्राप्तीचा मार्ग चोखाळू शकतील काय? जोपर्यंत स्वावलंबी विवेक नसतो, तोपर्यंत धर्मकारणात व राजकारणात अनुयायांची फसवणूक होणराच. राजकीय व धार्मिक बुवाशाही-बाबागिरी ही चालूच राहणार! धार्मिक बाबतीत आजकाल विवेकाची फारच गरज आहे. सर्वच धर्म रस्त्यावर येत आहेत. विवेक म्हणजे हिशेबी विचार, गणिती विचार.