यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९४

मला वाटते साधारण १९८१ मार्च एप्रिल मध्ये माझे वडिल रा. ना. चव्हाण यांना मी त्यांचेकडे घेऊन गेलो. त्यावेळी ते हॉलमध्ये न बसता शेजारच्या एका खोलीत घेऊन गेले. दोघे बराच वेळ अनेक विषयांवर बोलत होते. त्याचा उल्लेख त्यांच्या लेखांत आला आहेच. गप्पावरून ‘रा. ना.’ चे बरेच लेखन त्यांनी वाचले असल्याचे दिसले. दोघांनाही एकमेकाविषयी अतीव आदर असल्याचे जाणवले. आम्हांस पोहचविण्यास दारापर्यंत आले. वडिलांना साहेब म्हणाले ‘तुमचे विखुरलेले प्रबोधनपर लेख पुस्तकरूपाने संकलीत केले पाहिजेत. वडिल माझेकडे पाहून करीन म्हणाले. वडिलांनी त्यांना महर्षी वि. रा. शिंदे यांचे पोष्टाचे तिकीट भारत सरकारने काढावे, या गोष्टीची आठवण करून दिली. अन् आम्ही त्यांची निरोप घेतला.

‘साहेबांच्या’ दिवाणखान्यात एक आकर्षक अशी पितळी समई होती. ती मी मार्च १९८३ मध्ये दिल्ली शाखेतील ‘विदेश विनीमय विभागाचे’ उद्घाटनास मागून आणली होती. सातारा शहरात मुख्य कार्यालय असलेल्या ‘दि युनायटेड वेस्टर्न बँके’ बद्दल त्यांना प्रेम, जिव्हाळा व आपुलकी होती. हे मी अनुभविले.

१ जून १९८३ ला श्री. सदाशिव दिक्षीत (दिल्ली आकाशवाणी) यांचा फोन आला. त्यांच्याकडून सौ. वेणूताई गेल्याचे समजले. त्वरीत एक रेस कोर्सवर गेलो. त्यावेळी ४ वाजले होते. मृतदेह मुंबईला नेणार होते. दर्शन घेतले. ‘साहेबाना’ भेटण्याचे, त्यांचेकडे पहाण्याचे धाडस झाले नाही. सर्व अबोल होते. मनात या धक्कातून साहेब सावरोत अशी प्रार्थना करून परत आलो.

डिसेंबर १९८३ मध्ये बँकेचे चेअरमन श्री. वि. श्री. दामले यांना भेटण्यास घेऊन गेलो. त्यावेळी ते फारच खचले आहेत असे वाटले. वेणूताई गेल्याचा घाव त्यांचा जिव्हारी बसला आहे  हे त्यांच्या डोळ्यात साठलेल्या अश्रुनी आम्हास सांगितले.

त्यानंतर मे १९८४ मध्ये माझी बदली मुंबई रिजनल ऑफिसला झाली. ‘साहेब’ परगावी असल्याने मला त्यांना भेटतां आले नाही. पुढे २५ नोव्हेंबरला रात्री ‘साहेब’ गेल्याचे समजले. फार व्यथीत झालो. २६ नोव्हेंबरला चार पाच वृत्तपत्रे आणून वाचली. त्यांचा पार्थिव देह मुंबईत आणणार असल्याचा फोन दिल्लीच्या शाखेतून सकाळी ११ वाजतां आला. त्यामुळे चौकशी करून दुपारी एक वाजता मलबार हिल वरील ‘सह्याद्री’ वर गेलो. सोबत माझा भाचा डॉ. कुमार वाघ होता. खूप गर्दी होती. पण पार्थिवदेह आला नव्हता. त्यामुळे वाट पहात थांबावे लागले. त्याकाळात त्यांचे शेवटच्या आजारात ट्रीटमेंट बरोबर झाली नाही. आबाळ झाली अशी कुजबुज ऐकून मन उद्वीग्न झाले. सायंकाळी पार्थिव फुलांनी सजवलेल्या तोफगाडीतून मिरवणुकीने ‘सह्याद्री’ वर आले. तेव्हा जनसमुदाय शोककुल झाला. ‘साहेबांचे’ दर्शन घेतले. त्यांचा चेहरा काळवंडला होता. खरच त्यांची अनास्था झाली कां? ह्या एका विचाराने माझ्या मनात घर केलं. दुसरे दिवशी क-हाडात ‘साहेबांचे’ दर्शन प्रचंड गर्दीमुळे झाले नाही. परंतु अफाट जनसागराच्या शोकाकुल अवस्थेचा व प्रेमाचा अनुभव मी घेतला.

महाराष्ट्र एका सुसंस्कृत, हळव्या मनाच्या सभ्य, कनवाळू नेतृत्वास मुकला हेच खरे. माझ्या जीवनाच्या क्षितिजाला या उत्तुंग अशा राजकीय व्यक्तिमत्वाचा परिसस्पर्श झाला. तोही एकमेव असावा याचे मला अप्रुप वाटते. आपली काडीचीही ओळख नसताना ‘साहेब’ सतत आपलेच वाटावेत असे जादुई रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. त्याचा शोध मी अद्यापि घेत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने ‘आठवणी’ लिहून झाल्या. माझ्या मीच छापल्या मन मोकळे झाले.
     
श्री. रमेश चव्हाण – संपादक

परिशिष्ट क्र. ४ (पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)