भूमिका-१ (165)

संयुक्त राष्ट्रसंघामधील भारताची भूमिका हा परराष्ट्रिय धोरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या आंतरराष्ट्रिय व्यासपीठावर आपण शक्यतो दूर राहावे, असे मानणारा आपल्या परराष्ट्रमंत्रालयात एक गट आहे. आपण सुरक्षा समितीत स्थान मिळविण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, असे माझे मत आहे. कारण त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रिय प्रश्नांबाबत भारताला परिणामकारक मतप्रदर्शन करता येईल. आतापर्यंत अनेक प्रसंगी भारताने योग्य निर्णय घेतलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रिय व्यासपीठावर भारताच्या मताला मान दिला जातो. इतर काही देशांच्या तुलनेने भारतापाशी प्रचंड लष्करी वा आर्थिक सामर्थ्य नाही. (अर्थात भारताची आर्थिक प्रगती मुळीच उपेक्षणीय नाही) तरी देखील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारत काय म्हणतो, इकडे इतर देश उत्सुकतेने लक्ष देत असतात.

भारताचे अमेरिकेबरोबरचे संबंध चांगले आहेत, ते सुधारतही आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इकडे येऊन गेले आणि आपल्या पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट दिली. परराष्ट्रमंत्री जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत जातात, तेव्हा ते इतर परराष्ट्रमंत्र्यांना भेटतात. त्याबाबत मला एक धोक्याचा इशारा द्यावासा वाटतो. आपण जेव्हा बड्या देशांबरोबरच्या चांगल्या संबंधांबाबत बोलतो, तेव्हा हे बडे देश म्हणजे अंत:करण नसलेली यंत्रे आहेत, हे आपण विसरता कामा नये. ते केवळ आपले हितसंबंधच जाणतात - केवळ राष्ट्रिय हितसंबंध नव्हेत, तर जागतिक हितसंबंधही. हे सोविएत रशिया, अमेरिका आणि चीन या सगळ्यांच्या बाबतीत खरे आहे. हे तिन्ही देश आपले राष्ट्रिय आणि जागतिक हितसंबंध ध्यानात घेऊनच निर्णय करीत असतात.

अमेरिकेच्या जागतिक विचारामध्ये भारताला कितपत महत्त्वाचे स्थान आहे? अमेरिकेपुरते बोलायचे, तर तिच्या जागतिक विचारामध्ये भारताचा क्रमांक बराच खालचा लागतो. सांस्कृतिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी आपण भारत-अमेरिका संयुक्त आयोग स्थापन केले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. या आयोगांचे कामही ठीक चालले आहे. परंतु जेव्हा अणुविज्ञानासारखा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा बडे देश भारतासंबंधी मुळीच अगत्य दाखवीत नाहीत. ते आपल्याला तुटक पत्रे लिहून काय करावे, यासंबंधी उपदेश करू लागतात. प्रत्येक देशासंबंधीचा अग्रक्रम भू-राजनैतिक दृष्टिकोणातून ठरविला जातो. भू-राजनैतिक दृष्टीने भारताला कोणता क्रम मिळतो? हा घटक आपण नीट लक्षात घेतला, तरच बड्या देशांशी आपण संबंध प्रस्थापित करू शकू. केवळ नेत्यांच्या भेटीगाठी आणि आयोगांच्या बैठकी यांतून काहीच निष्पन्न होणार नाही. आंतरराष्ट्रिय राजकारण हा जागतिक मुत्सद्देगिरीचा खेळ असतो आणि मुत्सद्द्यांची भाषा सगळीकडे सारखीच असते.