लोकनेते यशवंतराव चव्हाण - १३

इंग्लंड या देशाच्या भेटीप्रसंगी यशवंतराव म्हणतात, "इंग्रजांनी जनत करुन ठेवलेल्या जुन्या इतिहासाचे दालन म्हणजे कर्तृत्ववान देशाच्या चारशे-पाचशे वर्षाच्या क्रियाशीलतेचे दर्शन, लंडनमधील हे इतिहासाचे दालन युरोपातील इतिहासाने भरलेले आहे. या लोकांनी समुद्र व्यापला, साम्राज्ये निर्माण केली, युरोपचे जीवन घडविले. सुंदर नाटके पाहण्याचे जगातील उत्तम ठिकाण म्हणजे लंडन, महान इतिहासाबरोबरच कलेवर भरभरुन प्रेम करणारी माणसे मला इंग्लंडमध्ये पहावयास मिळाली. "

अमेरिकेच्या भेटीप्रसंगी यशवंतरावांनी अमेरिकेचे पाहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या निवासस्थानाला आवर्जून भेट दिली. या ठिकाणचे वर्णन करताना ते म्हणतात, "या निवासस्थानात जॉर्ज वॉशिंग्टन तेव्हा जसा रहात होता त्यावेळचे रुप जसेच्या तसे जतन करुन ठेवले आहे. त्याचे झोपण्याचे ठिकाण, ग्रंथालय, स्वयंपाकघर, त्याची बसण्याची बग्गी हे सर्व नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. बंगल्याच्या सभोवती शेकडो एकर जमीन आहे. हे ठिकाण पाहताना जॉर्ज वॉशिंग्टन यांचे संपूर्ण जीवनचरित्र नजरेसमोर उभे रहाते."

जगातील विविध देशांना भेटी दिल्यानंतर तेथील प्रवासवर्णने यशवंतरावांनी शब्दबद्ध करुन ठेवली. भव्य-दिव्य गोष्टी पाहताना त्यांच्यातील साहित्यिक जागरुक होत असे. जगभरातील मोठी शहरे ही नदीकाठी वसल्याचा आवर्जून उल्लेख ते आपल्या प्रवासवर्णनात करतात. सागराच्या प्रचंड जलाशयाइतकेच त्यांना हिरव्यागार नदीकाठाचे विलक्षण आकर्षण होते. भरलेले नदीपात्र, तीरावरील हिरवीगार झाडी, पिकाने भरलेले शेत पाहून यशवंतरावांचे मन आनंदून जाई.  त्यांचे बालपणच मुळात नदीकाठावर गेल्याने स्वाभाविकच त्यांना त्याचे वेड होते. देशविदेशातील नदीपात्र पाहताना यशवंतरावांना कृष्णा-कोयनेच्या पाण्यात मनसोक्त डुंबतानाच्या आठवणी होत. कृष्णेच्या विशाल काठावर वाळूत पहुडणे, सवंगड्यांबरोबर नदी पार करणे, या बालपणीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळून जात.

भारतातील नद्यांकडे पाहण्याची भारतीयांची दृष्टी धार्मिकतेची राहिली. धार्मिकदृष्टया पवित्र मानले गेलेले पाण्याचे साठे तीर्थक्षेत्राच्या नावाखाली धार्मिक विधी करुन अस्वच्छ झाले तरी त्याकडे आपण लक्ष देत नाही.  अमेरिका, इंग्लंड, रशियासारख्या देशांत मात्र नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी घेतलेली काळजी यशवंतरावांच्या नजरेत मात्र पटकन भरते.

परदेशातील लोकांचे नदीबद्दलचे प्रेम कसे आहे हे सांगताना ते म्हणतात, "या लोकांचे नदीबद्दलचे प्रेम जबरदस्त आहे, पण ते धार्मिक स्वरुपाचे नाही."

पंडित नेहरुंनी राबविलेल्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाचा प्रभाव जगातील अनेक विकसनशील राष्ट्रांवर पडला. जगभरातील शंभरावर राष्ट्रे अलिप्तवादी चळवळीत सहभागी झाली. "जागतिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय तंटे शांततेच्या मार्गाने सुटावेत.' पंडित नेहरुंच्या वरील धोरणाचा कालांतराने जगातील अनेक देशांनी स्वीकार केल्याचा अनुभव यशवंतरावांना परदेश प्रवासात आला. एकंदरित परदेश दौ-यातून यशवंतरावांची दृष्टी व्यापक बनत गेली. भारताचे परराष्ट्र धोरण आखत असताना. देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी यशवंतरावांनी आपल्या परराष्ट्र मंत्रीपदाचा पुरेपुर वापर केला.