लोकनेते यशवंतराव चव्हाण - १२

६. परदेश दौरे

यशवंतराव चव्हाण यांनी जगातील बहुतांश देशांना भेटी दिल्या. इंग्लंड, अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅनडा, पेरु, रशिया, युगोस्लाव्हिया, इजिप्त, सिरीया, थायलंड, मलेशिया, केनिया, लेबनान, सायप्रस, इटली, फ्रान्स, स्वीड्न, सिंगापूर, सिलोन (श्रीलंका), बांग्लादेश, जपान, मेक्सिको, जमैका, कॅरेबियन समुद्रातील बेटे, आफ्रिका (खंड) इत्यादी अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. जवळ-जवळ संपूर्ण जगाचीच सफर त्यांनी केली. वेगवेगळे देश, तेथील माणसे, त्यांची भाषा, संस्कृती, चालीरिती, तेथील साहित्य, कला व इतिहास यांचे ज्ञान यशवंतरावांनी या काळात घेतले. भारतीय संस्कृती व परदेशातील संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास यशवंतरावांनी केला. परदेशात स्थिरावलेला भारतीय हिंदी समाज हा यशवंतरावांच्या दृष्टीने अभ्यासाचा व कुतुहलाचा विषय बनला. यशवंतराव म्हणतात, "सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मजूर व गुलाम म्हणून परदेशात गेलेले भारतीय व नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले सुशिक्षीत भारतीय यांच्या जगण्यात व राहणीमानात फरक आहे."

यशवंतराव ज्या-ज्या वेळी परदेशात गेले त्यावेळी त्यांनी तेथे वास्तवव्यास असणा-या भारतीय समाजाची आवर्जुन माहिती घेतली. अशा प्रसंगी त्यांचे साहित्यिक मन जागे व्हायचे. कॅरेबियन समुद्रातील त्रिनिदाद, गियाना, मॉरिशस, मलेशिया आदी लहान लहान देशांत भारतीयांची संख्या तुलनेने अधिक आहे.  गियाना येथे गेल्यावर तेथील भारतीयांची यशवंतरावांनी खास भेट घेतली. त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

परदेशातील भारतीयांच्या मनात आपल्या देशाबद्दल व आपले पूर्वज व त्यांच्या प्राचीन इतिहासाबद्दल आस्था असल्याचे यशवंतरावांना पहावयास मिळाले. भारत सरकारने या सर्वांशी संस्थात्मक संबंध निर्माण करावेत असा प्रयत्न यशवंतरावांनी प्रथम केला. हिंदी भाषा, संगीत, नृत्य, वाड्मय यांचा प्रसार परदेशात करुन तेथील हिंदू समाजाशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका यशवंतरावांनी बजावली.

रशियात प्रथमत: ज्यावेळी १९६३ मध्ये यशवंतराव गेले त्यावेळी त्यांनी तेथील संस्कृती व त्या देशाचा इतिहास जाणून घेतला. रशियन राज्यक्रांतीचे शिल्पकार लेनिन व जगप्रसिध्द साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांच्या समाधीचे दर्शन घेतले. वोल्गा नदीच्या किना-यावरील दुस-या महायुध्दाच्या आठवणी, तेथील एका टेकडीवर उभारलेले युद्धाचे दृश्य व ते दृश्य निर्माण करणारा कलावंत यांचीही भेट त्यांनी घेतली.

टॉलस्टॉयच्या समाधीचे दर्शन घेताना तेथील परिसर यशवंतरावांनी आपल्या नजरेत कायमचा साठवून ठेवला. टॉलस्टॉयने संपूर्ण विश्वाचे चिंतन करण्यात सारी ह्यात जेथे घालविली त्या 'यास्ना पलाना' या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तेथील आठवणी सांगताना यशवंतराव म्हणतात, "टॉलस्टॉयचे हे स्मारक म्हणजे एक जिवंत, बोलके, रम्य मनोहर असे तपोवन आहे. बालपणी टॉलस्टॉयने ज्या वृक्षांचे बीजारोपण केले तेच वृक्ष आता त्याच्या समाधीवर चव-या ढाळत आहेत, फुलांचा वर्षाव करीत आहेत. "