लोकनेते यशवंतराव चव्हाण - ११

महाराष्ट्राचे भाग्य उजळून टाकणा-या कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पहिले जनित्र १६ मे १९६२ रोजी यशवंतरावांच्या हस्ते बसविण्यात आले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी  'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे' उद्घाटन यशवंतरावांनी केले. वाई ( जि. सातारा ) येथील मराठी विश्वकोश कार्यालयाचे उद्घाटनही त्यांनी केले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात महत्त्वाची भूमिका यशवंतरावांनी बजावली. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कारभार, पत्रव्यवहार मराठी भाषेतून होऊ लागले. मुंबई शहराला दूध पुरवठा करण्यासाठी वरळी दूध डेअरी योजना सुरु करणे, दिवा-पनवेल रेल्वे मार्गाचे काम, बौध्द धर्माचा स्विकार करणा-या हरिजनांना त्यांच्या योजनांचा लाभ पूर्ववत सुरु ठेवणे. नागपूर येथील दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणे व डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करणे. गुढीपाडव्याला सार्वजनिक सुट्टी असे कितीतरी महत्त्वपूर्ण निर्णय यशवंतरावांच्या कारकीर्दीत घेण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर  या मराठी भाषिक राज्याचे नाव काय असावे याबाबत मत मतांतरे होती. 'मुंबई राज्य', 'मुंबई महाराष्ट्र राज्य' व 'महाराष्ट्र राज्य' यापैकी कोणते नाव ठेवावे याबाबत एकमत होत नव्हते. यशवंतरावांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्य व विरोधी पक्षांच्या सदस्यांत एकमत घडवून आणून 'महाराष्ट्र राज्य' या नावावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत व जडण-घडणीत महत्त्वपूर्ण योगदान यशवंतराव चव्हाणांनी दिल्यानेच त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' म्हणून गौरविण्यात येते.

यशवंतरावांना राजकारणाबरोबर साहित्यक्षेत्राचाही खूप मोठा व्यासंग होता. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नवी दिल्ली  येथे १९६१ मध्ये भरलेल्या ४३ व्या 'अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे' स्वागताध्यक्षपद त्यांनी स्विकारले. १९६२ मध्ये सातारा येथे भरलेल्या  अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन यशवंतरावांच्या हस्ते झाले. नांदेड येथे भरलेल्या मराठी नाट्य परिषदेचे उद्घाटनही त्यांच्या हस्तेच झाले. मराठी भाषा वाढली पाहिजे, ती समृद्ध बनली पाहिजे यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते.