आमचे मुख्यमंत्री -९१

धनशा कूपर हे प्रभारी प्रधानमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीचा काळ फक्त सहा महिन्यांपुरताच मर्यादित होता. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नाही. एकाच गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची बंदिवासातून सुटका.

बाळासाहेब खेर हे त्रिभाषिक मुंबई राज्याचे मुख्य प्रधानमंत्री. ते विद्यापीठ मतदारसंघातून निवडून आले होते. शिक्षण हा त्यांचा आवडता विषय होता. बाळासाहेब ज्यावेळी दुस-यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाला शासकीय मान्यता देऊन त्या विद्यापीठाच्या पदव्यांना इतर सर्व विद्यापीठांप्रमाणे मान्यता मिळवून दिली. त्यांनी पुणे विद्यापीठाची स्थापना केली व विद्यापीठाकरता गणेश खिंडीतील राज्यपालांच्या वसतिस्थानाची जागा दिली. १९५२ च्या सुमारास मुंबईतील इस्माईल युसुफ बंद करण्याचे घाटत होते. ते महाविद्यालय तसेच चालू ठेवण्याचे बाळासाहेबांनी ठरविले. त्यांचे खेरवाडीतील कार्यही संस्मरणीय आहे. ह्या वाडीस पूर्वी चामडेवाडी की वाडी असे म्हणत असत. त्या ठिकाणी प्रामुख्याने चांभारांची वस्ती होती. बाळासाहेब खेरांनी बांद्रा स्टेशन ते टॅनर्स कॉलनीपर्यंत रस्ता करून घेतला (१९३७-३९). चांभारांना तांत्रिक शिक्षण देण्याकरता ट्रेनिंग व लेदर वर्क्स इन्स्टिट्यूट ही संस्था सुरू केली. लोकांनी ह्या वाडीचे नाव चामडेवाल्यांची वाडी ऐवजी खेरवाडी असे करून घेतले ते खेरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता. तेथील लोकांनी बाळासाहेबांचा पुतळा उभा केला. आधाररहित महिलांविषयी बाळासाहेबांना अत्यंत सहानुभूती होती व त्यामुळे त्यांनी माटुंगा येथील महिला श्रध्दानंद आश्रमाला भरपूर मदत केली. त्यांनी लीगल एड सोसायटी स्थापन केली. टेलिग्राफ कार्यालयाकरता क्रॉस मैदानावर जागा दिली. डेक्कन कॉलेज १९३४ पासून बंद होते. ते त्यांनी पदव्युत्तर शिक्षणसंस्था म्हणून पुन्हा सुरू केले. मुंबईच्या लॉ कॉलेजचे सरकारी महाविद्यालयात रुपांतर केले.

कान्हेरी नॅशनल पार्क स्थापून पशुपक्ष्यांच्या अभ्यासाला उत्तेजन दिले. कला विद्यालयाची स्थापना केली. मुंबईत मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना करून त्याचे व्यवस्थापन व प्रशासन एशियाटीक सोसायटीकडे दिले. महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था स्थापन करून (१९४८) कामगार कल्याण अधिकारी ह्या पदाकरता शिक्षणाची सोय केली. चर्चगेट येथील सिडनहॅम महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ बाळासाहेबांच्या हस्ते झाला.

मोरारजी देसाई १९५२ ते १९५६ पर्यंत त्रिभाषिकाचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात तो काळ भाषावार प्रांताच्या चळवळीमुळे अशांततेचा होता. त्यामुळे त्यांना फारसे काही करता आले नाही. शिवाय मोरारजी हे अतितत्वनिष्ठ असल्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघाकरता (बलसाड) काही केल्याचे दिसत नाही.