आमचे मुख्यमंत्री -८६

ह्या संदर्भात एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. ती अशी की १९५६ साली सचिवालय सध्याच्या नवीन वास्तूत आले. त्यावेळी ते एल्फिस्टन महाविद्यालयाच्या वास्तूत होते. आता सचिवालयाला मंत्रालय म्हणतात. अंतुले मुख्यमंत्री असताना काही कार्यालये नव्या मुंबईत गेली.

वर निर्देश केलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कूपर, बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, कन्नमवार, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण असे नऊ मुख्यमंत्री वयाच्या साठीनंतर मृत्यू पावले.

संदर्भः
१)   प्रकाश अकोलकर – यशवंतराव ते विलासराव, दिपलक्ष्मी दिवाळी अंक, २००६.
२)   लोकसत्ता, लोकरंग – रविवार २९-१०-२००६, पृष्ठ ५.

२४. मुख्यमंत्री व त्यांचे विकासात योगदान

एकमुखी राज्यकारभाराला जरी कॉंग्रेसने प्रांतिक स्वायत्ततेच्या काळात अधिकार स्वीकारण्यापासून सुरुवात झाली असली तरी प्रांतिक स्वायत्ततेच्या काळात नियोजन व विकास ह्यांचे स्वरूप स्पष्ट नव्हते. खरी सत्ता तर ब्रिटिशांकडेच होती. मंत्रिमंडळ हे नामधारी होते. १९४७ साली जरी स्वातंत्र्य मिळाले तरी १९४६-१९५० हा काळ युध्दामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची गुंतागुंत सोडविण्यातच गेला. निर्वासितांचे पुनर्वसन, धान्याचा तुटवडा, दुष्काळ असे ते अनेक प्रश्न होते. एकूण हा काळ देशाला व अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यात गेला. महाराष्ट्रात ह्यावेळी त्रिभाषिक राज्य होते. मंत्रिमंडळ एक अर्थाने अनेक विभागांचे (गुजराथ, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र) कडबोळे होते. त्यामुळे प्रत्येक विभागातील मंत्री आपल्या विभागाचा विकास करण्याकरता पैसे ओढण्याचा प्रयत्न करीत असत. विकासाचा एकजीवी, एकात्मती असा दृष्टिकोन नव्हता. सुदैवाने महाराष्ट्रातील काही मान्यवर व्यक्ती मध्यवर्ती मंत्रिमंडळात होत्या. उदा., काकासाहेब गाडगीळ. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण संस्था(National Defence Academy), पिंपरी येथील ॲटिबायोटिक कारखाने ह्या संस्था स्थापन होऊ शकल्या. वास्तविक पाहता भारतीय घटना १९५० साली व पहिली पंचवार्षिक योजना त्या दरम्यानच सुरू झाली होती. तरी विकासाबाबत शास्त्रीय दृष्टी आणि एकवाक्यता ह्यांचा महाराष्ट्रात अभावच होता. अर्थातल पहिली पंचवार्षिक योजना कोणत्याही अर्थाने महत्वाकांक्षी प्रयोग नव्हता. मागच्याच अर्थसंकल्पाची योजनेच्या स्वरुपात ही आकृती होती. महाराष्ट्रापासून कर्नाटक वेगळा झाला व महाराष्ट्र द्विभाषिक झाला. त्यानंतर लगेच महाराष्ट्रात अशांततेचा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमुळे उद्भवला. जवळजवळ सर्वच पक्षांचे लक्ष प्रश्नाकडे होते व १९६० साली एकभाषी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला.