आमचे मुख्यमंत्री -८५

मुख्यमंत्र्यांच्या निर्गमनाचे कारण

मुख्यमंत्र्यांना कोणत्या कारणांमुळे जावे लागले हे पाहण्यासारखे आहे. दोन मुख्यमंत्र्यांना न्यायालयाच्या निकालामुळे राजीनामा द्यावा लागला. अंतुले हे प्रतिभा प्रतिष्ठानचे बळी ठरले तर शिवाजीराव निलंगेकर पाटील ह्यांना मुलीच्या परीक्षेच्या निकालात अवैध हस्तक्षेप करण्याच्या आरोपामुळे जाले लागले. स्वतःहून राजीनामा देणारे मुख्यमंत्री एकच आणि ते म्हणजे बाळासाहेब खेर. त्यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला. बहुमत असलेल्या पक्षाने म्हणजे कॉंग्रेसने अधिकार स्वीकार करण्याचे ठरविल्यामुळे कूपर ह्यांना जावे लागले. राणे ह्यांना त्यांच्या पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे जावे लागले तर शरद पवारांना ते मुख्यमंत्री असताना मध्यवर्ती सरकारने मंत्रिमंडळ बरखात केल्यामुळे जावे लागले व एकवेळ त्यांना मध्यवर्ती सरकारमध्ये संरक्षणमंत्रिपद घ्यावे लागल्यामुळे जावे लागले. परंतु शिवसेनेचे मनोहर जोशी आणि कॉंग्रेसच्या इतर नऊ जणांना पक्षादेशामुळे राजीनामा द्यावा लागला. ह्याचाच अर्थ असा की मुख्यमंत्रिपद हे श्रेष्ठींच्या दयेवर किंवा लहरींवर अवलंबून असते. त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर नाही.

राष्ट्रपती राजवट

१९६० पासूनच्या काळापासून आजतागायत महाराष्ट्रात एकदाच राष्ट्रपती राजवट आली, ती म्हणजे फेब्रुवारी १९८० ते जून १९८०. त्याचे कारण इंदिरा गांधींनी शरद पवारांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले होते.

विभागवार मुख्यमंत्रिपदाचा काळ

विदर्भातील मुख्यमंत्री १५ वर्षे होते. मराठवाड्यातील १३ वर्षे तर पश्चिम महाराष्ट्रातील व्यक्ती १९ वर्षे मुख्यमंत्रिपदावर होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांत तीन कोकणातील होते.

मुख्यमंत्र्यांचे वयोमान

सर्वसाधारणपणे मुख्यमंत्रिपद स्वीकारताना त्या व्यक्तीचे वय ४५ ते ५० च्या दरम्यान होते. अतिशय वृध्द माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले नाही. उत्तरांचलचे मुख्यमंत्री श्री. एन. डी. तिवारी आज ८१ वर्षांचे आहेत. मुख्यमंत्रिपदावर तरूण मंडळी येण्याचे कारण असे की जुन्या पिढीतील जाणकार व्यक्तींना मध्यवर्ती सरकारमध्ये मंत्र्याचे स्थान मिळाले किंवा त्यांच्याकडे संघटनात्मक कामगिरी सोपवली गेली. काहींनी महात्मा गांधी ह्यांच्या विधायक कार्याला वाहून घेतले.

मध्यवर्ती सरकारात कॅबिनेट दर्जाच्या मंत्री होणा-या व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण, अंतुले, शरद पवार, शंकरराव चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे ह्या होत.