हे वरील मृत्यूपत्राचे आदर्शवत स्वरूप कोठे? आणि आज सर्वसामान्य समाजामध्ये दिसणारे मृत्युपत्राचे स्वरूप कोठे. मृत्युपत्र म्हणजे जीव गेल्यावर मागे उरलेल्या निर्जीव मालमत्तेच्या विल्हेवाटीचा रुक्ष हिशोब. त्या मृत्युपत्रामधील कायद्याच्या रखरखीत भाषेत साहित्याचा अगर उदात्त हेतूचा ओलावा कोठून येणार. उलट त्याच्या प्रत्येक शब्दामधून मृत्यूची भेसूर अवकळा डोकावत असते. जनावरांच्या मृतदेहाचे लचके तोडण्यासाठी घारी-गिधाडांचे झगडे होतात त्याप्रमाणे सर्वसामान्यांचे मृत्युपत्राने वाटून दिलेल्या टिचभर मालमत्तेसाठी शूद्र तंटे माजतात आणि मृताविषयीचा शोक अगर आदर एवढेच काय, पण साधा माणुसकीचा लवलेशही दिसून येत नाही. पण यशवंतरावांचे वरील मृत्युपत्र ज्या मालमत्तेचा उल्लेख आहे तो अमोल आहे. यशवंतरावांचे जीवन सर्वस्व देशातील - महाराष्ट्रातील जनतेवरील व आपली पत्नी सौ. वेणूताईवरील त्यांचे अथांग प्रेम नि त्यांच्या देहाचा कणनकण हीच ती मालमत्ता होय. अशी मालमत्ता तिचा असा दाता आणि असे मालमत्तेचे वारस या जनमानसात पुन्हा दिसणार नाहीत. अशा प्रकारचे वर्णन आचार्य प्र. के. अत्रे यांच्या एका लेखात वाचल्याचे आढळते.
आपल्या हयातीतच हे काम पूर्ण करण्याचा यशवंतरावांचा मानस व प्रयत्न होता. २१ नोव्हेंबर १८८३ ला यशवंतराव चव्हाण स्वत: शामराव गणपतराव पवार, रसिकलाल वाडीलाल शहा या तिघांनी सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला. आणि ९ जानेवारी १९८४ ला त्याची नोंदणी झाली. यशवंतरावांनी आपल्या मनाशी या स्मारकाची कल्पना चित्ररेखित करून त्याप्रमाणे मुंबईच्या लेले अॅण्ड असोसिएटस् यांच्याकडून त्याचे नकाशे तयार करून घेतले. १ जून १९८४ ही सौ. वेणूताईंची प्रथम पुण्यतिथी. त्या दिवशी त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत स्वत:च स्मारकाचे भूमिपूजन केले व वेणूताईची प्रथम पुण्यतिथी पं. भीमसेन जोशी यांच्या संगीत मैफलीने केली. यशवंतरावांच्या उपस्थितीत झालेली वेणूताईंची ही एकमेव पुण्यतिथी. २५ नोव्हेंबर १९८४ ला यशवंतरावांचेही निधन झाले. त्यामुळे स्वत:च्या हयातीत स्मारक भवन उभारण्याचे त्यांचे स्वप्न तसे अपुरेच राहिले.
ट्रस्टने आपल्या उद्दिष्टांमध्ये ज्या अनेक बाबींचा समावेश केला त्यात पुढील गोष्टी आहेत. शिक्षण प्रसार आणि विविध विषयांतील ज्ञानशाखांच्या शिक्षणास प्रोत्साहन, निरनिराळया प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अभ्यासकेंद्रे आणि शिक्षणासाठी अन्य प्रकारे कार्यरत राहणार्या केंद्राची स्थापना आणि वृद्धी, विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, कर्जे, वसतिगृहे आणि भोजनालयाची निर्मिती. गरीब आणि एखाद्याच्या व्यवसायास व्यापारास मदत, उच्च शिक्षणास मदत, प्रवास खर्चाची जबाबदारी स्वीकारणे, सामान्य आणि प्रगत शिक्षणासाठी ग्रंथालये उभारणे, दवाखाने इस्पितळे, अनाथालये, शुश्रूषागृहे यांना मदत व देणग्या देणे, दुष्काळ वा पुरासारख्या आपत्तीप्रसंगी संकटग्रस्तांना मदत, अन्य प्रकारे औषधोपचार व गरजवंतांना मदत. दारिद्रयात पिचणार्यांना अन्नवस्त्रांची मदत, पाणीटंचाई असणार्या भागात विहीरखुदाई, गरिबांना मोफत वा कमी दरात घरे, समाजहितार्थ कामे करणार्या पब्लिक ट्रस्टना मदत, विज्ञान-तंत्रज्ञान-कला जनोपयोगी कामासाठी कार्यरत संस्थांना मदत वा तत्सम संस्थांची स्थापना, शारीरिक शिक्षण क्रीडा प्रकारासाठी प्रयत्न व प्रोत्साहन, भूकंप, आगी यासारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी निर्माण झालेल्या ट्रस्टना मदत व तस्तम संस्थांची स्थापना, व्यापारी-औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणास प्रोत्साहन यासाठी परीक्षा घेणे, पदविका, प्रमाणपत्रे परितोषिके प्रदान करणे या आणि अशा प्रकारच्या समाजोपयोगी कामाचा अंतर्भाव ट्रस्टने आपल्या उद्दिष्टांत केला आहे. या स्मारकासाठी शिवाजीनगर को-ऑप. हौसिंग सोसायटीने नाममात्र एक रुपया भाडयाने अंदाजे १७-१८ गुंठे जागा दिलेली आहे. त्या जागेवर यशवंतरावजींनी या स्मारकासाठी ४५ लाखाचा आराखडा केला होता व बांधकामाची जबाबदारी न्यू ट्रीओ बिल्डर्स(श्री. राजाभाऊ कोटणीस) यांच्यावर सोपविली होती. विश्वस्तांच्या सहकार्याने या वास्तूचा भव्य तळमजला उभा राहिला आहे.
या स्मारक भवनाचे उदघाटन २५ नोव्हेंबर १९९२ रोजी त्यावेळचे महराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रमण्यम् यांच्या हस्ते झाले. शिवाजी स्टेडियमसमोरील अत्यंत रमणीय परिसरात ही वास्तू उभी आहे. या स्मारकाच्या सभोवती सुंदर बगीचा आहे. दारात यशवंतराव चव्हाण १९६२ पासून वापरीत असलेली अॅम्बेसीडर गाडी आहे. स्मारकाच्या आतील बाजूस ३० बाय ४५ फूटाचे बंदिस्त सभागृह आहे. त्याच्या दोन्ही बाजूस यशवंराव व सौ. वेणूताई यांचे अर्धपुतळे आहेत. या सभागृहास लागूनच एका बाजूस २५ बाय ३२ फूटांचे ग्रंथालय आहे. तेथे काचेच्या लाकडी कपाटात यशवंतरावांचा अनमोल ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला आहे. या ग्रंथाचे ग्रंथालयशास्त्राप्रमाणे सर्व सोपस्कार (वर्गीकरण, तालिकीकरण-सूचीकरण) पूर्ण झाले आहेत. दुसर्या बाजूस २५ बाय ३२ फुटांचे कलादालन आहे. तिथे विविध आकाराच्या काचेच्या पेटया बसविण्यात आल्या आहेत. त्यात यशवंतरावांना देश-परदेशात भेट मिळालेल्या महत्त्वाच्या वस्तू कलात्मकतेने प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. वेणूताई व साहेब नेहमी वापरत असलेले कपडे व इतर वस्तूही एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत