यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ४-५

यशवंतरावांचं कार्य आणि त्यांनी केलेले निर्णय यांची ज्यांना जवळून माहिती आहे त्यांना या नेत्याच्या स्वभावात दृढमूल झालेला दुर्मिळ असा राज्यकारभारविषयक ध्येयवाद आढळतो.  पं. नेहरूंप्रमाणे ते मध्यममार्गी होते.  झटकन एखाद्याची बाजू घेत नसत.  कसलीही समस्या निर्माण झाली, वादाची स्थिती निर्माण झाली तर शांत राहून उभयपक्षी शांततेनं तडजोड घडवून आणण्यावर त्यांनी नेहमीच लक्ष केंद्रित केलं.  प्राधान्ये करून त्यांची फिलॉसफी ही प्रत्यक्ष कार्य उभं करणं ही होती (Philosophy of action). मुख्यतः ते प्रॅग्मॅटिक होते.  त्यांचा विश्वास होता तो मानवी मूल्यांवर, गुणांवर, माणसाच्या चांगुलपणावर, माणसाच्या चांगल्य विचारावर, शब्दांवर आणि प्रत्यक्ष त्याच्या कृतीवर.  त्यांच्या मध्यममार्गी स्वभावामुळे त्यांना कोणी 'कुंपणावर' बसवलं परंतु मानवी मूल्यांवरील विश्वासाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही.  

काँग्रेस पक्षाने उदारमतवादी, समाजवादी दृष्टिकोण स्वीकारावा आणि तो अंमलात आणावा यासाठी यशवंतरावांनी केलेलं पक्षांतर्गत कार्य मौलिक स्वरूपाचं आहे.  पक्षानं वचनपूर्तीचं राजकारण करावं असा आग्रह धरणारा जो पुरोगामी कार्यकर्त्यांचा संच होता त्याला त्यांनी पाठिंबा दिला.  सामान्य जनतेच्या पक्षाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पक्षाच्या धोरणात आणि अंमलबजावणीत बदल घडवून आणावा लागणार होता.  यशवंतरावांनी आपल्या पक्षातील प्रतिष्ठेचा त्यासाठी उपयोग केला.

भारताच्या भविष्यकाळाबद्दल त्यांची नजर पल्लेदार होती.  त्यांची काही भव्य स्वप्ने होती.  राजकीयदृष्ट्या स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या, संरक्षणाच्या दृष्टीनं भारत स्वयंपूर्ण बनण्याचं स्वप्न ते पाहात होते.  समाजातील विषमता नजिकच्या काळात नाहीशी होईल असा त्यांचा विश्वास होता, विकासासाठी सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि लोकांना आर्थिक स्थैर्य, समाधान प्राप्‍त करून द्यावं यावर त्याचां कटाक्ष होता.  भारतीयांना, भारताचं सार्वभौमत्व सांभाळता येईल एवढं त्यांना सर्व दृष्टीनं शक्तिमान बनवावं, एक समर्थ राष्ट्र, जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणारं समर्थ राष्ट्र, ही त्यांची भारताबाबतची प्रतिमा होती.

समर्थ, समाजवादी, लोकशाहीनिष्ठ, सर्वधर्मसमभाव राखणारं राष्ट्र, देशांतर्गत शांतता राखणारा जगातील एक आदर्श देश, अशीच भारताची प्रतिमा त्यांनी समोर ठेवली.  भारताची सांस्कृतिक मूल्यं, कला, साहित्य, संगीत आणि जे खास भारतीय आहे त्या सर्वांचा विकास कसलाही प्रतिबंध न येता अखंड होत राहावा, लोकजीवन सर्वांगानं संपन्न बनावं यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थकी लावला.  व्यक्तिगत जीवनात ते पूर्ण भारतीयच राहिले आणि भारतीय पोषाखातच निघून गेले.

यशवंतरावांनी अखेरपर्यन्त महाराष्ट्र धर्माची जोपासना केली.  त्यांच्या राजकारणात सौंदर्य होतं, साहित्य होतं, संस्कृती होती, शान होती, शहाणपण होतं.  पुरोगामी विचार होते.  देशाला भूषणभूत ठरलेल्या या व्यक्तीनं पंचवीस-तीस वर्षे भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव गाजवला.  आधुनिक महाराष्ट्राचे ते शिल्पकार बनले.  महाराष्ट्रात सर्वप्रथम समाजवादाची प्रस्थापना केली.  ग्रामीण महाराष्ट्राचे पुनरुत्थान घडविले.  शासनाचा रोख ग्रामीण, दलित जनतेकडे वळविण्याची अजरामर कामगिरी केली.  मनात सामान्य माणसांविषयी जिव्हाळा असल्यानं आणि या जिव्हाळ्याचा चौफेर अभ्यासाची जोड मिळाल्यानं ते 'यशवंत' ठरले.

यशवंतरावांची जीवननिष्ठा रसिक व्यक्तिमत्त्वाची होती.  लोकमान्य टिळकांनंतर यशवंतरावांइतके प्रेम दुसर्‍या कोणत्याही नेत्यावर महाराष्ट्रानं केलं नाही ही त्यांची थोरवी सर्वांत मोठी होय.  केंद्र सरकारात त्यांच्याइतकी महत्त्वाची खाती सातत्याने चालविणारा दुसरा मंत्री उभ्या हिंदुस्थानात तरी दाखविता येणार नाही.  त्यांच्या काळात तर निश्चितच नाही.  मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मानवतावादी विचारांचा पगडा असलेले यशवंतराव हे एक वैचारिक नेतृत्व होतं.  बुद्धिमंतांच्या बैठकीत ते शोभून दिसले.  साहित्य शारदेच्या मंदिरात पावन झाले.  राजकीय आखाड्यात लढून यशस्वी ठरले.  राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिवीर झाले.  त्यांचा पिंड व्यासंगी विचारवंतांचा होता.  अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, धुरंधर मुत्सद्दी, विचारवंत, स्वतःच्या तेजाने तळपलेल्या पिढीतील अग्रभागी चमकतील असे गुणग्राहक, सौजन्यानं विरोधकांची मनं जिंकणारे नेते, दिलदार मित्र, असे असूनही पाय सदैव जमिनीवर राहावेत हे पथ्य त्यांनी कटाक्षानं पाळलं.  राजकारण म्हणजे सर्व जीवन असं कधीच मानलं नाही.  साहित्य, संस्कृती, संगीत, प्रबोधन या सर्व प्रवाहांशी ते सतत संबंधित राहिले.  मराठी भाषा त्यांनी आत्मीयतेनं जोपासली.  भाषेला ते नटवीत नसत पण झुळझुळ झरा वाहात राहावा असं त्यांचं वक्तृत्व होतं.  त्यांच्या भाषेला तोल आणि ताल असायचा, विचारांची जाण आणि अभिव्यक्तीचा जोम असायचा.  कारण त्या मधुर शब्दामागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारं मन होतं.  पिंडानं ते कवी होते.  सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तित्वात लालित्य होतं.