यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६

यशवंतरावांनी असे कठोर आत्मपरीक्षण करायला लहानपणापासूनच सुरुवात केलेली दिसून येते.  बहुजन-समाजातील तरुणांमध्ये धैर्य, धाडस, हिंमत, निष्ठा व समर्पणभाव असतो; पण अध्ययन व्यासंगाबाबत ते कमी पडतात; एखाद्या विषयाचा एखाद्याने व्यासंग केलाच, तरी बाकीच्या क्षेत्रांची तो अक्षम्य उपेक्षा करतो.  त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात एकारलेपण येते; अनेकदा अनेक गोष्टी समजलेल्या असतात, बरीच माहिती मनात तयार असते; पण आविष्करणाची हातोटीच नसल्यामुळे मुखस्तंभ होण्याची पाळी त्यांच्यावर येते; वक्तृत्वगुणाची कदन न झाल्यामुळे बहुजन-समाजातील तरुणांच्या ठिकाणी सहसा वाक्पटुत्व नसते.  यशवंतराव हे सारे अनुभवित होते, आपली इतर समाजगटांशी तुलना करीत होते आणि उणिवा भरून काढण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत होते.  

बहुजन-समाजात जन्म लाभण्यातून अनायासेच पदरात पडलेल्या गुणांची जपणूक करीत असतानाच बहुजन-समाजात अभावाने आढळणारे व्यासंग, बहुश्रुतपणा, वक्तृत्व, लेखन, ॠजुता, भाषाभान, प्रसंगावधान, तारतम्य, मुत्सद्दीपणा, इत्यादी गुणांची प्रयत्नपूर्वक संपादणी करण्याचा प्रयत्न यशवंतरावांनी केलेला दिसून येतो.  त्यांनी हे गृहीत धरले होते, की ज्यांच्या हाती आजपर्यंत नेतृत्वाची मक्तेदारी होती, ते वर्ग नेतृत्ववंचित झाल्यानंतर स्वस्थ बसणार नाहीत.  नव्या बहुजन-समाजी नेत्यांच्या कारभाराकडे व वागण्याबोलण्याकडे ते डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवतील.  त्यांच्या छिद्रान्वेषी नजरेतून आपली एकही लहानसहान चूक सुटणार नाही.  उलट, राईचे पर्वत केले जातील.  राजकीय नेतृत्व त्यांच्या हातून निसटले, तरी समाजजीवनाच्या असंख्य आघाड्या आज त्याच वर्गांच्या हाती आहेत, अजून बरीच वर्षे त्या तशाच राहणार आहेत.  वृत्तपत्रे त्यांच्याच हाती आहेत, व्यासपीठे त्यांच्याच ताब्यात आहेत.  तेव्हा सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की बहुजन-समाजातील पुढा-यांनी असा कटाक्ष ठेवावा, की जेणेकरून आक्षेपकांना संधीच मिळू नये.  आपण जर आपल्या परीने चोख राहिलो, तर टपून बसलेल्या टीकाकारांना हात चोळीत बसावे लागेल आणि त्यांच्यांत जे प्रामाणिक आहेत, त्यांना जर आपल्या सचोटीचा प्रत्यय आला, तर ते स्वतःहून आपल्या मदतीला येतील.