यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य -१

दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे केवळ संकलित पुनर्मुद्रण नसून त्यांचे संपूर्ण व सविस्तर पुनर्लेखन व फेरमांडणी येथे केली गेली आहे.  यशवंतराव :  नेतृत्वाची उभारणी या शीर्षकाचा लेख दोंडाईचे लोकमानस साप्ताहिकाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.  त्यातून त्याच शीर्षकाचा या संग्रहातला पहिला लेख आणि यशवंतराव : राजधानी दिल्लीत या नावाने इथे असलेला क्रमांक तीनचा लेख असे दोन लेख केलेले आहेत.  स्वाभाविकच मूळ लेखापेक्षा त्यांची मांडणी अधिक तपशीलवार व मुद्देसूद झाली आहे.  दिवाळी अंकांमधील पृथक लेखांमध्ये काही जागी अपरिहार्यतः झालेली पुनरुक्ती संकलन- संस्करण करताना काढून टाकली आहे.

यशवंतराव आणि महाराष्ट्राचे राजकारण हा लेख नागपूरच्या तरुण भारत दिवाळी अंकात या वर्षी प्रसिद्ध झाला होता.  येथे त्यात बरीच नवी भर घालून पुनर्प्रकाशित करीत आहोत यशवंतराव आणि समाजवाद हा अर्धापूरहून प्रकाशित होणार असलेल्या यशवंतराव स्मृतिग्रंथासाठी लिहिलेला लेख असून किरकोळ फेरफार करून तो या संग्रहात समाविष्ट केला आहे.  

यशवंतरावांविषयी त्यांच्या राजकीय कर्तृत्वासंबंधीच्या उपर्युक्त लेखांबरोबरच त्यांच्या तितक्याच मौलिक महत्त्वाच्या वाङ्मयीन भूमिकांविषयीचा सविस्तर लेख या संग्रहाच्या अखेरीस अंतर्भूत केलेला आहे.  यशवंतरावांच्यातील ललित लेखक शीर्षकान्तर्गत प्रस्तुत लेखकाचा एक लेख नागपूरहून प्रकाशित होणा-या अक्षरछाया नामक वार्षिकात प्रसिद्ध झाला होता.  यशवंतरावांच्या लेखन-भाषणांमधून लालित्यगुण कसा स्वाभाविक, सहजपणे उतरत असे, याचे प्रतिपादन मुख्यत्वे केलेले होते.  साहित्यिक यशवंतराव या प्रस्तुत संग्रहातल्या लेखाची व्याप्ती त्या लेखापेक्षा बरीच समावेशक आहे.  यशवंतरावांचे प्रत्यक्ष ललित लेखन, त्यांची वाङ्मयीन समीक्षादृष्टी आणि साहित्यिकांच्या बांधिलकीसंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन वगैरे अनेक आनुषंगिक बाबींचाही सदर लेखात ऊहापोह करण्यात आला आहे.  या स्वरूपात तो समुचित या नागपूरहून प्रसिद्ध होणा-या वाङ्मयीन नियतकालिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित होत आहे.  कराडच्या साहित्य संमेलनात तेव्हाच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीच्या परिणामस्वरूप राजकारणी व्यक्तींनी साहित्याच्या व्यासपीठावर लुडबुड करावी, की करू नये ?  या प्रश्नावर बरीच चर्चा झाली होती.  राजकारण्यांच्या उपस्थितीस तत्त्वतः विरोध करणे रास्तच होते.  परंतु सदर लेखातून यशवंतरावांच्या विदग्ध वाङ्मयाभिरुतीचे व त्यांच्या साहित्यक्षेत्रातील चतुरस्त्र भूमिकांचे जे प्रत्यंतर मिळते, ते पाहिल्यावर किमान त्यांच्या संदर्भात वरील प्रश्नाची चर्चा अप्रस्तुतच ठरते.

यशवंतरावांसंबंधी चिकित्सक लिहिण्याचा प्रयत्न आजवर फारसा झालेला आढळत नाही.  त्यांची चरित्रे, राजकीय चरित्रे, अभिनंदन ग्रंथ वगैरे प्रकाशित साहित्याचे स्वरूप बरेचसे एकांगी गुणगौरवपर आहे.  त्यांच्यावर जे टीकात्मक लेखन समकालीनांनी केले आहे, ते अकारण अभिनिवेशी आणि बहुधा पूर्वग्रहदूषित असे आहे.  समकालीन राजकारणात प्रतिद्वंद्वी व्यक्तीकडून होणारे लेखन सामान्यतः असे असणे अटळच असते.  प्रस्तुत लेखकाचा दृष्टिकोन प्राथमिकतः एका सत्यान्वेषी अभ्यासकाचा (अॅकॅडेमिक) आहे.  कोणत्याही प्रकारे पक्षपाती पूर्वग्रह डोकावू न देता यशवंतरावांच्या राजकीय व वाङ्मयीन कर्तृत्वाचे परिशीलनच त्याच्या येथे अभिप्रेत होते.  यशवंतरावांच्या यशाचा गौरव करीत असतानाच त्यांच्या अपयशाचेही माप त्यांच्या पदरात त्याने घातले आहे.