यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७

नेतृत्व :  अर्थ आणि आशय

अशा भूमिकेतून यशवंतरावांनी स्वतःच्या राजकीय जीवनाची आखणी नेतृत्वाच्या अत्यंत प्राथमिक टप्प्यावरच केलेली दिसून येते.  नेतृत्वाचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ फारच व्यापक होता.  पुढे तो त्यांनी नेमक्या शब्दांत व्यक्तही केला आहे.  पण ज्या वयात त्यांना तो शब्दबद्ध करता आला नसता, त्याही वयात त्यांनी आचरणातून नेतृत्वाचा तोच अर्थ व्यक्त केलेला दिसून येतो.  ते म्हणतात :

''आजकाल नेतृत्व याचा अर्थ फारच मर्यादितपणे केला जातो.  राजकारणात एखादे पद प्राप्त झाले, की त्याला नेता म्हणायचे, ही सवय जितक्या लवकर दूर होईल, तितकी त्याची गरज आहे.... नेतृत्व हा शब्द व्यापक अर्थाचा आहे.... सामूहिक परिणाम घडविणारे त्या त्या क्षेत्रातील जे कोणी आदर्श असतील, तेच खरे नेते.  नव्या आदर्शांचा संपूर्ण समाजजीवनावर परिणाम करण्यासाठी, त्याचा वापर करणारी जी माणसे असतात, त्यांच्या ठिकाणीही नेतृत्व असतेच.... विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोट्या असतात.  ('ॠणानुबंध,' ६०)

यशवंतरावांना नेतृत्वाची संकल्पना इतक्या व्यापक अर्थाने अभिप्रेत असल्यामुळेच आपल्या नेतृत्वाची पायाभरणी करीत असताना त्यांनी काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले होते.  त्यांच्या मते नेतृत्व जर हेतुपूर्ण नसेल, तर ते कुचकामी आहे.  नेतृत्वाला स्वार्थापलीकडचे काही ना काही प्रयोजन असायला पाहिजे.  त्याच्यासमोर आदर्श समाजव्यवस्थेचा आराखडा असायला पाहिजे आणि त्या आदर्शाप्रत जाण्याच्या मार्गांची त्याने नीट ओळख करून घ्यायला पाहिजे.  समाजकारणात व राजकारणात घर करून बसलेले सरंजामी अवशेष निकालात काढायचे आहेत, ग्रामीण शेतक-यांच्या जीवनाला आलेली अवकळा दूर करायची आहे, शिक्षण व आरोग्याला पिढ्यान् पिढ्या वंचित झालेल्यांना विकासाच्या वाटा दाखवायच्या आहेत, जातीय वैमनस्याला वाव न मिळू देता अल्पसंख्याक उच्चवर्णीयांची सर्वक्षेत्रीय मिरासदारी मोडीत काढायची आहे, बहुजन-समाजाच्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक वगैरे प्रश्नांचा निपटारा करायला आहे- इत्यादी प्रयोजने यशवंतरावांनी स्वतःच्या पुढारीपणासाठी फार पूर्वीच निर्धारित केली होती आणि हयातभर इमानेइतबारे त्यांनी त्यांचा पाठपुरावाही केला होता.  आधीच्या नेतृत्वाशी तोडीस तोड खंबीर, विवेकी व कल्पक नेतृत्व बहुजन-समाजातून उभे राहिले नाही, तर ही साध्ये समूर्त होणे असंभवनीय आहे, याची यशवंतरावांना स्पष्ट जाणीव होती.  या जाणिवेतूनच महाराष्ट्र-निर्मितीच्या वेळी त्यांनी आपल्या सहका-यांना असा इशारा केला होता :

''मी जे नेतृत्व म्हणतो, त्याचा अर्थ आपण नीट समजावून घ्या.  नव्या नेतृत्वाकरिता निश्चित कार्यक्रम असावा लागतो, कार्याची दृष्टी असावी लागते; आणि त्याचबरोबर समाज समतेच्या तत्त्वावर चालण्याकरिता कार्याला वाहून घेणा-या शीलवान शूरवीरांची आवश्यकता असते. महाराष्ट्र राज्याची जी स्वप्ने आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी मी आपणा सर्वांना हाक देत आहे.'' ('सह्याद्रीचे वारे')