यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १६

व्यक्तिमत्व हेच अधिष्ठान

यशवंतरावांच्या नेतृत्वाचे मुख्य अधिष्ठान अर्थात त्यांचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तिगत गुण हेच होते.  पारंपारिकदृष्ट्या जिथे वय, सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक दर्जा या आधारेच नेतृत्व प्राप्त होईल, अशा समाजात यशवंतराव आपल्या अंगच्या सदगुणांवर अल्पवयातच नेतृत्व काबीज करू शकले, ही घटना लोकविलक्षण ठरावी.  धाडस, निष्ठा, आस्था, विवेक आणि चातुर्य हे त्यांचे उपजत गुण त्यांना या कामी मोलाचे ठरले.  ते एकटे आपल्या दूरदर्शित्वाच्या बळावर महाराष्ट्र काँग्रेसचा डळमळीत डोलारा सावरू शकले, हे इतिहासाला नाकारताच येणार नाही.  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेपेक्षाही त्यांच्या राजकीय कौशल्याचाच अधिक उपयोग झाला.  वाद अनेक मिटवायचे होते.  भावना तीव्र होत्या; पण यशवंतरावांच्या मध्यस्थीतून समेटाच्या वाटा खुल्या होत होत्या.  एखाद्या गंभीर चर्चेतही वादातल्या सर्व पक्षांना चव्हाण आपल्याच बाजूचे वाटत असत, हे त्यांचे खास कौशल्य होते.  (हँजेन, १३३).  वाटाघाटींसाठी लागणारी बुद्धीची, कुशाग्रता, प्रसंगी जुळते घेण्याचा उदारपणा हे दोन्ही गुण चव्हाणांपाशी पुरेपूर असल्याचा निर्वाळा ग. त्र्यं. माडखोलकरांनी दिला होता.  (चव्हाण अभिनंदन ग्रंथ, १५).  

''यशवंतरावांच्या ठिकाणी पहिला बाजीराव आणि नाना फडणवीस यांच्यांतले गुण एकवटले आहेत'' या आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या विधानाचा हवाला देऊन हे विधान यशवंतरावांबाबत कसे समर्पक व मार्मिक ठरते, हे माडखोलकरांनी पुढील शब्दांत नमूद केले होते :

''बाजीरावाने मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन मराठी राज्य वाढविले व आपल्या संग्राहक धोरणाने सर्व जातींची नवी सरदार घराणी निर्माण करून त्या राज्याला बळकटी आणली.  (पण) बाजीराव हा पराक्रमी असला, तरी हिशेबी नव्हता; धाडसी असला, तरी कारस्थानी नव्हता व दिलदार असला, तरी विवेकी नव्हता.  उलट, नाना फडणवीस हा भित्रा खरा, पण पाताळ्यंत्री, हिशेबी व सावध होता....''  यशवंतरावांची चार वर्षांची व्यवहारनीती व राज्यकारभार त्यांच्या अंगी बाजीराव व नाना यांच्या सद्गुणांचा समन्वय असल्याचे सिद्ध करणारी आहे, असा निर्वाळा देऊन ''शब्दाला जागणारा व चारित्र्याला जपणारा (त्यांच्या) इतका संग्राहक वृत्तीचा, पण सावध राज्यधुरीण मी तरी पाहिलेला नाही,'' असे म्हटले होते.  प्रसंगी लोकनिंदा व लोकविरोध पत्करूनही आपल्या ध्येयावर अडिग राहणारा, स्वतःच्या राजकीय चारित्र्याचा आपले शत्रू आणि मित्र दोहोंवरही सारखाच वचक निर्माण करणारा लोकनेता असेही यशवंतरावांचे वर्णन त्यांनी केले आहे (कित्ता).