यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १२

जननिष्ठा व पक्षनिष्ठा समानार्थीच

जननिष्ठा हे यशवंतरावांच्या नेतृत्वाचे सर्वाधिक नजरेत भरणारे वैशिष्ट्य दिसते.  राष्ट्रसभेचे स्वातंत्र्य-आंदोलन लोकाभिमुख करण्यातून त्यांनी आपल्या नेतृत्वाची पायाभरणी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था हाती ठेवण्यातून पुढे अटळपणे उभ्या राहणा-या जनआंदोलनासाठी लागणारी तरुण माणसे जोडता येतील आणि जनमानसातील आपल्या कार्याचा पाया अधिक खोल करता येईल, हा विचार त्यांनी १९४१ च्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकांसाठी धावपळ करताना मनात ठेवला होता.  राष्ट्रसभा म्हणजे निवडणुकांमधील केवळ एक स्पर्धक पक्ष नसून लोकांच्या आशा-आकांक्षांशी जैविकरित्या जोडली गेलेली आणि लोकांच्या रागालोभाची तक्रार-गार्हाणी व मागण्यांची कदर करणारी ती एक प्रभावी चळवळ आहे, हीच राष्ट्रसभेची प्रतिमा त्यांनी मनात बाळगली होती.  त्यामुळेच तिची एखाद्या बांधीव विचारसरणीशी परिबद्धता असता कामा नये आणि कालपरत्वे बदलता येण्याचा आपला लवचिकपणा तिने गमावून बसता कामा नये, असा त्यांचा कटाक्ष होता.  पोथीनिष्ठ विचारसरणीच्या झापडा लावून वावरणारे पक्ष जिवंत जनजीवनाच्या प्रवाहापासून दुरावतात, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.  

स्वतः यशवंतराव हे जन-सामान्यांची नाडी अचूक सापडलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक असल्यामुळे जनतेशी प्रभावी हृदयसंवाद करणे त्यांना सहज शक्य होई.  जनसामान्यांच्या परिस्थितीची त्यांची माहिती अन्य शहरी नेत्यांप्रमाणे ग्रंथप्रबंधांच्या अध्ययनातून नव्हे, तर प्रत्यक्ष स्वानुभवावर आधारित होती.  मुख्यमंत्रिपदासोबत येणा-या समृद्ध उच्चभ्रूपणाच्या वलयात वावरत असतानादेखील त्यांना आपल्या मुळांचे कधीच विस्मरण झाले नव्हते.  अर्थात हेही तितकेच खरे आहे, की ज्या जननिष्ठेपोटी त्यांनी स्वतःला जनमताच्या गाड्याला बांधून घेऊन लोकानुनयाखातर आपली फरफट मात्र कधीच होऊ दिली नाही.  आयुष्यात अनेकदा त्यांना प्रतिकूल लोकमताच्या कुत्सेला व क्रोधाला सामोरे जावे लागले आणि धीरगंभीरपणे त्यांनी ते दिव्य पत्करले.  प्रवाहाविरुद्ध जाण्याची अशी हिंमत फारच थोडे राजकीय नेते दाखवू शकतात.

लोकशाहीतील नेत्याला आपल्या पाठीराख्यांशी प्रतारणा करून चालत नाही, हे यशवंतरावांच्या राजकीय वाटचालीचे मुख्य सूत्रही त्यांच्या जननिष्ठेचेच द्योतक मानावे लागेल.  'चले जाव' आंदोलनाच्या घोषणेनंतर स्वपक्षात दीर्घकाळ आलेले शैथिल्य असह्य होऊन साम्यवादी पक्षात जावेसे यशवंतरावांना वाटले होते.  त्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी बोलणीही केली होती.  पण जेव्हा त्यांनी आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा विचार घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की त्यांना हे मुळीच मान्य होणारे नाही.  त्यांनी मग तो विचार सोडून दिला.  सहका-यांना न पटणारे आपण काही केले, तर आपण एकाकी पडून काहीही करू शकणार नाही, अशी त्यांची सदैव धारणा होती.  या संदर्भात आपल्या आत्मचरित्रात ते लिहितात :