यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १३३

मंत्री आणि त्यातही मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा जबाबदारीच्या अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींनी केवळ आपण आपल्या खात्यापुरते बांधील आहोत असे न मानता, निदान भारतासारख्या देशात तरी सर्वांच्या आणि त्यातही सामान्य लोकांच्या बाबतीत सहानुभूती बाळगली पाहिजे, अशी यशवंतरावांची धारणा होती. ते या भावनेने वागत असल्यामुळे अनेक लोक भेटत. काही जण तर आपली वैयक्तिक सुखदु:खे ऐकवण्यासाठी भेटत. यातच काहींचे विवाह जुळवण्याचे आणि घटस्फोट होऊन विवाह मोडण्याची वेळ आलेल्यांच्या कौटुंबिक जीवनाबाबत मध्यस्थीही करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले होते.

लेखक, कलावंत यांच्याबद्दल यशवंतराव विशेष उदार असत. बडे गुलाम अलींच्याबद्दलचा अनुभव, यशवंतरावांचे मित्र वि. वा. नेने यांनी दिला आहे. यशवंतरावांशी नेने बोलत बसले असता माणसे सतत  येत होती. राहायला जागा मागणारे ताठयांत बोलत असल्याचे पाहून नेने यांना राग आला.

पण यशवंतराव शांतपणे ऐकून घेऊन समजावणीच्या शब्दांत उत्तर देत होते. त्याच वेळी ठुमरीचे बादशहा बडे गुलाम अली आले आणि आपल्याला राहायला जागा द्यावी अशी त्यांनी विनंती केली. यशवंतरावांनी विचारले ‘मुस्लिम मोहल्ल्यात हवी ना?’ बडे गुलाम अली यांनी उत्तर दिले, ‘छे, त्या मोहल्ल्यात नको. गायकांत व वादकांत मुसलमान बरेच असले तरी सामान्य मुसलमानांत शास्त्रीय संगीताचे शौकिन अत्यंत कमीच. त्यामुळे मला जागा हवी हिंदू मोहल्ल्यातच. माझ्या रियाजाला आदराने येऊन ऐकणारे लोक, मला त्या समाजातच मिळतील.’

नवे विचार समजून घ्यावे, वेगवेगळे ग्रंथ वाचावे ही यशवंतरावांची प्रवृत्ती होती, तरी ते व्यावहारिक राजकारणातील डावपेचांत कमी पडत नसत. राजकारणात हे अपेक्षित आहे. पण केवळ डावपेचांत ते व्यग्र नसत आणि आपल्या धोरणास काही वैचारिक अधिष्ठान असल्याचे ते दाखवून देत. वर काही बंधनांचा व निर्बंधांचा उल्लेख केला आहे. त्यांत आणखी एक घटक प्रत्येकाच्या स्वभावाचाही असतो, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यशवंतरावांचे काही विचार होते, काही भूमिका होत्या. पण या संबंधी ते दुराग्रही नव्हते. अगदी नक्षलवादाची चिकित्सा करतानाही ते, हे आंदोलन कोणत्या आर्थिक व सामाजिक कारणांस्तव उद्भवले याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. या संबंधात यशवंतरावांनीच न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केलेले भाषण उल्लेखनीय ठरेल. ते म्हणाले: ‘दुस-याच्या म्हणण्यातील तथ्य ते (तात्यासाहेब) मान्य करीत – ते एकांतिक विचाराचे नव्हते, व्यवहारी व मध्यममार्गी होते-केळकरांची जी मध्यममार्गावर श्रद्धा होती त्यामागे एकतर त्यांचे त्याला अनुकूल सौम्य व बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते आणि दुसरे, अनुभवी व्यवहारवाद होता. केळकरांनी मध्यमक्रमासंबंधी जे विवेचन केले आहे त्यात म्हटले होते की, मध्यमक्रम म्हणजे निखालस वाईटाशी तडजोड असा नाही, तर जे सामान्यत: चांगले म्हणून समजले जाते, त्याचीच मर्यादा शोधून तारतम्याने जे युक्त वाटेल, त्याचे आचरण म्हणजे मध्यमक्रम होय. “सद्गुणांच्या आचरणातही तारतम्याने सुचविणारे मर्यादादर्शन असे त्याचे शास्त्रीय वर्णन केळकरांनी केले आहे” – भावना जेव्हा उद्दीपित होतात तेव्हा अशा वृत्तीच्या लोकांची उपेक्षा होते, तशीच ती केळकरांची झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात, यशवंतरावांची नुसती उपेक्षाच नाही, तर त्यांच्यावर टीकास्त्राचा चोहो बाजूंनी मारा झाला.

यशवंतरावांनी कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यापूर्वी अनेकांशी विचारविनिमय करण्याची प्रथा पाडली. किंबहुना असेही दिसेल की, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही वर्षे त्यांचा शब्द अखेरचा मानला जात होता; तेव्हाही त्यांनी संघटना व मंत्रिमंडळ यांतील लोकांना प्रथम आपापले विचार मांडण्यास सांगण्यावर कटाक्ष ठेवला. त्यानंतर अधिकाधिक जणांना मान्य होणारा मार्ग सांगत असताना, आपले मत देण्याकडे त्यांचा कल असे. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी सहकारी साखर कारखाने व इतर सहकारी तत्त्वावरील उद्योग सुरू करताना अशा चर्चा झालेल्या होत्या. या सहकारी क्षेत्रातील उद्योगांमुळे महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागाचे जीवन बदलून गेले. यातून सामान्य लोकांतही आत्मविश्वास वाढला कालांतराने या क्षेत्राची वाढ कुंठित झाली. महाराष्ट्र बँकेचे संस्थापक सी. व्ही. जोग यांच्या अभिनंदनपर ग्रंथास, (इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र) डॉ. वि. म. दांडेकर यांना ७३ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले होते, ‘महाराष्ट्रात सहकरी चळवळ प्रारंभीच्या काळात यशस्वी झाली कारण महाराष्ट्र सरकारने तिला मदत केली आणि प्रोत्साहन दिले. परंतु आता हेच या चळवळीतील सध्याच्या अडचणींना कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. ही चळवळ अधिकाधिक राजकारणग्रस्त होत आहे. तसेच तीमध्ये जी व्यापाराची वृत्ती हवी ती कमी होत असून भ्रष्टाचार वाढला आहे.’ यशवंतरावांवर या अनिष्ट प्रवृत्ती पाहून व्यथित होण्याची वेळ आली होती. हे असे का झाले, असे ते स्वत:ला विचारत होते. याचे एक कारण डॉ. दांडेकरांनी नमूद केले होते. दुसरे कारण असे दिसते की, पहिला काळ ओसरल्यानंतर बहुतेकांचा स्वातंत्र्य आंदोलनाचा संपर्क राहिला नव्हता आणि जी वैचारिक बैठक असायला हवी ती नव्हती. अनेकांच्या बाबतीत धड व्यापार नाही आणि धड धेयवाद वा कल्याणकारी वृत्ती नाही, अशी अवस्था झाली आणि पुढे हे वाढतच गेले.