यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १२७

इंदिरा गांधींच्या कार्यशैलीसंबंधात यशवंतरावांचे म्हणणे असे होते की, प्रारंभीच्या काळात त्या जरा चाचपडत होत्या. पण नंतर त्या बदलल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीस त्या पूर्ण तयारीनिशी येत. त्यांनी आपल्या कार्यालयात विविध शाखा तयार केल्या होत्या आणि त्यांच्याकडून त्यांना आवश्यक ती सर्व माहिती मिळवण्याची व्यवस्था केली होती. परदेशी राजकारणाच्या बाबतीत त्या अधिक माहीतगार होत्या. जगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची त्यांची चांगली ओळख होती. छगला हे विचारवंत असले तरी परराष्ट्र राजकारणाच्या बाबतीत ते इंदिरा गांधीपुढे फिके पडत. कारण इंदिरागांधींची जाणीव व निर्णयशक्ती मोठी होती. इंदिरा गांधी मंत्रिमंडळाच्या उपसमितीत सगळ्यांना बोलून देत आणि मग मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर निर्णय झालेला असे. आणखी एक वैशिष्ट्य होते. कोणताही निर्णय घेताना देशात कोणती प्रतिक्रिया होईल हा त्यांचा पहिला प्रश्न असे.

इंदिरा गांधींच्या संबंधात नाराजी असली तरी यशवंतरावांनी जयंत लेले यांना दिलेल्या मुलाखतीत, नेहरू व इंदिरा गांधी हे दोनच राष्ट्रीय पातळीवरचे नेते असल्याचा अभिप्राय दिला होता. ७१ सालच्या निवडणुकीनंतर पक्षाच्याही पलीकडे जाऊन सरळ जनतेलाच आवाहन करण्याची क्षमता, इंदिरा गांधींनी दाखवली असे ते म्हणाले. अशी क्षमता नेहरूंपाशी होती व तिचा प्रत्यय आला असल्यामुळे नेहरूंनी मतभेद असतानाही वरिष्ठ काँग्रेस नेते त्यांच्या मागे जात हे दिसून आले होते. यशवंतरावांना या संबंधात स्वतःबद्दल काय वाटते असे विचारल्यावर, त्यांनी वेगवेगळ्या राज्यांतले कोणते काँग्रेस नेते आपल्याला मत देतील हे नावनिशीवार स्पष्ट केले. पण ते करताना पंतप्रधान व आपण, असा विकल्प आला तर त्यांतले बरेच हे पंतप्रधानांच्या बाजूने जातील हेही कबूल केले. इंदिरा गांधी लोकांना प्रत्यक्षच आवाहन करू शकतात असे सांगताना आपणही तसे करू शकत असल्याचा दावा त्यांनी केला नाही. यशवंतराव पंतप्रधान होऊ शकले असते पण इंदिरा गांधींना स्वतःहून त्यांनी पाठिंबा देऊन संधी घालवली असे मानणारांनी हेही लक्षात घेतले नाही, असे म्हटले पाहिजे. अर्थात हेही खरे की, पंतप्रधानपद त्यांच्याकडे आले असते तर ते त्यांनी समर्थपणे सांभाळले असते.

यशवंतरावांनी इंदिरा गांधींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मान्य केली होती. वेणुताईंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की गेल्या सहा वर्षात म्हणजे १९६९ साली झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंबंधातील मतभेदानंतरही, इंदिरा गांधी आपल्याशी न्याय्य रीतीने वागल्या. इंदिरा गांधींनी पंतप्रधानांचे कार्यालय बरेच प्रबळ केले. या संबंधी यशवंतराव तक्रार करताना दिसत नाहीत. उलट त्यांनी म्हटले होते की, जगभर पंतप्रधान वा अध्यक्ष यांनी या प्रकारे आपले खास कार्यालय प्रबळ केले असल्यामुळे भारतात काही वेगळे झाले नाही. मग अडचण कोठे होती? यशवंतरावांची अपेक्षा अशी होती की, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आपणही कारभारात वा निर्णय प्रक्रियेत सहभागी आहोत असे वाटले पाहिजे व तसे वाटावे असे वातावरण तयार करायला हवे. इंदिरा गांधींनी ते न करता आपल्या कार्यालयाचे वर्चस्व स्थापन केले हे बरोबर झाले नाही.

असे तीन पंतप्रधान. या तिघांच्या संबंधांत यशवंतरावांनी जितके वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येईल तितके केले आहे. त्याचप्रमाणे बेचाळीसच्या आंदोलनातील काही साथीदार आणि नंतर काँग्रेस संघटनेतील व मंत्रिमंडळातील काही पुढारी, यांच्या संबंधांतही त्यांनी या प्रकारचे विवेचन जयंत लेले यांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फेबियन सोसायटीची स्थापना झाली. तिचा संस्थापक औपचारिकरीत्या विचार केल्यास थॉमस डेव्हिडसन, पण ती नावारूपाला आली ती सीडनी व बेट्रिस वेब, विल्यम मॉरिस व बर्नार्ड शॉ यांच्यामुळे. हा मग एक पंथ तयार झाला. सार्वजनिक क्षेत्राची वाढ, सामाजिक व आर्थिक न्याय इत्यादी विचार या पंथाने स्वीकारले असले तरी कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी व वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान त्यास अमान्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू या पंथाच्या विचाराने प्रभावित झाले होते आणि नेहरूंच्या विचारांचा पगडा यशवंतरावावर असल्यामुळे, त्यांचेही राजकीय विचार व वर्तन या फेबियन पंथाशी अधिक जवळचे होते. फेबियन सोसायटीने संशोधनावर भर दिला होता. साहजिकच अभ्यास व विचारमंथनास महत्त्व आले. बर्नार्ड शॉ यांचे चरित्रकार मायकेल हॉलरॉइड यांनी म्हटले आहे की, फेबियनांनी समाजवाद रस्त्यावरून दिवाणखान्यात आणला. त्यांना हिंसक उठाव अमान्य होता. शॉ याने तर म्हटले आहे की, अश्रुंविना समाजवाद हे आपले उद्दिष्ट असल्यामुळे तो केव्हा आला, हेही कळणार नाही.